राज्य शासन व आयआयटीमध्ये सामंजस्य करार
राज्य शासन व आयआयटीमध्ये सामंजस्य करार
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
मुंबई, ता. २१ : मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमात सहभागी युवकांना सार्वजनिक धोरण (पब्लिक पॉलिसी) प्रमाणपत्र अभ्यासक्रम देण्यासंदर्भात सोमवारी (ता. २१) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्य शासनाच्या नियोजन विभागाने आयआयटी मुंबईबरोबर सामंजस्य करार केला. या अभ्यासक्रमामुळे फेलोशिप कार्यक्रमातील तरुणांच्या क्षमतांमध्ये वाढ होणार असून त्यांना अधिक प्रभावीपणे काम करता येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०१५ पासून सातत्याने अधिक प्रगल्भ आणि समृद्ध होत आहे. आयआयटी संस्थेसोबत हा कार्यक्रम पुढे नेण्यात येत आहे. फेलोशिपमधील तरुणांना विविध मार्गानी मूल्यवर्धन, कामासोबतच ज्ञान मिळावे, यासाठी या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा उपयोग होईल. त्यातून त्यांच्या करिअरमध्ये मूल्यवर्धन होईल. शैक्षणिकदृष्ट्या सक्षम आणि सामाजिक दृष्टिकोन असलेल्या युवकांना शासनासोबत काम करण्याची संधी देणे, हा मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे तरुण जेव्हा सरकारसोबत येतात, तेव्हा एक नवीन कल्पना, नवाच दृष्टिकोन सरकारला मिळतो आणि त्यातून प्रशासनाची कार्यपद्धती अधिक प्रभावी बनते. या कार्यक्रमामुळे शासनाला नवीन दृष्टिकोन प्राप्त होईल, नव्या विचारांमुळे यंत्रणेत बदल घडेल आणि युवकांनाही समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याची संधी मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी व्यक्त केला. या वेळी नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा व आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. शिरीष केदारे यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या.
जिल्हास्तरावर फेलोशिप कार्यक्रम
अपर मुख्य सचिव देवरा म्हणाले, की या वर्षीपासून जिल्हास्तरावर फेलोशिप कार्यक्रम राबविण्यात येत असून जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याबरोबर क्षेत्रीय स्तरावर काम करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. तसेच, त्यांच्या ज्ञानाचा फायदा शासनालाही धोरणात्मक निर्णय घेताना होणार आहे.
--
असा आहे अभ्यासक्रम
- एकूण २० दिवस प्रत्यक्ष वर्गातून प्रशिक्षण
- वर्षभरात ९० तास ऑनलाइन शिक्षण
- ज्येष्ठ प्राध्यापक, निवृत्त सनदी अधिकारी व विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांबरोबर संवाद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.