मुंबईचे दुचाकीस्वार सर्वात बेशिस्त
मुंबईचे दुचाकीस्वार सर्वात बेशिस्त
ई-चलान कारवाईत ४४ टक्के प्रमाण; २३१.७९ कोटींचा दंड
मुंबई, ता. २४ : शहरात दुचाकी चालवणारे चालक सर्वात बेशिस्त असल्याचे वाहतूक पोलिसांनी ई-चलानद्वारे केलेल्या दंडात्मक कारवाईतून स्पष्ट होत आहे. २०२४ मध्ये वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या एकूण ६७ लाख ८४ हजार ९२५ वाहनचालकांवर ई-चलानद्वारे कारवाई करण्यात आली आहे. त्यात ४३.५७ टक्के अर्थात ३० लाख ३४ हजार ८८९ चलान फक्त दुचाकीस्वारांच्या नियमभंगांबद्दल जारी केले आहेत. या वर्षी पहिल्या सहा महिन्यांत जारी झालेल्या चलानांमध्ये दुचाकीस्वार आघाडीवर असल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले.
वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हेल्मेट न घालणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवणे (दोन किंवा तीन), नो एन्ट्रीचा नियम मोडणे, सिग्नल मोडणे, विरोधी मार्गिकेवरून दुचाकी नेणे आदी नियमभंगांमध्ये सर्वाधिक दंड दुचाकीचालकांना बजावला जातो. वाहतूक पोलिसांकडील आकडेवारीनुसार मुंबईत सुमारे ४८ लाख वाहने आहेत. त्यात सर्वाधिक संख्या दुचाकींची आहे. शहरात तब्बल २९ लाख दुचाकी आहेत. सरासरी एकूण वाहनांपैकी ७५ टक्के दररोज रस्त्यांवर असतात. त्यानुसार २१ ते २२ लाख दुचाकी संपूर्ण दिवसांत शहराच्या या ना त्या रस्त्यांवर धावतात. त्यातच ठाणे, नवी मुंबई आणि मिरा रोड येथून दररोज आठ ते दहा लाख वाहने शहरात येतात. त्यातही दुचाकींची संख्या सर्वाधिक भरते.
विनाहेल्मेट प्रवास
विनाहेल्मेट दुचाकी चालवणे, हा दुचाकीस्वारांकडून सातत्याने होणारा आणि सर्वाधिक नियमभंग ठरतो आहे. दुचाकीस्वारांना बजावण्यात आलेल्या ३०.४३ लाख चलानांपैकी तब्बल २२.३८ चलान विनाहेल्मेट दुचाकी चालविल्याबद्दल जारी केले आहेत.
रिक्षा तिसऱ्या क्रमांकावर
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील महत्त्वाचे अंग असलेल्या ऑटो रिक्षांच्या चालकांची मुजोरी नियमितपणे समोर येते. वाहतुकीच्या नियमभंगात रिक्षाचालक तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तर, दुसरा क्रमांक खासगी कारचालकांनी पटकावला आहे. रिक्षाचालकांवर ७.६९ लाख तर खासगी कारचालकांवर ९.२८ हजार चलान जारी झाली. या दंडाची रक्कम अनुक्रमे ३१.१६ कोटी, ७९.१४ कोटी इतकी आहे.
दुचाकी सॉफ्ट टार्गेट
मुंबईत दुचाकींची संख्या सर्वाधिक आहे. परिणामी, रस्त्यांवर दुचाकी सर्वाधिक धावतात. वाहतूक पोलिसांच्या दृष्टिकोनातून दुचाकी थांबवणे सोपे ठरते. शिवाय, विनाहेल्मेट दुचाकी चालवणारे पोलिसांना आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सहज दिसतात. त्यामुळे सर्वाधिक कारवाई दुचाकींवर होत असते; मात्र दुचाकीस्वारांचे नियमभंग दुर्लक्षित करून चालणारे नाही. सर्वाधिक अपघात दुचाकींचे होतात. त्यात होणाऱ्या मृत्यूंची संख्याही जास्त आहे. विशेष म्हणजे, सिग्नल मोडणे, विरुद्ध मार्गिकेचा वापर करणे, नो एंट्रीत शिरणे आदी नियमभंगामुळे दुचाकीस्वार स्वतःसोबत इतरांचाही जीव धोक्यात घालतात, असे वाहतूकतज्ज्ञ ए. व्ही. शेनॉय यांनी म्हटले.
मानखुर्द विभागात सर्वाधिक नियमभंग
संपूर्ण मुंबई शहरात वाहतूक पोलिसांचे ४२ विभाग आहेत. प्रत्येक विभागाच्या अखत्यारीत सुमारे तीन ते चार पोलिस ठाण्याची हद्द मोडते. त्यापैकी सर्वाधिक नियमभंग मानखुर्द, वांद्रे आणि समतानगर विभागात घडतात. मानखुर्द विभागात वर्षभरात दोन लाखांहून अधिक वाहनांवर चलान बजावले आहेत. या विभागात पूर्वमुक्त मार्ग उतरतो, मानखुर्द येथून शीव-पनवेल आणि घाटकोपर-मानखुर्द जोड रस्त्यावरून मुंबईत येणाऱ्या आणि बाहेर पाडणाऱ्या वाहनांची संख्या सर्वाधिक आहे. याशिवाय येथील शिवाजीनगर, बैगनवाडी, मंडाले आदी धारावीला मागे सोडतील, अशा दाटवस्तीच्या झोपडपट्ट्या आहेत. येथील जोडरस्त्यावरील प्रत्येक चौकात सिग्नल आहेत; मात्र ते कोणीही मानत नाही. त्यामुळे सर्वाधिक अपघात या जोडरस्त्यावर घडतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.