मग ‘ते’ स्फोट कोणी घडवले?

मग ‘ते’ स्फोट कोणी घडवले?

Published on

मग ‘ते’ स्फोट कोणी घडवले?
बॉम्बस्फोटातील मृतांचे नातेवाईक, जखमींची प्रतिक्रिया
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ ः ‘त्या’ १२ आरोपींचा बॉम्बस्फोट मालिकेत सहभाग नव्हता, असे सोमवारी उच्च न्यायालयाच्या निकालावरून स्पष्ट झाले; मग ते बॉम्बस्फोट घडवले कोणी, १८० निष्पाप प्रवाशांचा जीव घेणारे, ८०० हून अधिक जणांना जखमी करणारे १९ वर्षांपासून मोकाटच फिरत आहेत का, आम्ही कोणता निकाल मानावा, मकोका न्यायालयाचा की उच्च न्यायालयाचा, तपासातील अपयशाचे खापर कोणावर फोडावे, असा सवाल बॉम्बस्फोटातील मृतांचे नातेवाईक आणि जखमींनी विचारला आहे. सरकारने या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान द्यावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
उच्च न्यायालयाचा हा निकाल आमच्या जखमांवर मीठ चोळणारा असल्याचे हरीश पोवार यांनी सांगितले. बागकामाचे कंत्राटदार असलेले पोवार त्या दिवशी अल्तामाउंट रोडवर काम करीत होते. काम आटोपून संध्याकाळी लोकलने घराकडे निघाले असता प्रथम वर्ग डब्यात स्फोट झाला. सुरुवातीला काय घडले ते कळत नव्हते; पण भानावर आलो तेव्हा, छातीत जखम झाल्याची जाणीव झाली. डब्यात सर्वत्र छिन्नविछिन्न मृतदेह, रक्तामांसाचा सडा पडला होता, असे पोवार यांनी सांगितले. २०१५ मध्ये मकोका न्यायालयाने काहींना फाशी, तर काहींना जन्मठेप ठोठावली. तेव्हा न्याय मिळाल्याचे वाटले होते; मात्र उच्च न्यायालयाच्या निकालाने आमच्या भ्रमाचा भोपळा फुटला. ते आरोपी निर्दोष आहेत, तर मग स्फोट कोणी घडवले, असा सवाल त्यांनी विचारला.
----
नेमकी चूक कोणाची?
मिरा रोड येथे राहणाऱ्या महेंद्र पितळे यांनी या स्फोटात हात गमावला. ते कायमचे जायबंदी झाले. नेमके कुठे, कोण चुकले, हा प्रश्न सतावत असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी निष्पाप व्यक्तींना आरोपी केले, की पोलिसांनी गोळा केलेल्या पुराव्यांचे आकलन करण्यात न्यायालय कमी पडले का, अशी प्रतिक्रिया त्यांनी नोंदवली.
----
...ही तर न्यायाची हत्या!
सीए चिराग चौहान या घटनेत गंभीर जखमी झाले होते. स्फोट झाला तेव्हा ते २१ वर्षांचे होते आणि सीएचे शिक्षण घेत होते. मणक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना चालणे अशक्य झाले आणि ते व्हीलचेअरवर आले. सोमवारी उच्च न्यायालयाच्या निकालावर त्यांनी न्यायाची हत्या झाली, अशी प्रतिक्रिया त्यांनी समाजमाध्यमांवर दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com