विद्यमान न्यायमूर्तींवर कामाचा प्रचंड ताण : न्या. दीपांकर दत्ता
विद्यमान न्यायमूर्तींवर कामाचा प्रचंड ताण : न्या. दीपांकर दत्ता
काम आणि वैयक्तिक आयुष्यात संतुलन राखण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : देशातील सर्वात जुन्या उच्च न्यायालयांपैकी एक असलेले मुंबई उच्च न्यायालयातील मंजूर न्यायमूर्तींच्या केवळ ७० टक्के संख्येने काम करत आहे. न्यायमूर्तींची संख्या वाढण्याची मागणी दीर्घकाळापासून होत आहे. विद्यमान प्रकरणांच्या कामाचा प्रचंड ताण वाढत असल्याची खंत शनिवारी (ता. ५) सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी व्यक्त केली. तसेच काम आणि वैयक्तिक आयुष्याचे संतुलन राखण्याचे आवाहनही त्यांनी केले.
उच्च न्यायालयाने सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान दत्ता बोलत होते. वाढत्या प्रकरणांच्या ताणाचा परिणाम न्यायमूर्तींच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे न्यायमूर्तींनी त्यांच्या आरोग्याची, तब्येतीची काळजी घेण्याची गरज आहे. तणावमुक्त राहण्यासाठी कुटुंबीयांसह वेळ घालवावा, कामाचा ताण घेऊन न्यायमूर्तींनी स्वतःचे किंवा कुटुंबीयांचे नुकसान करू नये, तुम्हाला काही झाल्यास एक महिना सहानुभूती दाखवून नंतर सगळे विसरून जातील, असे परखड मतही न्या. दत्ता यांनी बोलून दाखवले.
एकदाच उच्च न्यायालयात २०१९ ते २०२० दरम्यान ७५ न्यायमूर्ती कार्यरत होते. न्यायमूर्तींची संख्या ९० पर्यंत कधीच गेली नाही आणि तिथपर्यंत ती पोहोचेल, हे विसरूनच जा. आपण २०२१ मध्ये उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती असताना, ७० न्यायमूर्ती कार्यरत होते. कोरोना काळात ती संख्या ५० पर्यंत खाली आल्याचेही न्या. दत्ता यांनी सांगितले. तसेच निकालाची प्रत उपलब्ध करण्यात होणारा विलंब कामाच्या ताणामुळे होत असल्याचे उच्च न्यायालयाच्या एका न्यायमूर्तींनी त्यांच्या निकालात स्पष्ट केल्याची न्या. दत्ता यांनी आठवण करून दिली.
९४ न्यायमूर्तींचे संख्याबळही कमी
मुंबई उच्च न्यायालयाचे विद्यमान मुख्य न्या. आलोक आराधे यांनी १५ ते १६ न्यायमूर्तींची शिफारस केली आहे. त्यापैकी १२ ते १३ नावांवर शिक्कामोर्तब होईल असे वाटते, परंतु मुंबई उच्च न्यायालयावरील कामाचा ताण पाहता ९४ न्यायमूर्तींचे संख्याबळही कमी असल्याचे शेवटी न्या. दत्ता यांनी नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.