७/११ बॉम्बस्फोट मालिकेतील आरोपींची ओळख

७/११ बॉम्बस्फोट मालिकेतील आरोपींची ओळख

Published on

७/११ बॉम्बस्फोट मालिकेतील आरोपींची ओळख


कमाल अहमद मोहम्मद वकील अन्सारी (फाशी)
आरोप - बिहारच्या मधुबनी जिल्ह्याचा रहिवासी असलेल्या कमालने बॉम्बस्फोटांसाठी दोन पाकिस्तानी अतिरेक्यांना नेपाळमधून मुंबईत आणून सोडले. माटुंगा रोड येथे झालेल्या स्फोटातील बॉम्ब कमाल याने पेरला होता. चोरट्या मार्गाने पाकिस्तानमध्ये जाऊन शस्त्रास्त्र चालविण्याचे प्रशिक्षण घेतल्याचा आरोपही कमालवर होता. कोंबड्यांचे मांस विकणे, सायकल दुरुस्त करणे इत्यादी व्यवसाय करणाऱ्या कमालची नेपाळमध्ये सतत ये-जा असे. त्याला याआधी बनावट नोटांच्या तस्करीप्रकरणीही अटक झाली होती. दरम्यान, बॉम्बस्फोट खटल्यात विशेष मकोका न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा भोगताना २०२१मध्ये कोरोनामुळे त्याचा मृत्यू झाला.

मोहम्मद फैजल आताऊर शेख (फाशी)
आरोप - मिरा रोड येथे वास्तव्यास असलेला फैजल लष्कर ए तोयबाचा हस्तक असल्याचा आरोप करण्यात आला. त्याने लोकलमध्ये बॉम्बस्फोट मालिकेचे नियोजन केले. हवालामार्फत लाखो रुपये स्वीकारून त्याचा विनियोग बॉम्बस्फोट मालिकेसाठी केला. या गुन्ह्यासाठी पाकिस्तानहून आलेल्या अतिरेक्यांना दडवून ठेवले. त्यांना सुरक्षित निवाऱ्याची व्यवस्था करून दिली. त्यासोबत बॉम्ब बनविण्यात आणि पेरण्यात त्याचा सहभाग होता. त्याने त्याच्या दोन सख्ख्या भावांचीही माथी भडकावून त्यांना या कटात सहभागी करून घेतले. आधी तो कुटुंबीयांसह पुण्यात वास्तव्यास होता. तेथून हे कुटुंब मिरा रोड येथे स्थायिक झाले. तेथेच फैजल मुख्य प्रवाहातून जिहादी विचारसरणीकडे झुकला. २००२मध्ये समझोता एक्स्प्रेसमधून तो पाकिस्तानला गेला. तेथे लाहोर आणि मुजफ्फराबाद येथे लष्कराच्या छावणीत त्याने दहशतवादी कृत्याचे प्रशिक्षण घेतले.

इतेश्याम सिद्दीकी (फाशी)
आरोप - उत्तर प्रदेशच्या जौनपुर येथून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेण्यासाठी इतेश्याम मुंबईत आला. पेण येथील महाविद्यालयात त्याने प्रवेशही घेतला, मात्र काही दिवसांतच ‘सिमी’च्या विचारधारेकडे आकर्षित झाल्याने त्याने शिक्षण सोडले. त्याच्यावर पाकिस्तानी अतिरेक्यांना आश्रय देणे, बॉम्ब तयार करणे, ते पेरणे आणि सर्वात महत्त्वाचे बॉम्ब कोणत्या लोकलच्या कोणत्या डब्यात पेरावे यासाठी रेकी करणे, असे आरोप एटीएसने ठेवले. २००१मध्ये कुर्ला येथे सिमीने सुरू केलेल्या वाचनालयातून सिद्दीकीला अटक करण्यात आली. त्यानंतर तो सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर होता. पुढे त्याने स्वतःची प्रकाशन संस्था सुरू केली. अटक झाली तेव्हा त्याच्या ताब्यातून बरेच जिहादी साहित्य सापडले, असा दावा एटीएसने केला होता.

नावेद हुसेन खान रशीद (फाशी)
आरोप - सिकंदराबाद येथील कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या नावेदवर बॉम्ब बनवणे आणि पेरणे (वांद्रे येथे झालेला स्फोट) असा आरोप आहे. कुवेत येथे जन्माला आलेला नावेद आईच्या मृत्यूनंतर वडिलांसोबत भारतात आला. मिरा रोड येथे ही कुटुंब वास्तव्यास असताना नावेद आणि कटाचा सूत्रधार फैजल शेखमध्ये मैत्री झाली. फैजलने नावेदला या कटात सहभागी करून घेतले. बॉम्बस्फोट घडले तेव्हा तो मुंबईमध्येच होता आणि अन्य आरोपींच्या संपर्कात असल्याचा आरोप करण्यात आला.

