सीनियर सिटिझन्स’साठी स्वतंत्र डबा!
लोकलच्या गर्दीत ज्येष्ठांचा प्रवास सुकर
लोकलमध्ये स्वतंत्र डबा सुरू; ८८ वर्षांच्या प्रवाशाला प्रथम मान
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : लोकलमधील गर्दीत जागेसाठी धडपडणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आता गाडीत हक्काचा डबा मिळाला आहे. मध्य रेल्वेने ६५ वर्षांवरील नागरिकांना ‘सिर्फ सीनियर्स’ या नावाने स्वतंत्र डबा दिला आहे. गुरुवारी (ता. १०) दुपारी ३.४५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटलेल्या डोंबिवली लोकलमध्ये या डब्याचा प्रारंभ झाला. ८८ वर्षीय राजपथ उपाध्याय यांना या डब्यातून प्रवास करण्याचा पहिला मान मिळाला.
लोकलमधील गर्दी, धक्काबुक्की यामुळे वयोवृद्धांना प्रवास करणे जिकिरीचे झाले होते. त्यामुळे अनेक वर्षांपासून ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डबा देण्याची मागणी रेल्वेकडे होत होती. या पार्श्वभूमीवर २००९मध्ये ए. बी. ठक्कर या सामाजिक कार्यकर्त्याने मुंबई उच्च न्यायालयाला पत्र लिहून याकडे लक्ष वेधले. न्यायालयाने यावर जनहित याचिकेच्या रूपात सुनावणी घेऊन रेल्वेला ज्येष्ठांसाठी स्वतंत्र आसन व डबा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मध्य रेल्वेने लोकलच्या एका मालवाहू डब्याचे रूपांतर ज्येष्ठांसाठी राखीव डब्यात केले आहे.
-----
माटुंगा कार्यशाळेत डब्याला आकार
सुविधांनी परिपूर्ण असलेला हा डबा माटुंगा रेल्वे कार्यशाळेत तयार झाला आहे. तांत्रिक पथकाने या डब्याचे अंतरंग आणि रचना पूर्णपणे बदलली आहे. डब्यात तीन ३ सीटर बेंच आणि दोन २ सीटर युनिट बसवले असून, त्यामुळे एकूण १५ आसनांची वाढ झाली आहे. डब्याच्या दरवाजांवर खांब, सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. तसेच स्टेनलेस स्टील ट्युबलर पार्टिशन्सने डब्याचे आंतरिक विभाजन करण्यात आले आहे. त्यामुळे चढ-उतारासाठी ते सोयीस्कर झाले आहे.
----
असा होणार दंड...
रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले, की हा डबा केवळ ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठीच राखीव आहे. इतर प्रवाशाने या डब्यात प्रवेश केल्यास त्याच्यावर १०० रुपये ते १,००० रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
------
लवकरच सर्व लोकलमध्ये सुविधा
गर्दीचा सर्वाधिक भार असलेल्या सीएसएमटी-डोंबिवली मार्गावर पहिल्यांदा ज्येष्ठ नागरिकांसाठी आरक्षित डबा सध्या जोडण्यात आला आहे. पुढील दीड ते दोन वर्षांच्या कालावधीत मध्य रेल्वेच्या सर्व लोकल गाड्यांत या डब्यांची उभारणी केली जाणार आहे, अशी माहिती रेल्वेने दिली आहे.
------------
रेल्वे प्रवासात ज्येष्ठ नागरिकांचा आदर राखणे ही समाजाची जबाबदारी आहे. त्यांच्यासाठी स्वतंत्र डबा हे केवळ सुविधा नाही, तर सामाजिक कर्तव्यही आहे. लवकरच प्रत्येक लोकलमध्ये असा डबा असेल.
- डॉ. स्वप्नील नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे
..........
आमच्यासाठी हा डबा सन्मान आहे. एवढे वय झाले तरी लोकलमधून प्रवास करण्याची गरज असते. दरवेळी दरवाजात उभे राहून धक्के खात प्रवास करणे झेपत नाही. आज पहिल्यांदाच डब्यात आरामात बसून प्रवास केला. हा खूप आनंददायी क्षण होता.
- राजपथ उपाध्याय, पहिले ज्येष्ठ प्रवासी
---
आमची काही वर्षांपूर्वीपासून ही मागणी होती. तेव्हा अंगात ताकद होती, पण गर्दीत कोंडी होत होती. आता वय झाले आहे. चालणे मंद झाले आहे. आता हा डबा मिळाल्याचा आनंद आहे. थोडा उशीर झाला आहे, पण तेही कमी नाही. आता तरी निवांत प्रवास होईल.
- मोहम्मद इस्माईल, ७० वर्षे
........
डब्याची वैशिष्ट्ये
- तीन ३ सीटर बेंच आणि दोन २-सीटर युनिट (९+४ आसनक्षमता)
- स्टेनलेस स्टील ट्युबलर पार्टिशन
- दरवाजाच्या पायदानावर पकडण्यासाठी खांब
- दोन्ही दरवाजांच्या अंडरफ्रेमवर आपत्कालीन शिडी
----------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.