रक्षणकर्त्याकडूनच विश्वासाला तडा
मुंबई, ता. १४ : शेजारी राहणाऱ्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका पोलिस शिपायाने अतिप्रसंगाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना दक्षिण मुंबईतून समोर आली. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी मुंबई पोलिस दलाच्या सशस्त्र विभागात कार्यरत असलेल्या शिपायाला भारतीय न्याय संहिता आणि पॉक्सो कायद्यानुसार कारवाई करीत अटक केली आहे.
पीडित मुलगी, आरोपी शिपाई एकाच इमारतीत राहतात. रविवारी इमारतीतील सत्यनारायण पूजेचा प्रसाद घेण्यासाठी तरुणी तळमजल्यावर आली होती. प्रसाद घेऊन घरी जाण्यासाठी उद्ववाहिकेजवळ आली असताना आरोपीने तिला जबरदस्तीने जिन्यावर नेत अतिप्रसंगाचा प्रयत्न केला. हा प्रसंग पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या एका रहिवाशाने पाहिला होता. या घटनेची माहिती तत्काळ तरुणीच्या पालकांना देण्यात आली. त्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत विभागीय चौकशी सुरू केली आहे. घटनेनंतर पोलिसांनी इमारतीच्या तळमजल्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे चित्रण पडताळणीसाठी ताब्यात घेतले आहे. तसेच आरोपीची पार्श्वभूमीही तपासण्यात येत आहे.
-------------------------------
पोलिसांवरील दाखल गुन्हे
लाचखोरी : १ जानेवारी ते १० जुलै या कालावधीत राज्य पोलिस दलातील ७२ अधिकाऱ्यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहाथ अटक केली. या कारवायांमध्ये पोलिसांनी १८ लाख ९५ हजारांची लाच स्वीकारली. अटक केलेल्यांमध्ये प्रथम श्रेणीतील दोन, द्वितीय श्रेणीतील १५ आणि तृतीय श्रेणीतील ५५ पोलिसांचा समावेश आहे.
---------------------------------------------
भ्रष्टाचार ः ज्ञात उत्पन्नाच्या स्त्रोतापेक्षा अधिक संपत्ती गोळा केल्याबद्दल तीन पोलिसांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. तिघांकडे एकूण ३.८२ कोटींची बेहिशोबी मालमत्ता आढळली. या लाचखोरीत महसूल विभाग आघाडीवर असला तरी पोलिस आघाडीवर आहेत. या प्रकारात आतापर्यंत चारच गुन्हे दाखल असून, त्यातील तीन पोलिस खात्याशी तर एक महापालिकेशी संबंधित आहे.
--------------------------------------
अपहरण, खंडणी ः गेल्या महिन्यात सशस्त्र विभागात नियुक्त पोलिस शिपाई हेमंत कापसे, चंद्रशेखर दराडे यांच्यासह चौघांना पश्चिम उपनगरातील एका व्यापाऱ्याचे खंडणीसाठी अपहरण केल्याच्या आरोपात अटक करण्यात आली होती. या प्रकरणात लवकरच आरोपपत्र दाखल केले जाणार आहे.
-------------------------------------
कर्तव्य बजावण्यात कुचराई
गेल्या महिन्यात आयुक्तालयाने कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत एमआयडीसी पोलिस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजीव चव्हाण यांना निलंबित केले होते. पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैधरीत्या सुरू असलेल्या एका डान्सबारवर गुन्हे शाखेने धाड घालून तब्बल ५० बारबालांविरोधात कारवाई केली होती.
---------------------------------
सध्याचे पोलिस बल
- मुंबई पोलिस दलात सहाय्यक उपनिरीक्षक ते पोलिस शिपाई पदापर्यंतच्या अंमलदारांची संख्या ३५ हजारांच्या घरात आहे.
- पोलिस आयुक्त ते उपनिरीक्षक पदापर्यंतच्या अधिकाऱ्यांची संख्या साधारण चार हजारांच्या आसपास आहे.