१२०० कंत्राटी कर्मचाऱ्यांची मुस्कटदाबी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत (एनयूएचएम) मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागात ठेकेदार कंपनीमार्फत कार्यरत १,२०० कंत्राटी कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी पालिका कार्यालयाबाहेर आंदोलन केले.
महापालिकेच्या आरोग्य केंद्रांत परिचारिका, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, लसीकरण अधिकारी अशा विविध पदांवर नेमण्यात आले आहे. आठ वर्षांपासून हे कर्मचारी प्रामाणिक सेवा देत आहेत; मात्र वेतनवाढ, भरपगारी प्रसूती रजा, बोनस, सेवा सातत्य यांसह अनेक हक्कांपासून वंचित आहेत. वेतन थकवण्याबरोबरच महिलांना प्रसूती रजेदरम्यान कामावरून कमी करण्याचे प्रकारही समोर आले आहेत. एनयूएचएममधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना डी. एस. कंपनीमार्फत कामावर ठेवण्यात आले असून, २०१८ पासूनची वेतनवाढ लागू न करणे, नियमितपणे वेतन न मिळणे, प्रसूती रजा नाकारणे, बोनस थांबवणे अशा विविध मुद्द्यांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. महापालिका कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम, सरचिटणीस सत्यवान जावकर, उपाध्यक्ष रंजना नेवाळकर, ज्येष्ठ चिटणीस हेमंत कदम, संजय वाघ, रामचंद्र लिंबारे, अतुल केरकर, संदीप तांबे यांच्यासह इतर पदाधिकारी आंदोलनस्थळी उपस्थित होते.
-------------------------------------------
घोषणांमुळे परिसर दणाणला
महापालिकेच्या ‘एफ’ दक्षिण विभागातील कार्यकारी आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर आदोलकांनी निदर्शने केली. आपला आवाज विधानसभेत पोहोचवावा, अशी मागणी कामगार संघटनांनी केली. २०१४ पासून सातत्याने सेवा देत आहोत. कोविडच्या काळात जीव धोक्यात घालून काम केले; पण तरीही हक्क मागण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागते, अशी खंत व्यक्त करताना कर्मचाऱ्यांनी वेतनवाढ हवीच, वेतन वेळेत हवे, प्रसूती रजा मिळाल्याच पाहिजेत, कंत्राटी पद्धतच नको, अशा आशयाच्या घोषणा दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.