आसिफ खान बशीर खान (फाशी)
आरोप - मूळचा जळगावचा रहिवासी असलेला आसिफ सिव्हिल इंजिनिअर होता. पाकिस्तानी अतिरेक्यांना आश्रय देणे, बॉम्ब तयार करण्यात सहकार्य आणि बॉम्ब पेरणे (बोरिवली येथे घडलेला स्फोट) असा आरोप आसिफवर होता. जळगावमधील वास्तव्यात तो सिमी सदस्य होता. त्याच्याविरोधात तेथे दोन गुन्हे दाखल झाले. त्यात एक गुन्हा पाइप बॉम्बशी संबंधित होता. त्यात तो फरार होता. त्याने मिरा रोड येथे आश्रय घेतला आणि मुंबईतील एका बांधकाम व्यावसायिकाकडे नोकरी पत्करली. बॉम्बस्फोट मालिकेनंतर तो बेळगाव येथे दडला.

तन्वीर अन्सारी (जन्मठेप)
आरोप - पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण आणि बॉम्बस्फोट मालिकेसाठी लोकल ट्रेनची रेकी केली, असा आरोप तन्वीरवर होता. मुंबईच्या आग्रीपाडा येथे राहणारा तन्वीर युनानी डॉक्टर होता. नागपूर येथून त्याने शिक्षण पूर्ण केले होते. मात्र प्रॅक्टिस करताना तो सिमीच्या संपर्कात आला. २००१ मधील भूकंपात मदतकार्यासाठी सिमीच्या सूचनेवरून तो गुजरातला गेला. २००१ मध्ये सिमीच्या वाचनालयातून त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर तो पोलिसांच्या निगराणीखाली होता. मात्र २००४मध्ये तो इराण दौऱ्यावर गेला. बॉम्बस्फोट मालिकेत सहभाग निष्पन्न झाल्यानंतर त्याला एका हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागातून अटक करण्यात आली.

मोहम्मद माजीद शफी (जन्मठेप)
आरोप - बांगलादेश सीमेवरून सहा पाकिस्तानी अतिरेक्यांना मुंबईत आणल्याचा आरोप माजीदवर होता. माजीदचे कोलकात्यात चप्पलचे दुकान होते. त्याआड तो हवालाचे व्यवहार करी. त्याची बांगलादेशला नियमित ये-जा असे, असा दावा एटीएसने केला होता. मात्र हे आरोप त्याच्या कुटुंबाने फेटाळले होते.

शेख मोहम्मद अली आलम (जन्मठेप)
आरोप - गोवंडीच्या शिवाजीनगर झोपडपट्टीत अलीचे घर होते. याच घरात पाकिस्तानी अतिरेक्यांच्या मदतीने अली आणि अन्य आरोपींनी बॉम्ब तयार केल्याचा आरोप एटीएसने ठेवला होता. हैदराबाद येथून औषधे विकत घेऊन ती मुंबई आणि आसपासच्या महानगरांमधील युनानी डॉक्टरांना पुरविण्याचा व्यवसाय करणारा अली सिमी कार्यकर्ता होता.


मोहम्मद साजिद अन्सारी (जन्मठेप)
आरोप - मिरा रोडचा रहिवासी असलेल्या साजिदचा मायानगर येथे मोबाईल दुरुस्तीचा व्यवसाय होता. जिहादी विचारसरणीकडे आकर्षित झाल्यानंतर तो अन्य अटक आरोपींच्या संपर्कात आला. बॉम्बस्फोट मालिकेसाठी त्याने टाइमर उपलब्ध करून दिले होते. विशेष म्हणजे तंत्रज्ञान अवगत असलेल्या साजिदचा वापर कटाच्या प्रत्येक टप्प्यावर करून घेण्यात आला.

मुजम्मील शेख (जन्मठेप)
आरोप - मुजम्मील शेख हा मुख्य आरोपी फैजल शेख याचा धाकटा भाऊ होय. मुजम्मील सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. त्याने बॉम्बस्फोट मालिकेसाठी लोकल ट्रेनची पाहणी केली होती. बॉम्बस्फोट घडले तेव्हा तो बंगळुरू येथील आयटी कंपनीत काम करीत होता. मात्र फैजलच्या अटकेनंतर त्याचा सहभाग स्पष्ट झाल्याचा दावा एटीएसने केला होता.

सोहेल शेख (जन्मठेप)
आरोप - पुण्याच्या कॅम्प परिसरात राहणाऱ्या सोहेलने पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतले होते. बॉम्बस्फोट मालिकेसाठी लोकल ट्रेनची पाहणी केली, असा आरोप सोहेलवर होता. सिमीवर बंदी घातल्यानंतर इतरांसोबत त्यालाही अटक झाली होती. बॉम्बस्फोट मालिकेपूर्वी तो इराण दौऱ्यावर होता.


जमीर शेख (जन्मठेप)
आरोप - वरळीला राहणाऱ्या जमीरने महाराष्ट्र कॉलेजमधून पदवीपर्यंत शिक्षण घेतले होते. सिमी सदस्य असलेल्या जमीरने पाकिस्तान येथे दहशतवादी कृत्यांसाठी प्रशिक्षण घेतले होते. लोकल ट्रेनची पाहणी आणि कटाच्या प्रत्येक बैठकीत हजेरी, असा आरोप त्याच्यावर होता. २००५मध्ये तो तीन आठवड्यांसाठी परदेश दौऱ्यावर होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com