मुंबईतील डबेवाले संपवायचेच ठरवलंय का रेल्वेने?"

मुंबईतील डबेवाले संपवायचेच ठरवलंय का रेल्वेने?"

Published on

मालडबे कमी झाल्याने
मुंबईचे डबेवाले संकटात

लोकलमधील ज्येष्ठांच्या डब्याला विरोध

नितीन बिनेकर : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : मुंबईच्या उपनगरी लोकल सेवेतील मालवाहतूक डब्यांचे रूपांतर ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव डब्यांत करण्याचा रेल्वे प्रशासनाच्या निर्णयामुळे डबेवाल्यांची उपजीविका अडचणीत आली आहे. याचा फटका केवळ डबेवाल्यांनाच नव्हे, तर लाखो लघुउद्योजक, भाजीविक्रेते आणि फेरीवाल्यांना बसण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रशासनाने एकतर्फी निर्णय न घेता मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करून हा निर्णय बदलावा, अशी मागणी डबेवाल्यांनी केली आहे.

दररोज सुमारे दीड लाख जेवणाचे डबे विविध कार्यालयांत नियोजनबद्ध आणि शिस्तीचे पालन करून पोहोचवणाऱ्या सुमारे साडेचार हजार डबेवाल्यांचे काम रेल्वेच्या मालडब्यांवर अवलंबून आहे. आधीच एसी लोकलमुळे डबे वाहून नेणे अशक्य झाले असून, आता मालडबेही कमी केले जात असल्याने नियोजनच कोलमडल्याचे डबेवाल्यांचे म्हणणे आहे. सकाळी १० ते १२ या वेळेत तरी मालडबे वापरण्यास मिळावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. पूर्वी प्रत्येक लोकलमध्ये एक मालडबा राखीव होता. अलीकडे ते दिव्यांग आणि आता ज्येष्ठ नागरिकांसाठी देण्यात आले आहेत. आम्ही ठरावीक वेळात प्रवास करतो, तरीही आमच्यासाठी काहीच जागा उरलेली नाही, असे डबेवाल्यांनी सांगितले.

मुंबईच्या कष्टकऱ्यांवर अन्याय
मुंबई लोकल ही केवळ प्रवाशांची नव्हे, तर हजारो कुटुंबांची उपजीविका चालवणारी जीवनवाहिनी आहे. एका डबेवाल्याच्या रोजगारातून चार ते पाच कुटुंबे पोसली जातात. साडेचार हजार डबेवाल्यांमागे जवळपास २० हजार लोकांचे पोट भरते. त्यामुळे हा निर्णय एकतर्फी, असंवेदनशील आणि अन्यायकारक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
----
डबे वाढवायला हवेत
जर डबे काढवणार असाल तर एसी लोकलमध्ये प्रवेश द्या किंवा मालडबे वाढवा, अशी मागणी डबेवाल्यांच्या संघटनांनी केली आहे. संघटनेचे अध्यक्ष उल्हास मुके म्हणाले, ‘गर्दी लक्षात घेता डबे वाढवायला हवेत. आम्ही ठरावीक वेळेत प्रवास करतो. त्यामुळे संपूर्ण डबे काढणे चुकीचे आहे. याबाबत आम्ही रेल्वेशी पत्रव्‍यवहार करणार आहोत.’

भाजीवाले, छोटे विक्रेतेही अडचणीत
सुमारे अडीच लाख फेरीवाल्यांपैकी अनेक विक्रेते मालडब्यांतून शहरात भाजी आणतात. मालडबा नसेल तर आम्ही सामान कसे आणायचे? रोज रिक्षा परवडणार नाही, अशी प्रतिक्रिया राकेश कांबळे या विक्रेत्याने दिली.
----
रेल्वे प्रशासनाचा हा निर्णय डबेवाल्यांच्या जीवावर बेतणारा आहे. आम्ही गप्प बसणार नाही. लवकरच याविरोधात ठाम भूमिका मांडणार आहोत.
- उल्हास मुके, अध्यक्ष, मुंबई टिफीन बॉक्स सप्लायर्स असोसिएशन
------
आमचे काम आणि उपजीविकाच धोक्यात आली आहे. रोज हजारो घरांचे जेवण वेळेवर पोहोचवतो; पण आता आमच्याच घरात चूल पेटणार की नाही याची चिंता वाटते.
- सुनील शिंदे, खजिनदार, मुंबई डबेवाला संघटना

रेल्वेची भूमिका काय?
रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले, की ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित आणि आरामदायक प्रवास मिळावा म्हणूनच हा निर्णय घेण्यात आला आहे. काही वेळेत मालडब्यांचा वापर डबेवाल्यांना करण्यास परवानगी आहे; मात्र सर्व डबे त्यांच्या वापरासाठी राखीव ठेवणे शक्य नाही.
----
कुठे किती?
रेल्वे मार्ग डबेवाले
पश्चिम २,०००
मध्य १,८००
हार्बर ७००

------------------------------------------------------------------------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com