
मानसिक आजारामुळे दररोज तिघांचा मृत्यू?
पाच वर्षांत ५,७८८ मृत्यूची नोंद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : राज्यात मानसिक आजार ही एक गंभीर आरोग्य समस्या बनली आहे. आरोग्य विभागाच्या आरटीआयमधून मिळालेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात मागील पाच वर्षांत मानसिक आरोग्य समस्यांशी संबंधित मृत्यूंमध्ये आश्चर्यकारक वाढ झाली आहे. मानसिक आणि वर्तणुकीशी संबंधित विकारांमुळे पाच वर्षांत ५,७८८ लोकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. या आकडेवारीचे मूल्यांकन केल्यास राज्यात दररोज दर तीन जणांचा मानसिक आजाराने मृत्यू होत असल्याची बाब समोर येते.
मानसिक आरोग्याशी संबंधित विकारांमुळे होणाऱ्या मृत्यूंबद्दल माहितीच्या अधिकारांतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागाकडून माहिती मागवण्यात आली होती. आरोग्य सेवा संचालनालयाचे उपसंचालक डॉ. एस. बी. चिद्वार यांनी माहिती अधिकारांतर्गत दिलेल्या माहितीत म्हटले आहे, की २०१९ ते २०२३ या काळात विविध मानसिक आजारांमुळे पाच हजार ७८८ लोकांचा मृत्यू झाला आहे.
मानसिक विकारामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये वाढ
२०१९ पासून राज्यात मानसिक आणि वर्तणुकीशी संबंधित विकारांपैकी एक असलेल्या मेंटल डिसॉर्डरमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये अचानक आणि तीव्र वाढ झाली आहे.
आकडेवारी
वर्ष मृत्यू पुरुष महिला
२०२० १,१७१ ९०२ २६९
२०२१ १,५९९ १,१९० ४०९
२०२२ १,०७३ --- ---
२०२३ १,९१९ --- ---
मादक पदार्थांच्या अतिसेवनामुळे मानसिक आजारात वाढ होते, असेही तज्ज्ञ प्रवृत्तीचे कारण देतात. ही अशी स्थिती आहे की, जी मेंदूच्या कार्यप्रणालीमध्ये बदल घडवून आणते तसेच निर्णय घेण्याच्या क्षमतेवर परिणाम करते. मनोसक्रिय (सायकोएक्टिव्ह) पदार्थांमध्ये अल्कोहोल, निकोटीन, गांजा, कॅफिन आणि प्रिस्क्रिप्शन ड्रग्ज तसेच हेरॉइन, एलएसडी, कोकेन आणि अॅम्फेटामाइन्स यासारखी बेकायदा पदार्थांचा समावेश आहे.
.................................
स्किझोफ्रेनियामुळेही होणारे मृत्यू
विशेषतः स्किझोफ्रेनिया आणि भ्रामक विकारांशी संबंधित मृत्यू तुलनेने स्थिर राहिले आहेत. २०२०मध्ये स्किझोफ्रेनियामुळे ५१, २०२१मध्ये ८०, २०२२मध्ये ४९ आणि २०२३मध्ये १४८ मृत्यू झाले.
...............................
४५ ते ५४ वयोगटातील अधिक मृत्यू
माहितीनुसार २०१९ ते २०२३ दरम्यान महाराष्ट्रात मानसिक आणि वर्तणुकीशी संबंधित विकारांमुळे एकूण ५,७८८ लोकांचा मृत्यू झाला. ४५ ते ५४ वयोगटातील सर्वाधिक ९९६ मृत्यू झाले. त्यानंतर ३५ ते ४४ वयोगटातील ९३९ मृत्यू झाले. चिंताजनक बाब म्हणजे १५ ते २४ वयोगटातील व्यक्तींमध्येही २७७ मृत्यूंची नोंद झाली.
..........................
सरकारच्या उपाययोजना
वाढत्या मानसिक मृत्यूच्या समस्येला तोंड देण्यासाठी राज्य सरकारने अनेक पावले उचलली आहेत. सर्व ३६ जिल्हा रुग्णालयांत मानसिक आरोग्यसेवा सुरू केल्या आहेत. प्रत्येक रुग्णालयात एक मानसोपचारतज्ज्ञ, एक क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, एक मानसोपचार परिचारिका आणि एक सामाजिक कार्यकर्ता आहे. याव्यतिरिक्त मानसिक आरोग्यसेवेमध्ये प्रवेश आणि लवकर हस्तक्षेप वाढविण्यासाठी ऑक्टोबर २०२२मध्ये टेली मानस हेल्पलाइन सेवा सुरू केली. २४ तास उपलब्ध असलेल्या टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांकावर (१४४१६) वर्षाला ५० हजारांहून अधिक कॉल येतात. त्यापैकी बहुतेक कॉल नैराश्याबद्दल असतात. याशिवाय सामाजिक आणि कामाच्या ठिकाणी ताणतणाव, विविध प्रकारची चिंता, अपयशाची भीती आणि नातेसंबंधातील समस्या येतात.
.....................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.