प्रभाग पुनर्रचना अंतिम टप्प्यात

प्रभाग पुनर्रचना अंतिम टप्प्यात

Published on

प्रभाग पुनर्रचना अंतिम टप्प्यात
ऑगस्टमध्ये हरकती-सूचना मागवणार; सप्टेंबरमध्ये प्रसिद्ध होणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ ः आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, महापालिका प्रशासनाने प्रभागांच्या सीमांचे पुनर्रेखांकन सुरू केले आहे. या वेळी प्रथमच विकास नियंत्रण नियमावली २०३४च्या नकाशाशी सुसंगत प्रक्रिया राबवली जात आहे. त्यामुळे प्रभागांची सीमारचना अंतिम टप्प्यात आली असून ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात नागरिकांच्या हरकती व सूचना मागवणार असल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली आहे.
सध्या मुंबई महापालिकेत एकूण २२७ प्रभाग असून, महाविकास आघाडीने २३६ प्रभाग करण्याची मागणी केली होती; मात्र ती मागणी राज्य सरकारने फेटाळली आहे. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकांसाठी २२७ प्रभाग कायम राहणार आहेत. विकास नियंत्रण नियमावली २०३४ नुसार भौगोलिक रचना आणि लोकसंख्येचे संतुलन ठेवण्यासाठी काही प्रभागांच्या सीमा बदलण्यात येत आहेत. त्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील काही भाग ‘आर-उत्तर’मधून ‘पी-उत्तर’मध्ये, तर कोस्टल रोड व अटल सेतूसारख्या नव्या प्रकल्पांतून निर्माण झालेल्या परिसराचा समावेश नव्या सीमांकनात केला जाणार आहे. सध्या अधिकाऱ्यांकडून सर्व प्रभागांमध्ये भू-तपासणी सुरू आहे. जुलैमध्ये प्रभागांचा ड्राफ्ट नकाशा जाहीर करण्यात येणार आहे. त्यावर २० ते २२ ऑगस्टदरम्यान नागरिकांच्या हरकती व सूचना मागवण्यात येतील. त्यानंतर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात अंतिम प्रभाग संरचना जाहीर होण्याची शक्यता आहे.
----
संतुलन साधण्याचा प्रयत्न
प्रत्येक प्रभागात ५४ हजार मतदारांचा समावेश असेल, या उद्देशाने प्रभागांची सीमारचना निश्चित केली जात आहे. त्यातून नागरी सुविधांचे समतोल वितरण साधण्यावर भर आहे. नवी सीमारचना करताना लोकसंख्येची घनता, नैसर्गिक रचना, विकास क्षेत्र, रस्ते आणि झोपडपट्ट्यांचा विचार करण्यात आला आहे. त्यासाठी पालिकेच्या निवडणूक विभागाने मागील महिन्यापासून कामाला सुरुवात केली आहे.
---
राजकीय गणिते बदलणार
प्रभागांच्या सीमाबदलामुळे अनेक प्रभागातील राजकीय गणिते बदलणार असून, स्थानिक प्रतिनिधींना नव्या मतदारांशी पुन्हा संपर्क साधावा लागणार आहे. राजकीय समीकरणे नव्याने जुळवावी लागणार आहेत. नव्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. ही प्रक्रिया पारदर्शक आणि तांत्रिक पातळीवर न्याय्य असल्याचा प्रशासनाचा दावा आहे.
......
‘कोस्टल रोड’ आणि ‘अटल सेतू’चा नव्याने समावेश
विकास नियंत्रण नियमावलीत कोस्टल रोडची १११ हेक्टर आणि अटल सेतूची ०.३५ हेक्टर नवनिर्मित जमीन आता प्रभागामध्ये समाविष्ट केली जात आहे. हे बदल डी ते जी दक्षिण प्रभागामध्ये होत आहेत. त्यामुळे निवडणूक आराखड्याला सध्याच्या भौगोलिक वास्तवाशी जुळवून घेतले जाईल.
......
प्रभाग रचना तपासण्याचे काम सुरू आहे. काही प्रभागांमध्ये नवीन भूभागांचा समावेश होईल. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर सूचना-हरकती मागवल्या जातील. निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार सर्व कामे वेळोवेळी पूर्ण केली जातील.
- विजय बालमवार, विशेष कार्य अधिकारी (निवडणूक)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com