मुंबईत ओझोन प्रदूषण चिंताजनक

मुंबईत ओझोन प्रदूषण चिंताजनक

Published on

मुंबईत ओझोन प्रदूषण चिंताजनक
उन्हाळ्यासह हिवाळ्यातही धोका; चकाला, भायखळा, खेरवाडीत सर्वाधिक

मुंबई, ता. १६ : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत यंदाचा उन्हाळा प्रदूषणाच्या दृष्टीने चिंताजनक ठरला आहे. मार्च ते मे २०२५ दरम्यान शहराने ३२ दिवस ‘जमिनीवरील ओझोन’चे आठ तासांचे मानक ओलांडले असून, चकाला परिसरात सलग २९ दिवस हे मानक पार केले गेले, अशी धक्कादायक माहिती सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंटच्या अहवालात उघड झाली आहे.

यंदा जरी गेल्या वर्षाच्या तुलनेत ४२ टक्के घट झाली असली, तरीही ओझोन प्रदूषणाचे हॉटस्पॉट्स शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने चिंता वाढली आहे. सलग २९ दिवस ओझोन मानक ओलांडून चकाला परिसर सर्वाधिक प्रदूषणग्रस्त ठिकाण ठरले आहे. त्यानंतर भायखळा आणि खेरवाडी या भागांची नोंद झाली आहे.

मुंबईसाठी २९ मार्च हा दिवस शहरासाठी सर्वाधिक धोकादायक ठरला. या दिवशी ३१ पैकी आठ ठिकाणांवर ओझोनचे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक नोंदले गेले. साधारणपणे ज्या भागात वाहतुकीमुळे नायट्रोजन डायऑक्साइडचे प्रमाण अधिक असते, तिथे ओझोन कमी होतो. चकालासारख्या ठिकाणी दोन्ही प्रदूषक एकत्र उच्च स्तरावर असल्याचे दिसते.

‘सीएसआय’च्या अभ्यासानुसार, यंदा ओझोनचा प्रभाव संध्याकाळपर्यंत आणि सूर्यास्तानंतरही हवेत राहिला; मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा प्रति तास ओझोनचा सरासरी उच्चांक ३५ टक्क्यांनी कमी आहे. हिवाळ्यातही मुंबईत ओझोन प्रदूषणाचा धोका कायम आहे. डिसेंबर २०२४ ते फेब्रुवारी २०२५ दरम्यान ८७ दिवस ओझोन मानक ओलांडले गेले. मागील वर्षी हेच प्रमाण ७८ दिवस होते.
----
मुख्य निष्कर्ष
- चकाला, भायखळा, खेरवाडी हे मुंबईतील ‘ओझोन हॉटस्पॉट्स’ ठरले.
- २९ मार्च रोजी आठ ठिकाणी ओझोनचे प्रमाण धोका पातळीवर
- हिवाळ्यातही ओझोनचा धोका कायम
- डिसेंबर २०२४ ते फेब्रुवारी २०२५मध्ये ८७ दिवस मानक ओलांडले.
- गेल्या वर्षीच्या तुलनेत ओझोनचे एकूण सरासरी प्रमाण कमी (३५ टक्के) असले तरी स्थानिक प्रदूषण अधिक गंभीर

अन्य महानगरांतील तुलनात्मक स्थिती :
शहर ओझोन प्रदूषणाचे दिवस (मार्च-मे २०२५)
बंगळूर ४५ दिवस
मुंबई ३२ दिवस
कोलकाता २२ दिवस
हैदराबाद २० दिवस
चेन्नई १५ दिवस
------
ओझोन प्रदूषण का आहे गंभीर?
ओझोन वायू हा थेट उत्सर्जित न होता, विविध वायूंच्या सूर्यप्रकाशात झालेल्या रासायनिक क्रियेतून तयार होतो. अल्प काळातच शरीरावर गंभीर परिणाम करणारा हा वायू फुप्फुसांचे नुकसान, दमा वाढवणे आणि लहान मुलांमध्ये श्वसन आजार निर्माण करतो.
-----------
पुढचा मार्ग काय?
- झीरो-इमिशन वाहनांना प्रोत्साहन
- औद्योगिक प्रक्रियांचे हरित रूपांतर
- कचऱ्याचे वर्गीकरण व पुनर्प्रक्रिया
- स्वच्छ इंधनाचा वापर, घन इंधन टाळणे
- ‘हॉटस्पॉट्स’वर लक्ष केंद्रित करून स्थानिक उपाययोजना
---
तज्ज्ञ काय म्हणतात?
सीएसईच्या अनुमिता रॉय चौधुरी यांनी इशारा दिला, की वेळीच उपाययोजना केल्या नाहीत तर जमिनीवरील ओझोन हे मोठे सार्वजनिक आरोग्य संकट ठरू शकते.
- सीएसई उपकार्यक्रम व्यवस्थापक शरणजीत कौर यांनी म्हटले, की शहरांत केवळ ओझोनची सरासरी पातळी मोजण्याऐवजी स्थानिक ‘हॉटस्पॉट्स’ ओळखून तिथे थेट उपाययोजना करणे गरजेचे आहे.
-----
काय असते ओझोन प्रदूषण?
ओझोन हा वायूचा थर आहे. यामुळे पृथ्वीचे सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण होते. हा वायू पृथ्वीच्या वातावरणात जमिनीपासून १० किमी ते ५० किमी अंतरावर आढळते. पृथ्वीवरील मानव आणि इतर प्राण्यांच्या जीवनासाठी हा वायू महत्त्वाचा असला तरी जमिनीवरील त्याचे प्रमाण सामान्य पातळीपेक्षा जास्त झाल्यास प्रदूषण होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com