मेट्रोला आर्थिक पाठबळ

मेट्रोला आर्थिक पाठबळ

Published on

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : मुंबईसह एमएमआर क्षेत्रातील मेट्रो प्रकल्प ५, ६, ७ अ, ९, १० आणि १२ साठी आवश्यक निधी एमएमआरडीए कर्ज रूपाने उभारणार आहे. या कर्जाचे आकस्मिक दायित्व आणि परतफेडीच्या अनुषंगाने थकहमीला राज्य सरकारने मंजुरी दिल्याने सहा मेट्रो प्रकल्पांसमोरील आर्थिक निधीची वानवा आता पूर्णपणे संपणार आहे.
मुंबईसह एमएमआर क्षेत्रातील नागरिकांना वेगवान आणि आरामदायी प्रवास करता यावा, म्हणून एमएमआरडीएकडून मेट्रोचे जाळे उभारले जात आहे. भुयारी आणि एलिव्हेटेड अशा दोन्ही प्रकारचे मेट्रो मार्ग तयार केले जात असून, त्यासाठी हजारो कोटींचा निधी लागणार आहे. वेगवेगळ्या वित्तीय संस्थांकडून हा निधी कर्ज रूपाने उभा करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. मात्र कर्जासंदर्भात आकस्मिक दायित्व स्वीकारणे, परतफेडीच्या अनुषंगाने थकहमी सरकारने देणे आवश्यक होते. राज्य सरकारने कर्ज उभारण्यासाठी थकहमी तसेच आकस्मिक दायित्व स्वीकारण्याला मंजुरी दिली आहे. परिणामी एमएमआरडीएला सहजपणे कर्ज रूपाने उभारता येणार असल्याने मेट्रो प्रकल्पांच्या कामाला आणखी वेग येणार येणार आहे.
-------------------------------------
जबाबदारी एमएमआरडीएचीच
राज्य सरकारने मेट्रोसाठी घेतल्या जाणाऱ्या कर्जाला थकहमी दिली असली तरी मुद्दल, व्याज व इतर शुल्क यांच्या परतफेडीची प्राथमिक जबाबदारी एमएमआरडीएची राहणार आहे. त्यांनी परतफेड केली नाही तर राज्य सरकारवर कर्ज फेडण्याची जबाबदारी असेल, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

ग्राफिक्स
मेट्रो प्रकल्प आवश्यक निधी
मेट्रो - ५ ठाणे-भिवंडी-कल्याण
- लांबी - २५ किलोमीटर
- अंदाजित खर्च - ८,४१६ कोटी रुपये
----
मेट्रो - ६ स्वामी समर्थ नगर- विक्रोळी
- लांबी - १५.३१ किलोमीटर
- अंदाजित खर्च - ६,७१६ कोटी रुपये
----
मेट्रो ७ अ अंधेरी - छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ
- लांबी - ३.४ किलोमीटर
----
मेट्रो - ९ दहिसर-मिरा भाईंदर
- लांबी - ११.३ किलोमीटर
- मेट्रो ७ अ आणि ९ या दोन्ही मार्गिकांचा अंदाजित खर्च - ६,५१८ कोटी रुपये
----
मेट्रो - १० गायमुख - शिवाजी महाराज चौक मीरा रोड
- लांबी - ९ किलोमीटर
- अंदाजित खर्च - ३,६०० कोटी रुपये
----
मेट्रो -१२ कल्याण - डोंबिवली एमआयडीसी- तुर्भे - अमनदूत
- लांबी - २२.१७ किलोमीटर
- अंदाजित खर्च - ५,८६५ कोटी रुपये
--------

Marathi News Esakal
www.esakal.com