बोलबच्चन टोळ्यांचे पुन्हा डोके वर

बोलबच्चन टोळ्यांचे पुन्हा डोके वर

Published on

बोलबच्चन टोळ्यांचे पुन्हा डोके वर
महिलांचाही सहभाग स्पष्ट झाल्याने पोलिस यंत्रणेच्या डोकेदुखीत वाढ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० ः शहरातील ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यात चालता बोलता अगदी सहजपणे लुबाडणाऱ्या बोलबच्चन टोळ्यांचा उपद्व्याप वाढीस लागला आहे. कधी काळी कल्याणनजीकच्या आंबिवली गावातल्या इराणी टोळ्यांची मक्तेदारी असलेल्या या गुन्हे प्रकारात आता ठिकठिकाणच्या महिला आणि गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्यांनी उडी घेतली आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणेची डोकेदुखी वाढल्याची चर्चा आहे.

गुन्ह्याची पद्धत
पादचारी ज्येष्ठ नागरिकांना, विशेषतः वृद्ध महिलांना लक्ष्य करून त्यांना पोलिस असल्याचे भासवून मध्येच रोखले जाते. पोलिस आहोत, पुढे दंगल सुरू आहे, हत्या झाली आहे, त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या प्रत्येकाची झाडाझडती सुरू आहे, अशी भीती घातली जाते किंवा आमच्या मालकाला बऱ्याच वर्षांनी मूल झाले, त्या आनंदात तो गरीब गरजू महिलांना साडी वाटतो आहे, असे प्रलोभन दाखवले जाते. दोन्ही प्रसंगांत वृद्ध महिलांना अंगावरील दागिने हातात काढून घ्या, अशी सूचना केली जाते. महिलेने दागिने काढले की ते तिच्या पिशवीत ठेवण्यास मदत करण्याच्या बहाण्याने आरोपी हातचलाखीने ते आपल्याकडे घेतात आणि पोबारा करतात. काही वेळाने जेव्हा ही महिला आपल्याच पिशवीतून पोलिस आहोत असे सांगणाऱ्यांनी खोचलेली कागदी पुडी उघडून पाहते तेव्हा त्यात दागिने नसून दगड, माती असते.

फसवणुकीसाठी ही निमित्ते
थांबा, आम्ही पोलिस आहोत. पुढे दंगल सुरू आहे/हत्या झाली आहे/चोरी झाली आहे. तपासणी सुरू आहे, हे निमित्त आतापर्यंत घडलेल्या बहुतांश गुन्ह्यांमध्ये आरोपींनी वापरले आहे. दागिने काढून ठेवा, नाही तर तुमचीही संशयित म्हणून चौकशी होईल, हे निमित्त वृद्धांना हमखास जाळ्यात ओढते.

शेठला मुलगा झालाय
आमच्या शेठला बऱ्याच वर्षांनी अपत्यप्राप्ती झाली असून, तो साड्या वाटतोय. अंगावरचे दागिने काढून ठेवा म्हणजे तुम्हीही गरजू भासाल. तुम्हालाही साडी मिळेल. आरोपींच्या या प्रलोभनालाही अनेक वृद्ध महिला आजतागायत बळी पडल्याची नोंद पोलिस दफ्तरी आहे.

मोफत धान्य वाटप, वैद्यकीय शिबिर
अलीकडे मोफत धान्य वाटप योजना, मोफत बॉडी चेक अप इत्यादी निमित्तांनीही भामटे नागरिकांना लुबाडत आहेत. शहरातील शासकीय रुग्णालयांबाहेर आम्ही पालिका कर्मचारी आहोत. तुम्ही तुमचे बॉडी चेक अप करून घेतले का? सध्या आमच्या रुग्णालयात गरीब, गरजूंसाठी ही योजना सुरू आहे, असे भासवत आरोपी टोळ्या वृद्ध महिलांना लक्ष्य करीत आहेत.

महिलांचाही सहभाग
अलीकडेच दादर येथे घडलेल्या घटनेत बोलबच्चन टोळ्यांमध्ये महिला आरोपींचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. प्रभादेवी येथे एकाकी राहणाऱ्या पुष्पा शेट्टी (७७) पायी जात असताना एका अनोळखी महिलेने त्यांना अडवले. सरकारने वृद्धांसाठी पेन्शन योजना सुरू केली असून, त्यासाठीचे फॉर्म कबुतरखाना येथे मिळतात, असे सांगत महिलेने पुष्पा यांना टॅक्सीतून नेले. प्रवासादरम्यान महिलेने अंगावरील सोन्याचे दागिने काढून ठेवा नाहीतर कोणीतरी चोरेल, असे सांगितले. पुष्पा यांनी अंगावरील सुमारे साडेतीन तोळ्यांचे दागिने काढून महिलेच्या हाती दिले. ते या महिलेने पुष्पा यांच्या पिशवीत ठेवण्याच्या बहाण्याने स्वतःकडे घेतले. काही वेळाने पुष्पा यांना टॅक्सीतून उतरवून ही महिला पुढे निघून गेली. टॅक्सीतून उतरल्यावर पुष्पा यांनी पिशवी चाचपली तेव्हा त्यात दागिने नव्हते.

संशय का नाही?
इराणी तरुण नैसर्गिकरीत्या साध्या कपड्यांमध्येही पोलिसांसारखे भासतात. त्यामुळे रस्त्यात अडवणूक करणारे पोलिसच असावेत, असा नागरिकांचा समज होतो.

अटक करणे आव्हान
या गुन्हेगारीतील बहुतांश आरोपी आंबिवलीतील आपल्या वस्तीत राहतात. त्या वस्तीत जाऊन त्यांना अटक करणे पोलिसांना अशक्य ठरते. या वस्तीत शिरताच पोलिसांवर हल्ला होतो. महिलांची फळी पोलिसांच्या अंगावर धावून जाते. आरोपीला लपण्यासाठी अनेक घरे, जागा उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळे या वस्तीत जाऊन कारवाई करण्याऐवजी पोलिसांना वेगवेगळ्या निमित्ताने आरोपीला वस्तीबाहेर आणावे लागते. त्यात बराचसा वेळ वाया जातो.

पोलिसांचे आवाहन
पोलिस कधीच कुणाला दागिने काढून ठेवा असे सांगत नाहीत, हे सर्वप्रथम नागरिकांनी लक्षात घ्यावे. पोलिस आहे, असे सांगणाऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. त्याच्याकडे ओळखपत्र मागा. ती व्यक्ती खरेच पोलिस असल्यास त्वरित ओळखपत्र दाखवेल, ते पाहा. शंका आल्यास तत्काळ १०० नंबरवर संपर्क साधा.

मोक्कानुसार कारवाई हवी
हा गुन्हा चोरीचा, फसवणुकीचा, त्यासोबत विश्वासघाताचादेखील आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४)नुसार वयोवृद्ध, अशक्त व्यक्तींची फसवणूक केल्यास कडक शिक्षा ठरवण्यात आली आहे, मात्र तेवढ्यावर भागणारे नाही. या टोळ्यांचा गुन्हेगारी उद्देश, आधीपासून आखलेली रणनीती आणि टोळीतील समन्वय पाहता या प्रकरणांमध्ये मोक्कासारख्या कठोर कायद्यांचा वापर करणे आवश्यक आहे. समाजात भीती पसरवणाऱ्या अशा टोळ्यांचे नेटवर्क मोडून काढणारी कारवाई होणे अपेक्षित आहे, असे ॲड. विजय शेलार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com