रिक्षा टॅक्सी चालकांच्या मुजोरीला लागणार लगाम
रिक्षा-टॅक्सीचालकांच्या मुजोरीला लागणार लगाम
एकच टोल फ्री क्रमांकाला प्रवाशांची पसंती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : रिक्षा आणि टॅक्सीने प्रवास करायचा म्हटले तर चालक सातत्याने भाडे नाकारतात. त्यामुळे मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागतो. मुजोर रिक्षा-टॅक्सीचालकांची तक्रार करण्यासाठी परिवहन विभागाने प्रत्येक आरटीओसाठी व्हॉट्सॲप क्रमांक उपलब्ध करून दिला होता. मात्र मुंबईत चार आरटीओ कार्यालये असल्याने प्रवाशांचा गोंधळ होत होता. काही दिवसांपूर्वी मुंबई महानगर प्रदेशासाठी सुरू केलेल्या एकाच टोल फ्री क्रमांकामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. २६ दिवसांत ९५ तक्रारी आल्या असून, सर्वाधिक तक्रारी जादा भाडे आकारण्याच्या आहेत.
संपूर्ण मुंबई क्षेत्र विकास प्राधिकरणासाठी प्रवासी (आरटीओ विभाग प्रवासी मदत कक्ष) टोल फ्री क्रमांक १८०० -२२०-११० प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पश्चिम) येथे १६ जूनपासून २४ तासांसाठी सुरू करण्यात आला आहे. या टोल फ्री क्रमांकावर १६ जून ते १० जुलैपर्यंत भाडे नाकारणे, जादा भाडे आकाराणे, जादा प्रवासी वाहतूक, प्रवाशांशी उद्धट वर्तन करणे, मीटरमध्ये दोष याबाबत एकूण ९५ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो?
मुंबई महानगरात या वाहनांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रोज अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामध्ये प्रवाशांना भाडे नाकारणे, प्रवाशांशी उद्धट वर्तन, गैरवर्तन, अधिकचे भाडे आकारणे, सार्वजनिक वाहनात प्रवाशांकडून वस्तू विसरल्यास त्या परत न करणे, प्रवाशांना लांबच्या रस्त्याने दुरून इच्छितस्थळी पोहोचवणे, वाहनांच्या क्षमतेपेक्षा अधिकचे प्रवासी बसवणे, नादुरुस्त वाहन रस्त्यावर चालवणे या प्रमुख अडचणींचा समावेश आहे.
कुठे करणार संपर्क?
रिक्षा, टॅक्सी तसेच ॲप आधारित ओला, उबेर इत्यादी वाहनांच्या चालकांविरुद्ध प्रवाशांना भाडे नाकारणे, गैरवर्तन, अतिरिक्त भाडे आकारणे अशा प्रकारच्या तक्रारीकरिता प्रवाशांना तक्रारीचे निरसन करता यावे, बेशिस्त चालकाविरुद्ध कारवाई करता यावी, यासाठी संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणासाठी प्रवासी (आरटीओ विभाग प्रवासी मदत कक्ष) - टोल फ्री क्रमांक - १८०० -२२०-११० प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पश्चिम) येथे सुरू करण्यात आला आहे.
तक्रार प्रकार = संख्या
भाडे नाकारणे - २८
जादा भाडे आकारणे - ३१
जादा प्रवाशांची वाहतूक करणे - १
उद्धट वर्तन करणे - १७
वेगाने वाहन चालविणे - ४
मीटरमध्ये दोष - १
नो पार्किंग - १३
एकूण -९५
विमानतळ असो किंवा रेल्वेस्थानक अनेक ठिकाणी रिक्षा-टॅक्सीचालक दुप्पट, तिप्पट भाडे घेतात. परिवहन विभागाने तक्रारीसाठी एकच टोल फ्री क्रमांक केला ही चांगली बाब आहे. परंतु तक्रारीनंतर लवकरात लवकर कारवाई व्हावी, जेणेकरून इतर चालक नियमांचे पालन करतील.
- जयंत जाधव, प्रवासी
परिवहन विभागाचे आवाहन
१६ जूनपासून हा टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आला आहे. २४ तास हा टोल फ्री क्रमांक प्रवाशांसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे या क्रमांकावर संपर्क करून तुम्ही तक्रार करू शकता, असे आवाहन परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.