प्रत्येक खड्ड्यासाठी १५ हजारांचा दंड
प्रत्येक खड्ड्यासाठी १५ हजारांचा दंड
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : महापालिकेने सार्वजनिक गणेश मंडळांना प्रत्येक खड्ड्यासाठी तब्बल १५ हजार रुपयांचा दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र हा निर्णय उत्सवावर अन्याय करणारा आणि आर्थिक बोजा वाढवणारा असून, तो तत्काळ रद्द करावा, अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या बैठकीत सर्व गणेश मंडळांनी केल्याची माहिती समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर यांनी दिली आहे.
दादर येथे पार पडलेल्या बैठकीत मंडळांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर यांच्या नेतृत्वाखाली महत्त्वाचे प्रश्न चर्चिले गेले. गेल्या वर्षी हा दंड फक्त दोन हजार होता, पण यंदा तो थेट १५ हजार रुपये करण्यात आला आहे. हा निर्णय जाचक आणि अन्यायकारक आहे. मंडळे स्वतः खड्डे बुजवतात, तरीही त्यांच्यावर दंड लावला जातो, हे दुर्दैवी असल्याचे मत मंडळांनी मांडले.
समितीने आपल्या मुख्य मागण्यांचे निवेदन महापालिकेला दिले आहे. त्यात खड्ड्यांसाठी आकारण्यात येणारा १५ हजार रुपयांचा दंड तत्काळ रद्द करावा, पालिकेने घेतले जाणारे हमीपत्र बंद करावे, कारण न्यायालयाने पीओपी मूर्तींना परवानगी दिली आहे, उत्सव काळात मंडळांना विमा सुरक्षा आणि वीज सवलत मिळावी, मंडळांकडून घेतली जाणारी अनामत रक्कम वेळेत परत करण्यात यावी, मंडपाच्या आसपास वाहतुकीस अडथळा ठरणारी जुनी वाहने हटवावीत तसेच मूर्ती आगमनावेळी पोलिसांनी वाद्यांवर बंदी घालू नये, अशा मागण्या केल्या आहेत.
महापालिका यावर पुढील दोन-तीन दिवसांत निर्णय घेणे अपेक्षित आहे. गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानंतर सरकारने आता सहकार्याची भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा मंडळांनी व्यक्त केली. तसेच पूर्व आणि पश्चिम उपनगरांसाठी स्वतंत्र उपसमित्या स्थापन करून स्थानिक अडचणी सोडवण्याचे ठरवण्यात आले. समन्वय समितीने सरकारकडे पाठपुरावा करून मंडळांच्या मागण्या मान्य करून घेण्याचे आश्वासनही दिले आहे.
.......
मुख्य मागण्या :
खड्ड्यांसाठीचा १५ हजारांचा दंड तत्काळ रद्द करावा.
न्यायालयाने पीओपी मूर्तींना परवानगी दिल्याने हमीपत्र बंद करावे.
उत्सव काळात मंडळांसाठी विमा सुरक्षा आणि वीज सवलत मिळावी.
अनामत रक्कम लवकर परत मिळावी.
वाहतुकीस अडथळा ठरणारी जुनी वाहने हटवावीत.
पोलिसांनी वाद्यांवर बंदी घालू नये.
......