विधानभवन हाणामारी नितीन देशमुख, सर्जेराव टकले गजाआड

विधानभवन हाणामारी नितीन देशमुख, सर्जेराव टकले गजाआड

Published on

टकले, देशमुख गजाआड
विधिमंडळ हाणामारी प्रकरण; हाणामारीचा उद्देश तपासणार

मुंबई, ता. १८ : विधिमंडळाच्या लॉबीत हाणामारी करणाऱ्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांना मरीन ड्राइव्ह पोलिसांनी शुक्रवारी (ता. १८) पहाटे गुन्हा नोंदवून अटक केली. सर्जेराव टकले आणि नितीन देशमुख अशी त्यांची नावे आहेत. टकले हा पडळकरांचा, तर देशमुख हा आव्हाड यांचा कार्यकर्ता आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (ता. १७) संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास विधिमंडळात टकले, देशमुख आणि त्यांच्यासोबत असलेल्या अन्य सहा ते सात जणांनी बेकायदा जमाव जमवून एकमेकांना अश्लील शिवीगाळ आणि मारामारी केली. या वेळी कर्तव्यात असलेल्या पोलिसांवर आरोपींनी फौजदारीपात्र बलप्रयोग केला. त्याबद्दल विधान भवनाचे सुरक्षा अधिकारी सचिन पाटणे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला.
विधिमंडळात हाणामारी करणाऱ्या टकले आणि देशमुख यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली जाईल. ही हाणामारी क्षणिक वादातून घडली की त्यामागे सुनियोजित कट होता, याचा तपास केला जाणार आहे, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली.
---
तीन दिवसांची पोलिस कोठडी
टकले आणि देशमुख या दोघांविरोधात भारतीय न्याय संहितेतील १८९(१ अ, ब), १८९(१,२), १९०, १९०(२), १९४(२), १९५(१,२), ३५२ या कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. या कलमांद्वारे बेकायदा जमाव, शासकीय कार्यवाहीत अडथळा, हिंसा करणे, सार्वजनिक ठिकाणी दंगल, हाणामारी करून सार्वजनिक शांतता भंग करणे, असभ्य भाषा वापरून सार्वजनिक शांतता भंग करणे, असा ठपका ठेवण्यात आला आहे. दरम्यान, न्यायालयाने दोघांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
--------------
जितेंद्र आव्हाडांविरोधातही गुन्हा
हाणामारीनंतर गुरुवारी रात्री मरीन ड्राइव्ह पोलिस आरोपी देशमुख यांना ताब्यात घेण्यासाठी विधानभवनात आले. देशमुख यांना घेऊन पोलिसांचे वाहन विधानभवन आवारातून निघणार तोच आव्हाड तेथे थडकले. त्यांनी पोलिस वाहनासमोर झोपून आंदोलन केले.
- आव्‍हाडांचे कार्यकर्तेही आक्रमक झाले. बराच वेळ आव्हाड, कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. आव्हाड, कार्यकर्ते पोलिसांशी हुज्जत घालत तेथेच ठाण मांडून होते.
- अखेर परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून अधिकची कुमक मागवून पोलिसांनी आव्हाड यांना वाहनासमोरून बाजूला ओढले. याप्रकरणी आव्हाड यांच्याविरोधात सरकारी कामात व्यत्यय आणल्याबद्दल मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com