जन्म दाखल्याची नोंद नाही, अन् गावात घर नाही!

जन्म दाखल्याची नोंद नाही, अन् गावात घर नाही!

Published on

जन्माची नोंद नाही अन् गावात घर नाही!
मुंबईत स्थलांतर झालेल्या मुलांसमोर शाळा शिकण्याचे आव्हान
संजीव भागवत : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : गावात घर नाही आणि मुंबईत राहायला ठिकाण नाही. जिथे जागा मिळेल तिथे पुलाखाली, गलिच्छ वस्त्यांशेजारी आपले पाल टाकून, तर कधी उघड्यावर जगणे सुरू ठेवलेल्या मुंबईतील शेकडो कुटुंबांची मुले शिक्षण हक्क आणि त्या अधिकारापासून वंचित राहिली आहेत. नुकत्याच सुरू असलेल्या शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणात उपनगरातील काही भागांत राज्यातील विविध जिल्ह्यांमधून स्थलांतरित झालेली मुले सापडली आहेत. मुलांकडे जन्माची नोंद नाही, आधार कार्ड अन् गावापासून ते शहरापर्यंत राहण्याचा ठिकाणाही नाही. त्यामुळे अशा मुलांना शाळांमध्ये प्रवेश द्यायचा कसा, असा गंभीर प्रश्न उभा टाकला आहे.
शालेय शिक्षण विभागाकडून १ ते १५ जुलैदरम्यान राज्यातील शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईतील काही शिक्षकांनी यासाठी स्वत:ला झोकून देत मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यात मानखुर्द-गोवंडी परिसरातील ज्येष्ठ शिक्षिका सांडभोर यांना तब्बल २९ हून अधिक शाळाबाह्य मुले सापडली आहेत. सोलापूर, लातूर, उस्मानाबाद अशा जिल्ह्यांतील स्थलांतरित कुटुंबांतील ही मुले असून, ती मानखुर्द येथील फायर ब्रिगेडजवळ असलेल्या पुलाखाली, त्याच्या शेजारी असलेल्या पालांवर भेटली आहेत. यातील बहुतेकांचे आई-वडील सिग्नलवर फुले व लिंबू-मिरची विकत असतात. या मुलांच्या जन्माचे दाखले नसल्याने त्यांना कोणी शाळेत घेत नाही. यामुळे त्यांना आपल्यासोबतच रस्त्यावर कामाला ठेवले असल्याचे पालकांकडून सांगण्यात आले. दुसरीकडे या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मानखुर्द येथील मातोश्री विद्यामंदिर शाळेच्या मुख्याध्यापक, शिक्षकांनी मोठा पुढाकार घेतला आहे. त्यांना शाळेची गोडी लागावी, यासाठी शाळांपर्यंत आणण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
मुंबई आणि परिसरात एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत विविध कारणांमुळे शाळा आणि एकूणच शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलांचे महापालिका शिक्षण विभागाच्या समग्र शिक्षा अभियानने सर्वेक्षण केले. यात मुंबईतील दोन हजार ३५१ शाळा परिसर आणि एक हजार ४४ वस्त्यांमध्ये तब्बल चार हजार १७८ मुले विविध कारणांमुळे शाळाबाह्य आढळली. त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले जात आहे.

कायद्यातील तरतूद
शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार सहा ते १४ वर्षांपर्यंतच्या प्रत्येक मुलाला शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्याची तरतूद करण्यात आली आहे. हा कायदा प्रत्येक राज्याला बंधनकारक आहे. विशिष्ट प्रकरणांमध्ये १८ वर्षांपर्यंतच्या वयोगटातील बालकांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देणेही बंधनकारक आहे.

सापडलेली शाळाबाह्य मुले
शाळाबाह्य मुलांमध्ये मंगेश काळे, वंश काळे, श्याम चव्हाण, सिद्धू काळे, संतोष पवार, कार्तिक पवार, प्रशांत पवार, अतिश काळे, कोमल चव्हाण, बालचंद्र काळे, जयश्री काळे, पूजा पवार, चेतन पवार, परशू पवार, सुवर्णा चव्हाण या मुलांचा समावेश आहे.

अडचणी आणि पर्याय
मुंबई आणि परिसरात शाळाबाह्य म्हणून नोंद झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्याकडे जन्मतारखेचे दाखले, आधार कार्ड आवश्यक आहे. यासाठी स्थानिक जिल्हाधिकारी, शिक्षण विभागाने एकत्र येऊन पर्याय काढणे आवश्यक आहे. आधार कार्ड असल्यास त्यांना सहज प्रवेश देता येतो. तसेच त्यांची नोंद सरल पोर्टल झाल्याने ते संचमान्यतेच्या प्रक्रियेचा भाग होतील. आधार कार्ड नसले तरी या विद्यार्थ्यांना अनुदानित, महापालिका इत्यादी शाळांमध्ये प्रवेश मिळेल; मात्र त्यांची सरल प्रणाली, युडायसमध्ये नोंद होणार नाही. पुढील शिक्षण घेताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल.

अशी घ्यावी लागेल मदत
शाळाबाह्य मुलांना शाळांसोबत जवळच फिरत्या शाळा, सिग्नल शाळा, पाषाण शाळांसारखे पर्याय उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. यासाठी स्‍थानिक प्रशासन, शालेय शिक्षण, समग्र शिक्षा अभियान आदींना एकत्रितपणे आर्थिक तरतूद करून वेगळी यंत्रणा राबवावी लागेल. आवश्यक असल्यास शिक्षणाच्या क्षेत्रातील सेवाभावी संस्था, अनुदानित शाळांची मदत घ्यावी लागेल.

मानखुर्दसारख्या परिसरात रस्त्याच्या सिग्नलवर फुले विकणारे अनेक पालक आहेत. त्यांची मुले शाळेत जात नाहीत. अशा मुलांना शाळेत आणण्याचा प्रयत्न आम्ही करतोय; मात्र यांच्याकडे जन्मदाखला, आधार कार्ड यापैकी कोणतीही कागदपत्रे नाहीत. त्यामुळे प्रवेश दिला तरी या विद्यार्थ्यांची आधार कार्डशिवाय युडायस पोर्टलमध्ये एन्ट्री करता येत नाही. अशा अनेक अडचणी त्यांच्या शिक्षणासाठी येत आहेत.
- सांडभोर, ज्येष्ठ शिक्षिका, मातोश्री विद्यामंदिर, मानखुर्द

--
शाळाबाह्य मोहिमेदरम्यान आढळलेल्‍या, शिक्षणापासून वंचित असलेल्‍या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले जाईल. तसेच शाळांमध्ये प्रवेश मिळवून दिला जाईल. त्यांच्या प्रमाणपत्रांसंदर्भातील अडचणी लक्षात घेऊन त्यावरही मार्ग काढता येईल. या मोहिमेत शिक्षकांकडून केले जाणारे कार्य हे कौतुकास्पद आहे.
-मुस्ताक शेख, शिक्षण निरीक्षक, उत्तर विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com