कांदिवलीत विवाहितेची आत्महत्या
कांदिवलीत विवाहितेची आत्महत्या
मुंबई, ता. २७ : कौटुंबिक हिंसाचाराला कंटाळून रेणू कटरे (वय ४२) या विवाहितेने शनिवारी (ता. २६) कांदिवली येथील राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. रेणू या म्हाडाचे उपनिबंधक लक्ष्मण कटरे यांच्या पत्नी आहेत. रेणू यांच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार समतानगर पोलिसांनी कटरे आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा नोंदवत पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.
रेणू यांच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार, अपेक्षित हुंडा न दिल्याने कटरे कुटुंबाने बहिणीला त्रास देण्यास सुरुवात केली. त्यामुळे वडिलांनी आठ तोळे दागिने आणि गेल्या दोन वर्षांत २२ लाख रुपये कटरे कुटुंबाला दिले; मात्र तरीही बहिणीचा छळ कमी झाला नाही. मी उच्च पदस्थ अधिकारी आहे. तुझी माझ्यासह राहण्याची लायकी नाही, असे टोमणे मारत लक्ष्मण हे बहिणीला वरचेवर मारहाण करतात. रविवारी (ता. २७) दोन्ही कुटुंबीयांची याविषयी बैठक ठरली होती; मात्र लक्ष्मण यांनी टाळाटाळ सुरू केल्याचे लक्षात येताच बहीण आणखी निराश झाली आणि तिने हे टोकाचे पाऊल उचलले. आत्महत्येपूर्वी रेणू यांनी संपर्क साधून आपला छळ कधीच थांबणार नाही, असे सांगितले होते, अशी माहितीही त्यांनी दिली.