मुस्लिम समाजाला ठाकरेंकडून अपेक्षा!
मुस्लिम समाजाला ठाकरेंकडून अपेक्षा!
मराठी मुस्लिम सेवा संघाचा ठाकरे बंधूंना पाठिंबा; राजकीय भूमिकेकडे लक्ष्य
मिलिंद तांबे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : महाराष्ट्राच्या अस्मितेचे रक्षण आणि मराठी भाषेच्या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या ऐतिहासिक पुढाकाराला मराठी मुस्लिम सेवा संघाने ठाकरे बंधूंना पत्र लिहून पाठिंबा जाहीर केला आहे. ठाकरे बंधूंना लिहिलेल्या पत्रात त्यांनी ‘सर्वसमावेशक’ भूमिका घेऊन ‘राजधर्म’ पाळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. यावर ठाकरे बंधू काय निर्णय घेतात, याकडे मुस्लिम समाजाचे लक्ष लागले आहे.
मुंबईत मुस्लिम मतदारसंख्या अंदाजे १५-१८ लाख इतकी आहे. मागील लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला १० ते १२ लाख मते, म्हणजेच सुमारे ६५ ते ७५ टक्के मुस्लिम मते मिळाली होती. विधानसभा निवडणुकीतही मुस्लिम मतांच्या जोरावरच महाविकास आघाडीचे उमेदवार काठावर निवडणूक जिंकले होते. या मतांच्या जोरावरच महाविकास आघाडीने खासकरून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने चमकदार कामगिरी करत भाजपसमोर ‘अजून ताकद बाकी आहे’ असा संदेश दिला होता.
मागील निवडणुकांसाठी उद्धव ठाकरे यांनी मुस्लिमांना सोबत घेऊन निवडणुकीला सामोरे जाण्याची रणनीती आखली होती, तर राज ठाकरे यांनी मात्र त्यांच्याविरोधात भूमिका घेतली होती. राज ठाकरे यांनी मनसेच्या स्थापनेनंतर सुरुवातीच्या काळात मुस्लिम समाजाविरोधात काही आक्रमक विधाने केली होती. मशिदींवरील भोंग्यांपासून ते पाकिस्तानविरोधी टीका करणाऱ्या आक्रमक भाषणांपर्यंत त्यांनी टीकेची झोड उठवली होती. त्यामुळे मुस्लिम समाजाने त्यांच्यापासून काहीसे अंतरच ठेवले होते. त्यामुळे आता ठाकरे बंधू एकत्र आल्यास मुस्लिम समाजाचा कल महत्त्वाचा ठरणार आहे.
मराठी मुस्लिम सेवा संघाचे सरचिटणीस कॅप्टन अकबर महम्मद खलफे यांनी दोन्ही ठाकरे बंधूंना स्वतंत्र पत्र पाठवून अभिनंदन केले आहे. पत्रात भारतीय जनता पक्षावर थेट आरोप करत, गेल्या काही वर्षांपासून राज्यात आणि देशात मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी जातीय आणि प्रांतीय नंगानाच सुरू आहे. याला जोरदार चाप बसणे अत्यंत आवश्यक आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मराठी अस्मितेसाठी लढणाऱ्या नेतृत्वासोबत आम्ही खंबीरपणे उभे राहू, असा निर्धारही या पत्रात दिसून येतो.
राजकीय वर्तुळात या पाठिंब्याला मोठे महत्त्व आहे. एकीकडे ठाकरे बंधूंची समीकरणे बदलत असताना, मराठी मुस्लिम समाजाचा जाहीर पाठिंबा ही आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णायक घडामोड ठरू शकते. कदाचित मुस्लिम समाजालाही चांगला पर्याय उभा राहताना दिसत आहे.
- प्रताप आसबे, राजकीय विश्लेषक
भाजपकडून सातत्याने होणाऱ्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणाला मुस्लिम समाज कंटाळला आहे. तो नवीन पर्याय शोधत आहे. ठाकरे बंधूंनी आपल्या भूमिकेत वास्तविक बदल दाखवला, संवाद साधला तर मुस्लिम समाजाची मते दोघांनाही मिळू शकतात.
- हेमंत देसाई, राजकीय विश्लेषक
मराठीपणावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासोबत आम्ही आहोत. धर्म महत्त्वाचा नाही, मातीतली नाळ महत्त्वाची आहे. ठाकरे बंधू सर्वधर्म समभावाची भूमिका घेऊन पुढे येतील, अशी अपेक्षा आहे.
- कॅप्टन अकबर महम्मद खलफे,
सरचिटणीस, मराठी मुस्लिम सेवा संघ
मुस्लिम मतदारसंख्येचे प्रमाण अधिक असलेले प्रमुख विधानसभा मतदारसंघ :
१. भायखळा – ४० टक्के
२. बांद्रा (पश्चिम व पूर्व) - ३८
३. कुर्ला - ४२ टक्के
४. मालाड (पश्चिम) - ३० टक्के
५. धारावी - ३० टक्के
६. मानखुर्द-शिवाजीनगर - ६८ टक्के
७. चांदिवली - ३० टक्के
८. मुंबादेवी - ३३ टक्के
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.