उद्दिष्टांवर गळतीचं संकट
उद्दिष्टांवर गळतीचं संकट
‘स्मार्ट मीटर’ला कासवगती
पालिकेचे पाणी गळती रोखण्याचे उद्दिष्ट रखडले
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : वाढत्या लोकसंख्येची पाण्याची गरज लक्ष्यात घेत महापालिकेने शहराच्या जलव्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि पाणी गळती कमी करण्यासाठी ‘स्मार्ट जल मीटर’ प्रकल्प हाती घेतला आहे. मात्र या प्रकल्पाच्या कासवगतीमुळे ही गळती थांबवण्याचे उद्दिष्ट रखडल्याचे चित्र आहे.
मुंबईत दररोज सुमारे ३० टक्के पाणी गळतीमुळे वाया जाते. स्मार्ट मीटरमुळे ही गळती १५ टक्क्यांपर्यंत रोखण्याचे पालिकेचे उद्दिष्ट आहे. यामुळे लाखो लिटर पाण्याची बचत आणि आर्थिक खर्चात घट होण्याची शक्यता आहे. प्रत्यक्षात मात्र ही योजना प्रायोगिक टप्प्यात आहे. मुंबईत सुमारे २० लाख नळजोडण्या असून, त्यामध्ये स्मार्ट जल मीटर बसवण्याचे नियोजन करण्यात आले. याची सुरुवात २००९-१० पासून, प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आली. पण गेल्या १५ वर्षांत केवळ ९५,००० मीटरच बसवले गेले. शहरातील अनेक भागांमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरूच आहे. विशेषतः पूर्व उपनगरांमधील कुर्ला, चेंबूर, मानखुर्द, घाटकोपर, विक्रोळी आणि भांडूप या भागांमध्ये जलवाहिनीला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याचे आढळून आले आहे. त्यातच कुर्ला पश्चिमेतील विनोबा भावे नगर भागात गेल्या अनेक महिन्यांपासून गळती सुरू असून, अद्याप त्यावर ठोस उपाययोजना करण्यात आली नाही. याशिवाय सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड, वाकोला, कलिना आणि बांद्रा पश्चिम भागातही गळतीमुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे. याबाबत जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
बेकायदा नळजोडण्या डोकेदुखी
महापालिकेने पाणी गळती रोखण्यासाठी सुमारे १०० कोटी रुपये खर्च करून जुन्या जलवाहिन्या बदलण्याचे काम सुरू केले आहे. तसेच गोवंडी (बैंगनवाडी) आणि झोपडपट्टी परिसरात पाणीपुरवठ्याचा तुटवडा अधिक असून, गळतीसह बेकायदा नळजोडण्याही पालिकेची डोकेदुखी ठरत आहे. त्यातच स्मार्ट मीटरमुळे पाण्याच्या वापराचे अचूक मोजमाप करता येते. पाण्याच्या देयकामध्ये पारदर्शकता येते आणि गळती कुठे होते ते लगेच समजू शकते; मात्र काही भागांत नागरिकांचा या मीटरला विरोध असल्यामुळे कामाची गती मंदावली आहे. प्रशासनाच्या अंदाजानुसार, हे संपूर्ण प्रकल्प पूर्ण होण्यासाठी किमान अडीच ते तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे.
‘एआय’चा वापर
पालिकेने विशेषतः ड्रेन साफसफाई व सॅनिटेशन नियंत्रण क्षेत्रात ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे, परंतु जल गळती थेट ओळखण्यासाठी ‘एआय’आधारित मीटरिंगअंतर्गत उपाय अजून प्रारंभिक टप्प्यात आहेत. भविष्यात स्मार्ट मीटर, ‘एलओटी’ आणि ‘एआय’ नियंत्रित सेन्सर्स वापरून गळती नियंत्रणाला उत्तम ट्रॅकिंग व पूर्वसूचना मिळू शकतील. या तंत्रज्ञानाचा उपयोग सध्या दिल्ली जल बोर्ड, ठाणे पालिका आणि अन्य काही शहरे यशस्वीरीत्या करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.