पावसाचा दररोज ५ हजारापेक्षा जास्त वाहनांना फटका

पावसाचा दररोज ५ हजारापेक्षा जास्त वाहनांना फटका

Published on

पावसाचा पाच हजारांपेक्षा जास्त वाहनांना फटका
ऑटो, टॅक्सी चालकांचे सर्वाधिक नुकसान

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचले होते. परिणामी अनेक वाहनांचे पाणी शिरून नुकसान झाले. गॅरेजमध्ये आलेल्या गाड्यांची संख्या पाहता पावसामुळे मुंबईत दररोज पाच हजारांपेक्षा अधिक वाहनांत बिघाड होत आहेत. त्यामुळे वाहनचालकांचे वाहन बिघडल्यामुळे लाखोंचे नुकसान हाेत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून वाहन दुरुस्तीचे काम करणारे सौरभ सिंग यांनी सकाळसोबत बोलताना सांगितले की, पावसाळ्यात वाहनांमध्ये बिघाडीच्या तक्रारी वाढत असून, यामध्ये दुचाकी, ऑटो रिक्षा आणि चारचाकी गाड्यांचा समावेश असतो. मुंबईत पाऊस जास्त झाला, तर सर्वाधिक नुकसान ऑटो व टॅक्सी चालकांचे हाेते. मुंबईत दिवसभरात पाच हजारांहून अधिक अशा स्वरूपाच्या तक्रारी येत असतात. गॅरेजचालक रोहित जयस्वाल याने सांगितले की, मुंबईत दोन दिवस जोरदार पाऊस झाला त्यावेळेस पावसापूर्वी दिवसभरात चार ते पाच वाहने दुरुस्तीसाठी येत होती. तुलनेत आता दिवसभरात १० ते १२ वाहने दुरुस्तीसाठी येत असतात. पावसाळ्यात अनेक वाहने रस्त्यावर बंद पडतात, ती वाहने बाजूला करतेवेळी त्या भागातील वाहनांचा वेग मंदावतो. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईतील सर्वच महत्त्वाच्या भागात वाहन काेंडी झाली हाेती. असे त्यांनी सांगितले.
==
वाहनांची नियमित सर्व्हिसिंग करून घेणे आवश्यक असून, पावसाचे पाणी गेल्याने गाड्या खराब होतात. त्यामुळे टायरच्यावर पाणी गेल्यास ते धोकादायक ठरू शकते. त्यामुळे जास्त पाण्याच्या ठिकाणी वाहने चालवल्याने अपघाताचा धोका निर्माण हाेऊ शकताे.
अजय गोवले, वाहतूक अभ्यासक
==
इतर वाहनांच्या तुलनेत रिक्षाचे चाक लहान असल्याने रिक्षात पाणी जाऊन ब्रेक खराब होण्याची शक्यता जास्त असते. कित्येकवेळा रिक्षाचे मीटर बंद पडण्याच्या घटनादेखील घडतात.
- के. के. तिवारी, अध्यक्ष भाजप रिक्षा टॅक्सी सेल
===
पार्किंग नसल्याचा फटका
प्रवासी वाहनचालकांची आर्थिक परीस्थिती चांगली नसल्याने झोपडपट्टी किंवा चाळीत राहतात. तिथे पार्किंगची सोय नसल्याने रस्त्याच्या बाजूला गाडी उभी करतात. रस्त्यांवर पाणी साचून गाड्यांमध्ये गेल्याने साधारणपणे पाच हजार ते १५ हजार रुपयांपर्यंत खर्च येतो, असे महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघचे ॲप-बेस्ड ट्रान्सपोर्ट युनिटचे अध्यक्ष रिझवान शेख यांनी सांगितले.
===
मुंबईतील एकूण वाहने
दुचाकी - ३० लाख
चारचाकी - १५ लाख
रिक्षा - २. ३० लाख
बस - २,१०,७१०
मालवाहतूक वाहने -१,१६,२७०
रुग्णवाहिका -२०६०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com