शिंदे-आंबेडकर युती

शिंदे-आंबेडकर युती

Published on

शिंदे-आंबेडकर युती
मराठी-दलित समीकरण की राजकीय ‘दबाव’


सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : आगामी महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेसोबत युती करीत ‘मराठी-दलित’ समीकरण साधण्याचा प्रयत्न केला आहे, या युतीची औपचारिक घोषणा झाली असली, तरी राजकीय वर्तुळात ही खेळी ‘प्रभावी मतपेढी’ऐवजी ‘राजकीय दबाव तंत्र’ म्हणून पाहिली जात आहे.

मतांचे नवे गणित की अस्तित्वाचा संघर्ष
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना सध्या भाजपच्या छायेत असून, मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी भाजपसाठी ‘उपयुक्त’ ठरावी, असा शिंदे यांचा प्रयत्न आहे. आघाडीतील स्थान टिकवण्यासाठी ते दलित मतांचा आधार शोधत आहेत. यासाठी आनंदराज आंबेडकर हे नाव पुढे आले असले, तरी प्रत्यक्षात जमिनीवर त्यांच्या पक्षाची ठोस संघटनात्मक ताकद दिसत नाही, तसेच प्रभावशाली स्थानिक नेतृत्व उभारण्यातही त्यांना अपयश आले आहे. आनंदराज आंबेडकर हे गेल्या लोकसभा निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघातून उभे राहिले होते. त्यांना जेमतेम १८ हजार मते मिळाली व त्याची अनामत रक्कमही जप्त झाली. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची दलित नेते जोगेंद्र कवाडे यांच्या पिपल्स रिपब्लिकन पक्षासोबतदेखील युती आहे.

ठाकरे बंधूंच्या एकीचा परिणाम
मनसे-ठाकरे युतीच्या चर्चांनी शिंदे गटाच्या गोटात खळबळ निर्माण केली आहे. विशेषतः मुंबईत ही आघाडी आकार घेतल्यास मराठी मतदार मोठ्या प्रमाणावर ठाकरे बंधूंकडे झुकण्याची शक्यता आहे, अशा स्थितीत या समीकरणाला काटशह देण्यासाठी शिंदेंकडे ‘दलित समीकरणा’शिवाय पर्याय उरणार नाही, हेच त्यांच्या आनंदराज आंबेडकर यांच्याशी केलेल्या युतीतून दिसते.

ही युती ठोस की केवळ गाजर
एकनाथ शिंदे यांची ही युती ‘सामाजिक समीकरण’ म्हणून मांडली जात असली, तरी प्रत्यक्षात ती सत्ताधारी महायुतीतील आपले राजकीय वजन वाढवण्याचा डाव आहे. रिपब्लिकन सेनेच्या मर्यादित प्रभावामुळे ही युती निवडणुकीच्या निकालांवर फारसा प्रभाव टाकेल, असे वाटत नाही. याचा युतीला ‘मतपेढीची जोडणी’ न मानता ‘दबावाची लढाई’ म्हणून पाहणे अधिक वास्तवदर्शी ठरेल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. राजकीय रणधुमाळीत युती-आघाड्या या निवडणूकपूर्व खेळाच्या महत्त्वाच्या शस्त्रास्त्रांपैकी एक आहेत; पण त्यांची परिणामकारकता निवडणुकीनंतरच्या आकड्यांवर ठरते, त्यामुळे शिंदे-आंबेडकर युतीच्या यशापयशाचे खरे मूल्यांकन तेव्हाच करता येईल.


आनंदराज आंबेडकर यांचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. त्यामुळे ही युती केवळ प्रतीकात्मक आहे. दबाव तंत्र म्हणून शिंदे ही चाल खेळत आहेत. ठाकरे बंधूंची जवळीक वाढत असल्याने शिंदे सावध झाल्याचे दिसते.
- जयंत माईनकर, राजकीय विश्लेषक


शिंदे यांना भाजपकडून अधिक महत्त्व मिळावे म्हणूनच ही युती आखलेली आहे; पण या युतीतून कोणतीही ठोस निवडणूक फळे त्यांना मिळतील, असे वाटत नाही. ठाकरेंपेक्षा शिंदे यांना भाजपला आपली ताकद दाखवायची आहे.
- प्रताप आसबे, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक


युतीचा संभाव्य राजकीय परिणाम
शिवसेना- ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या शक्यतेमुळे मराठी मतांमध्ये शिंदे गटाची पकड काहीशी घटली आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर घराण्याच्या थेट वारसासोबत युती करणे ही शिंदे यांच्यासाठी जमेची बाब ठरू शकते.
रिपब्लिकन सेना- पक्षाचे राजकीय अस्तित्व टिकवण्याचा मार्ग असू शकतो. सत्तेत वाटा मिळवून राजकीय ताकद उभी करण्याचा हा प्रयत्न आहे.
भाजप- ही युती भाजपसाठी दोन्ही बाजूने फायदेशीर ठरू शकते. भाजपवरील नाराज दलित मते शिंदेंच्या बाजूने वळवण्यात यश आल्यास भाजपला फायदा होईल.
शिवसेना (उबाठा)- लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मुंबईतील दलित मतदार मोठ्या प्रमाणात ठाकरेंकडे झुकला होता. आनंदराज आंबेडकर यांच्यामुळे त्यातील काही टक्के मतदार शिंदेंकडे वळला तर सेनेला फटका बसू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com