‘चलो ॲप’ नीट चालेना!
‘चलो ॲप’ नीट चालेना!
- अर्ध्या तिकिटाची सुविधा नाही; वारंवार हॅंग होत असल्याने प्रवासी वैतागले
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : तंत्रस्नेही आणि ऑनलाइन कार्यपद्धतीचा स्वीकार करीत बेस्टने प्रवाशांच्या सुविधेसाठी ‘चलो ॲप’ सुरू केले; मात्र क्यूआर कोड स्कॅन करताना किंवा पेमेंट करताना ॲप वारंवार हँग होणे, अनेकदा तिकीट न निघताच पैसे बँकेतून वजा होणे, अशा असंख्य तक्रारी पुढे येत आहेत. याशिवाय नवी तिकीट प्रणाली लागू होऊन दोन महिने झाले, तरी ॲपमध्ये अर्ध्या तिकिटाचा पर्याय नसल्याने लाखो प्रवाशांना नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे. ‘चलो ॲप’संदर्भातील या अडचणींबाबत प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
जुलै २०२१ पासून बेस्टकडून डिजिटल तिकिटिंग, क्यूआर कोड स्कॅनद्वारे प्रवास, लाइव्ह बस ट्रॅकिंग, पास खरेदी सुलभ करणे, रोख व्यवहार कमी करून पारदर्शकता वाढवणे इत्यादी करणांसाठी ‘चलो ॲप’ सुरू केले. बेस्टने उचललेले हे डिजिटल पाऊल स्वागतार्ह ठरले. नव्या पिढीतील प्रवाशांसाठी हा अनुभव चांगला होता; मात्र ‘चलो ॲप’मधील तांत्रिक अडचणींमुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
याशिवाय बेस्ट प्रशासनाने ९ मेपासून सुधारित प्रवास भाडे लागू केले. किमान तिकीट १० रुपये केल्याने १२ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी अर्ध्या तिकिटाची सुविधा आहे. बेस्टमधून दररोज सुमारे २४ लाख प्रवासी प्रवास करतात. त्यापैकी चार ते पाच लाख प्रवासी अर्धे तिकीट घेतात. त्यापैकी ‘चलो ॲप’मधून तिकीट काढणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. दरम्यान, कंत्राटदार कंपनीने ‘चलो ॲप’ अद्ययावत न केल्याने त्यावर अर्ध्या तिकिटाचा पर्याय दिसत नसल्याने नाइलाजास्तव पूर्ण तिकीट काढावे लागत आहे.
----
डिजिटल तिकिटिंगबाबतच्या अडचणी
- ॲप वारंवार हँग होणे
- क्यूआर कोड स्कॅन करताना ॲप ठप्प पडणे
- बँकेतील पैसे वजा झाले तरी ॲपमधून तिकीट निघत नाही
- यूपीआय/वॉलेटद्वारे पेमेंट केल्यावर काही वेळा रिफंड मिळत नाही.
- ॲपमध्ये वॉलेट रिचार्ज केल्यानंतरही त्यातून तिकीट निघत नाही.
- लाइव्ह बस ट्रॅकिंगमध्ये बसचे अचूक लोकेशन दिसत नाही.
-
जीपीएस ट्रॅकिंगमधील अडचणी
- लाइव्ह बस ट्रॅकिंगमध्ये बसचे अचूक लोकेशन दिसत नाही.
- वेळापत्रकानुसार बस दाखवली जाते; पण प्रत्यक्षात बस येत नाही.
- कधी कधी बस ‘रद्द’ दाखवल्यानंतरही बस येते.
---
ग्राहक सेवेचा अभाव
- ॲपच्या माध्यमातून तक्रार केली, तरी वेळेत प्रतिसाद मिळत नाही.
- रिफंड प्रक्रिया खूपच धीमी आहे.
---
कोट
बेस्ट प्रशासनाकडे वेगळा आयटी विभाग आहे, तरीही ॲपमध्ये अनेक अडचणी आहेत. त्यामुळे प्रवासी आणि वाहकांमध्ये वादावादी होते. बेस्टने सुधारणा करावी.
- शशांक राव, सरचिटणीस, बेस्ट वर्कर युनियन
.........
‘चलो ॲप’मध्ये अर्धे तिकीट न दिसणे ही प्रवाशांची लूट आहे. कंत्राटदार कंपन्यांचे खिसे भरण्याचा हा प्रकार आहे. बेस्ट प्रशासनाने ताबडतोब सुधारणा करावी.
- दीपक चव्हाण, कार्याध्यक्ष, गणेशभक्त कोकण प्रवासी संघटना
---
लहान मुले मोबाईल वापरत नसल्याने आम्ही तो पर्याय ठेवला नाही; मात्र त्यामुळे काही प्रवाशांना अडचण येत असल्याचे निदर्शनास आल्याने तो पर्याय लवकर सुरू करण्यात येईल. शिवाय तांत्रिक अडचणी सोडवल्या जातील.
- प्रवीण शेट्टी, उप मुख्य व्यवस्थापक (वाहतूक), बेस्ट
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.