मैदान धर्मिक उपासनेसाठी

मैदान धर्मिक उपासनेसाठी

Published on

मैदान धार्मिक उपासनेसाठी
जैन जिमखान्याच्या निर्णयाविरोधात सामाजिक संघटनांचा एल्गार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : मरीन लाइन्स परिसरात १८३२ पासून अस्तित्वात असलेल्या ऐतिहासिक विल्सन जिमखान्याचे मैदान जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन (जिओ) या संस्थेला ३० वर्षांसाठी धार्मिक उपासनेसाठी भाडेपट्ट्यावर देण्यात आल्याने तीव्र संतापाची लाट उसळली आहे. ‘खेळाच्या मैदानाचा धार्मिक हेतूसाठी वापर नको’ अशी स्पष्ट भूमिका ‘आम्ही गिरगावकर’ टीमसह अनेक सामाजिक संघटनांनी, नागरिकांनी आणि क्रीडाप्रेमींनी मांडली आहे.
‘आम्ही गिरगावकर’ टीमचे प्रमुख मिलिंद वेदपाठक म्हणाले, मुंबईतील सर्वधर्मीय सांस्कृतिक आणि क्रीडा समरसतेचे प्रतीक आहे. इतिहासाने समृद्ध असलेल्या या मैदानाने अनेक दिग्गज खेळाडूंना घडवले आहे. आज मात्र याच भूमीचा खासगी धार्मिक वापरासाठी हस्तांतर केल्याची अत्यंत वाईट बाब पुढे आली आहे. खेळाच्या भूमीचा धर्माच्या नावावर ताबा, हा केवळ भूखंडाचा नाही तर मुंबईच्या एकात्मतेचा सौदा आहे. सरकारने यात हस्तक्षेप करून हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा तीव्र प्रतिक्रिया उमटतील, असा इशाराही वेदपाठक यांनी दिला आहे.
२०१५ मध्ये या मैदानाला लागलेल्या आगीत स्ट्रक्चरचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर व्यवस्थापनाने भाडेपट्टा नूतनीकरणासाठी प्रयत्न न केल्याने, मैदानाच्या मालकीसंबंधी हस्तक्षेप केला; मात्र भाडेपट्टा नवीकरणाऐवजी थेट जिओला ३० वर्षांचा अधिकार देण्यामागील पारदर्शकतेचा अभाव आणि राजकीय हस्तक्षेपाच्या आरोपांमुळे संताप वाढला आहे.
ख्रिश्चन रिफॉर्म युनायटेड पीपल्स असोसिएशन व इतर स्थानिक संस्था यावर आक्रमक झाल्या आहेत. मुंबईचा सांस्कृतिक आणि खेळाचा ऐतिहासिक वारसा विशिष्ट धार्मिक संस्थेला देणे म्हणजे समाजात तणाव वाढवणारा निर्णय आहे, असे म्हणत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे.

संघटनांची मागणी
- मैदान धार्मिक कामासाठी न वापरता सार्वजनिक खेळाच्या हेतूसाठी आरक्षण करावे.
- हस्तांतर प्रक्रियेची चौकशी आणि सार्वजनिक सुनावणी करावी.
- महाराष्ट्र सरकारने या निर्णयावर पुनर्विचार करावा.
......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com