अदाणींचे टॉवर शेलू-वांगणीला बांधा
अदाणींचे टॉवर शेलू-वांगणीला बांधा
उद्धव ठाकरे : गिरणी कामगारांना मुंबईतच घरे द्या
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : गिरणी कामगारांनी मुंबई घडवली आहे. त्यांना शेलू-वांगणीला ढकलले जात आहे. धारावी आणि कुर्ला मदर डेअरीसारख्या जागांवर कामगारांसाठी घरे उभारा आणि अदाणींचे टॉवर वांगणी आणि शेलू येथे बांधा, अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गिरणी कामगारांसाठी मुंबईतच हक्काची घरे देण्याची मागणी केली.
आंदोलनात आमदार भाई जगताप, आमदार आदित्य ठाकरे, आमदार अजय चौधरी यांसह खासदार अरविद सावंत, मनसे नेते बाळा नांदगावकर, गिरणी कामगार नेते बी. के. आंब्रे, उदय भट, भाकपचे प्रकाश रेड्डी, गोविंद मोहिते, बाळ खवणेकर यांच्यासह १४ गिरणी कामगार संघटनेचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
उद्धव ठाकरे आझाद मैदानात गिरणी कामगारांच्या मागण्यांसाठी आयोजित आंदोलनात बोलत होते. या वेळी त्यांनी सरकारवर हल्ला चढवला. ते म्हणाले, महायुती सरकारकडे गिरणी कामगारांचा प्रश्न सोडवण्याची धमक नाही. या सरकारचे मालक दिल्लीला तर नोकर येथे बसले आहेत. ते मराठी माणसाच्या मुळावर उठले आहेत.
धारावीच्या पुनर्विकासात अदाणी समूहाला दिलेली संधी हा मराठी माणसाच्या हक्कांवर गदा आणणारा निर्णय असल्याचा आरोप करून ठाकरे म्हणाले, की धारावी आणि कुर्ला डेअरीची जागा गिरणी कामगारांना देण्यात यावी.
शिवसेनेचे सर्व आमदार या प्रश्नावर सभागृहात आवाज उठवतील. महायुतीच्या काळात मराठी माणसाला न्याय मिळणार नाही; पण शिवसेना कामगारांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असे आश्वासन त्यांनी दिले.
-----
१५ मार्च २०२४च्या शासन निर्णयानुसार गिरणी कामगारांनी मुंबईबाहेर घरे घेतली नाहीत, तर त्यांना यादीतून वगळले जाईल, असा अजब निर्णय सरकारने घेतला आहे. मुंबईतील चार-पाच गिरणींच्या जागांवर सरकारने घरे बांधली तर हा प्रश्न सुटू शकतो.
- आमदार जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)
.........
चड्डा नावाच्या विकसकाने शेलू-वांगणीतील गृहप्रकल्पांसाठी सरकारबरोबर करार केला आहे; पण गिरणी कामगारांना ती घरे नको आहेत. एनटीसीच्या मुंबईतील जागांवरच त्यांना घरे द्यावीत.
- आमदार सचिन अहिर
-----
१९८२ पासूनचा हा लढा आहे. गिरणी कामगारांनी स्वातंत्र्यानंतरच्या मुंबईच्या उभारणीत मोलाचा वाटा उचलला आहे.
- आमदार भास्कर जाधव
--------------
मुंबई ही गिरणी कामगारांच्या घामाने घडलेली आहे. आज त्यांची अवस्था दयनीय आहे. हे सरकार खोटे बोलते आणि सत्तेत येताच मग्रूरपणा करते. महाविकास आघाडीचे सरकार पडले नसते तर गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न आम्ही सोडवला असता.
- आमदार जितेंद्र आव्हाड
---
आंदोलन स्थगित; उद्या
विधान भवनात बैठक
गुरुवारी संध्याकाळी साडेचार वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघटनेच्या नेत्यांना गिरणी कामगार प्रश्नावर चर्चेसाठी विधान भवन येथे निमंत्रित केले आहे. कामगारांच्या मनातील आणि कामगारांना मान्य होईल, असाच तोडगा काढण्यात येईल, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांनी आझाद मैदानावरील सभेत बुधवारी दिली. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.