एसटीला ७० लाखांचा ‘टोल’ भुर्दंड
एसटीला ७० लाखांचा ‘टोल’ भुर्दंड
इलेक्ट्रिक बसच्या टोलमाफीचे परिपत्रकच नाही
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता १६ : मुंबई व ठाण्यातून पुण्याला जाणाऱ्या-येणाऱ्या एसटीच्या एकूण साधारण १०० इलेक्ट्रिक बस सुरू असून, त्यातील काही बसला प्रति फेरी १,८८० तर काही बसना प्रति फेरी २,०४५ रुपये इतका टोल भरावा लागत आहे. इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफीची घोषणा सरकारकडून करण्यात आली, पण त्याचे परिपत्रक काढण्यात आले नाही. त्यामुळे एसटीला एकट्या पुणे मार्गावर महिन्याला अंदाजे ७० लाख रुपयांचा भुर्दंड सोसावा लागत आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या परळ आगारात दादर-पुणे मार्गावर धावणाऱ्या एकूण २६ इलेक्ट्रिक बस आहेत. एका बसच्या दिवसभरात तीन फेऱ्या होत असून, त्यानुसार २७ बसच्या ८१ फेऱ्या होतात. त्याचप्रमाणे स्वारगेट आगाराच्या एकूण ३३ बस आहेत. यामध्येही एका बसच्या दिवसभरात तीन फेऱ्या होत असून, त्यानुसार ३३ बसच्या प्रतिदिन एकूण ९९ फेऱ्या होतात. तर ठाणे आगारात एकूण १५ बस असून, त्यांच्याही दिवसभरात तीन फेऱ्यानुसार १५ बसच्या ४५ फेऱ्या होतात. दुसरीकडे बोरिवली येथे आठ बस आहेत. यामध्ये दिवसभरात तीन फेऱ्यानुसार आठ बसच्या २४ फेऱ्या होतात. पुणे रेल्वे स्थानक आगारातील १७ इलेक्ट्रिक बसच्या ५१ फेऱ्या होतात. याशिवाय अटल सेतूमार्गे बस गेल्यास स्वारगेट येथे जाण्यासाठी ३,१२५ आणि चिंचवड येथे जाण्यासाठी ३,२९० रुपये इतका टोल या इलेक्ट्रिक बसला भरावा लागतो.
===
आकडेवारी
ई-बस - ३८४
ई-शिवनेरी - ९७
शिवाई - ४७
नवीन ई-बसेस- २४०
एसटीचे ५,१५० ई-बसचे लक्ष्य
२४० बस ताफ्यात दाखल
उर्वरित ४,९१० बस दोन ते तीन वर्षांत सेवेत येणार
पर्यावरणाच्या दृष्टीने विजेवरील गाड्या मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्या पाहिजेत, या दृष्टीने या गाड्यांना टोलमाफीचा निर्णय घेतला होता; मात्र यासंदर्भातील परिपत्रक सरकारने तत्काळ जारी केले पाहिजे.
- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस
ई-बसच्या टोलमाफीसंदर्भातील पत्र मी पाहिले आहे. या बसला टोलमधून सूट देण्याबाबत पाठपुरावा सुरू असून, लवकरात लवकर याबाबतचा शासन निर्णय काढला जाईल.
- प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.