मराठी अस्मितेची थट्टा थांबवा!
मराठी अस्मितेची थट्टा थांबवा!
समाजमाध्यमावरील व्हिडिओविरोधात मराठीची मोहीम
नितीन बिनेकर : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : राज्य सरकारच्या हिंदीसक्तीविरोधात मराठीजन आणि राजकीय पक्षांनी एकजूट दाखवल्यानंतर सरकारला आदेश रद्द करावा लागला. यानंतर समाजमाध्यमांवर हिंदी भाषिक कंटेट क्रिएटर्सनी मराठी अस्मितेची थट्टा करण्याचा ट्रेंड सुरू केला आहे. यावरून मराठी कंटेंट क्रिएटर्सनी मराठी भाषेचा, अस्मितेचा अपमान सहन केला जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेत मराठी बोली, वेशभूषा आणि अस्मितेची थट्टा करणाऱ्या व्हिडिओंना तोडीस तोड उत्तर देण्याचा पवित्रा घेतल्याने मराठी-हिंदी भाषिक वाद समाजमाध्यमांवर रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
उत्तर भारतीय कंटेंट क्रिएटर मराठी तरुणांचा पोशाख, हावभाव आणि शैलीवर व्हिडिओमधून टिप्पणी केली जात असून यातील संवाद भोजपुरी किंवा हिंदी भाषेत आहेत. विशेषतः प्रेमीयुगलांच्या कथानकावर आधारित या व्हिडिओंमध्ये मराठी मुलाला ‘बबुआ’ संबोधले जाते, तर संवादात अपमानास्पद भाषाशैली वापरली जाते. हा केवळ ट्रेंड नसून ओळखीवर घाव घालून मराठीपणाचा आणि संस्कृतीचे विकृतीकरण असल्याचे भाषाप्रेमींचे मत आहे.
‘कंटेंट स्ट्रेटेजी’ की ‘कल्चरल स्ट्रेटेजी’?
नव्या ट्रेंडवर आक्रमक भाष्य करून ‘पोस्टरबॉय चेतन’ या प्रसिद्ध इन्फ्लूएन्सरने ‘भाषेच्या नावाखाली अस्मितेचा बाजार’ अशा स्पष्ट शब्दांत विरोध केला आहे. या ट्रेंडकडे हास्य, मिम्स किंवा मनोरंजन म्हणून न पाहता तो एका सायबर हल्ल्यासारखा गंभीर स्वरूपाचा असल्याचे ठासून सांगितले आहे. ‘एखादा मुलगा ‘मराठी’ दाखवला जातो, पण त्याचे बोलणे हिंदीत किंवा भोजपुरीत असते. त्याला ‘बबुआ’ म्हटले जाते. ही केवळ भाषेची गफलत नाही, ही आपल्या संस्कृतीची थट्टा आहे. हे सगळे कंटेंट स्ट्रॅटेजीच्या नावाखाली आपली अस्मितेवर हल्ला करत आहेत,’ असे मत त्यांनी नोंदवले.
.......
खरी चूक कुणाची?
केवळ उत्तर भारतीय कंटेंट क्रिएटर्सचा दोष नाही, तर ते व्हिडिओ ‘हसून शेअर करणाऱ्या’ मराठी लोकांचाही आहे, असा प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे. ‘आपणच अशा व्हिडिओंना पसंती देणार असू, ते व्हायरल करणार असू, तर आपल्या मुलांना आणि पुढच्या पिढ्यांना ‘मराठी’ म्हणजेच हास्याचा विषय वाटू लागेल,’ अशी तीव्र प्रतिक्रिया एका मराठी युट्यूबरने व्यक्त केली.
मराठी क्रिएटर्सचा एल्गार
अनेक मराठी कंटेंट क्रिएटर्सनी आता #SpeakMarathi आणि #OurIdentityOurVoice अशा हॅशटॅगखाली मोहीम उघडली आहे. मराठी संवाद, कथा, आणि पारंपरिक शैली यावर आधारित ओरिजिनल रील्स तयार करून ते या ट्रेंडला उत्तर देत आहेत. हे रील्स नाहीत. हे आपल्या अस्मितेवरचे हल्ले आहेत, अशा प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर उमटत आहेत. मराठी भाषेवरच्या या ‘डिजिटल हल्ल्या’विरोधात ‘शब्दांचेच शस्त्र उचलण्याची वेळ’ आली आहे, अशी भावना व्यक्त केली जात आहे.
..........
कोट -
मराठी ओळखीचे ‘कंटेंट’च्या नावाखाली हसे केले जात आहे. ही मराठी अस्मितेची विटंबना आहे. आम्ही गप्प बसणार नाही. समाजमाध्यमांवरही आता आम्ही ठाम उभे राहू. आमच्या भाषेचा अपमान सहन केला जाणार नाही.
- पोस्टरबॉय चेतन
.......
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.