कर्नाटकमध्ये एमडीचा कारखाना उद्ध्वस्त
कर्नाटकमध्ये एमडीचा कारखाना उद्ध्वस्त
३९० कोटींचे ड्रग्ज जप्त; साकीनाका पोलिसांची कारवाई
मुंबई, ता. २८ : पालघर आणि कर्नाटक येथे केलेल्या कारवाईत साकीनाका पोलिसांनी चार महिन्यांत मेफेड्रॉन (एमडी) या अमली पदार्थाची निर्मिती करणारे दोन कारखाने उद्ध्वस्त केले आहेत. पालघरमधील कारवाईनंतर मिळालेल्या माहितीवरून कर्नाटकमध्ये कारवाई करण्यात आली. आतापर्यंत आठ आरोपींना अटक करून ३८२ कोटी रुपयांच्या १८८ किलो एमडीसह एकूण ३९० कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कर्नाटकच्या म्हैसूर शहरानजीक रिंग रोडच्या सेवा रस्त्यावरील पत्र्याच्या शेडमध्ये गॅरेज व्यवसायाआड हा कारखाना सुरू होता. साकीनाका पोलिस पथकाने २६ जुलैला त्यावर छापा घालून तब्बल १८८ किलो एमडीसह एकूण ३८२ कोटींचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत चार प्रमुख आरोपींना अटक करण्यात आली. त्यातील दोघे गुजरातचे, एक मुंबईचा तर एक स्थानिक असल्याची माहिती पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिली.
पालघर ते म्हैसूर असा लागला सुगावा
- एप्रिलअखेरीस साकीनाका पोलिस पथकाने सादिक शेख (वय २८) यास ५३ ग्रॅम एमडीसह अटक केली. सादिकने वांद्रे येथील सलीम शेख ऊर्फ सलीम लंगडा याच्यासाठी काम करीत असल्याचे सांगितले.
- सलीमला मिरा रोडच्या सिराज पंजवानीकडून एमडीचा पुरवठा होतो, अशी माहितीही सादिकने दिली. त्याआधारे पथकाने पंजवानीला अटक केली.
- त्यानंतर वसईतील कामणगाव येथील एम. के. ग्रीन, एएसी ब्लॉक कंपनीत छापा मारून एमडीच्या कारखाना उघडकीस आणला. तेथे आठ कोटींचे साडेचार किलो एमडी आणि आवश्यक रसायने, तंत्रसामग्री जप्त करण्यात आली.
- २५ जुलैला सलीम लंगडा साकीनाका पोलिसांच्या हाती लागला. त्याच्या चौकशीतून म्हैसूर येथील कारखान्याची माहिती मिळताच पथकाने दुसऱ्या दिवशी तेथे छापा घातला.
----
कारवाईत हे सापडले
- १८८ किलो तयार एमडी, दोन ओव्हन, १२ हीटिंग मशीन, १६८ किलो आयसोप्रॉपिलिन अल्कोहोल, १६८ किलो ॲसिटोन, ६० किलो क्लोरोफॉर्म, २५ किलो मॅग्नेशियम सल्फेट इत्यादी.
--------------
कोट
दोन्ही कारखान्यांत तयार होणारे एमडी प्रामुख्याने मुंबई महानगर परिसरात विकले जात होते. या अमली पदार्थांची म्हैसूर ते मुंबईपर्यंतची वाहतूक, अन्य सहभागी आरोपींबाबत सखोल तपास सुरू आहे.
- दत्ता नलावडे, पोलिस उपायुक्त, परिमंडळ १०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.