चाळकरी पोहोचणार टॉवरमध्ये!

चाळकरी पोहोचणार टॉवरमध्ये!

Published on

बीडीडी चाळ पुनर्विकास
चाळकरी पोहोचणार टॉवरमध्ये
स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त; पहिल्या टप्प्यात ५५६ जणांना चाव्या, ५०० चौरस फुटांचे सुसज्ज घर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : शतकभरापूर्वी बॉम्बे डेव्हलपमेंट डिपार्टमेंटने (बीडीडी) उभारलेल्या चाळीत पिढ्यानपिढ्या राहणाऱ्या वरळी बीडीडी चाळवासीयांचा आता चाळ ते गगनचुंबी टॉवर असा प्रवास निश्चित झाला आहे. त्यासाठी स्वातंत्र्यदिनी मुहूर्त असून, केवळ मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या ग्रीन सिग्नलची प्रतीक्षा आहे. पहिल्या टप्प्यात ५५६ रहिवाशांना ५०० चौरस फुटांच्या घराची चावी आणि पार्किंग दिले जाणार आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे चाळीत कसेबसे दिवस काढणाऱ्या चाळकऱ्यांना टॉवरमध्ये मोकळा श्वास घेता येणार आहे.

मुंबईत वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग येथे बीडीडी चाळी असून, त्यांचा पुनर्विकास म्हाडाच्या माध्यमातून केला जात आहे. सुमारे ९२ एकर जागेवर १९५ बीडीडी चाळी असून, त्यामध्ये १५ हजार ५९३ सदनिका, गाळे आणि व्यावसायिक स्टॉल आहेत. बीडीडी चाळींचा टप्प्याटप्प्याने पुनर्विकास केला जाणार असून, येथील रहिवाशांना ५०० चौरस फुटांची सदनिका दिली जाणार आहे. त्यासाठी ४० ते ४२ मजली इमारती येथे उभारल्या जात आहेत. त्यापैकी वरळी बीडीडी चाळीच्या जागेवर इमारत क्रमांक १ मधील डी आणि ई विंगचे काम पूर्ण झाले असून, १५ ऑगस्ट रोजी संबंधितांना घराचा ताबा देण्याचे म्हाडाचे नियोजन आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची वेळ मिळावी, यासाठी म्हाडाकडून प्रयत्न सुरू असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
-----------------
वरळी बीडीडी
- १२१ चाळी, ९६८९ भाडेकरू रहिवासी
- ४२ मजली ३४ इमारती उभारणार (बेसमेंट, पोडीयमसह)
- इमारत क्रमांक एकमधील आठ विंगचे काम प्रगतिपथावर
- डी आणि ई विंगचे ४० मजले पूर्ण
- भोगवटा प्रमाणपत्र मिळाले
---------
ना. म. जोशी मार्ग बीडीडी
- ३२ चाळी, २५६० भाडेकरू रहिवासी
- २६ मजली १४ इमारती उभारणार
- पहिल्या टप्प्यांतर्गत सात विंगपैकी दोन विंगचे सिव्हिल वर्क वेगात सुरू आहे.
- एका विंगचा पाया तर एका विंगचे तळघर प्रगतीपथावर आहे.
---------
नायगाव बीडीडी
- ४२ चाळी, ३३४४ भाडेकरू रहिवासी
- २६ मजली २० इमारती बांधल्या जाणार
- इमारत क्रमांक एकमधील आठ टॉवरचे २० टक्के काम प्रगतिपथावर असून, सुमारे २० टक्क्यांहून अधिक पूर्ण

पुनर्विकासाचा २५ वर्षांचा प्रवास
- १९९९ - युती सरकारमध्ये नारायण राणे मुख्यमंत्री असताना बीडीडी चाळींचा एकत्रित पुनर्विकास करण्यास कॅबिनेटची मंजुरी
- सप्टेंबर २०१४ - बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी स्वतंत्र धोरण आणून एकत्रित पुनर्विकास करण्याचा निर्णय
- २०१५ - पावसाळी अधिवेशनात बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा प्रश्न उपस्थित, २५ आमदारांची तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत विधान परिषदेचे सभापती यांच्याकडे बैठक
- २०१५ - हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे बीडीडी चाळीचा पुनर्विकास सरकार करणार असल्याची घोषणा
- २०१७ - सरकारकडून नोडल एजन्सी म्हणून म्हाडाची नियुक्ती
- ऑगस्ट २०१७ - म्हाडाने प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंटच्या नियुक्तीसाठी निविदा प्रसिद्ध
- जानेवारी २०१९ - टाटाच्या टीसीसी कन्स्ट्रक्शन कंपनीला काम दिले
- १ ऑगस्ट २०२१ - तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रत्यक्ष भूमिपूजन
- १७ जुलै २०२५ - भोगवटा प्रमाणपत्र मिळाले
--------
तारीख पे तारीख
बीडीडीवासीयांना पहिल्या टप्प्यातील घरांचा ताबा देण्यासाठी तारीख पे तारीख मिळत आली आहे.
- पहिली तारीख - डिसेंबर २०२४
- दुसरी तारीख - मार्च-एप्रिल २०२५ (गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर)
- तिसरी तारीख - श्रावण महिन्यात १५ ऑगस्टपूर्वी (विधिमंडळात सरकारचे उत्तर)
---------
पिढ्यानपिढ्या १६० चौरस फुटांच्या घरात आम्ही कसेबसे दिवस काढले आहेत. आतापर्यंत ठेवलेली सहनशीलता आणि पाठपुराव्यामुळेच आमचे चाळ ते टॉवर असा प्रवास यशस्वी होत आहे. आम्हा बीडीडीवासीयांसाठी हा आनंदाचा क्षण असणार आहे.
- किरण माने, सरचिटणीस, अखिल बीडीडी चाळ भाडेकरू हक्क संरक्षण समिती

आम्हाला चाळीतून थेट गगनचुंबी टॉवरमध्ये घर मिळत आहे, त्याचा आनंद आहे. ५०० चौरस फुटाचे घर दिले जाणार होते; मात्र प्रत्यक्षात १५ चौरस फूट कमी असल्याचे निदर्शनास येत आहे. त्याबाबत खुलासा व्हायला हवा.
- सुनील ओव्हाळ, रहिवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com