रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांना मिळणार चालना

रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांना मिळणार चालना

Published on

रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांना मिळणार चालना
आर्थिक बाबींचा अभ्यास करणार; नवीन विकसक नेमण्याच्या हालचाली
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : १०-१५ वर्षांपासून रखडलेले झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी एसआरए प्राधिकरणाने कंबर कसली आहे. त्यानुसार जवळपास २५० प्रकल्प पूर्ण करण्याबाबत वेगवेगळ्या प्राधिकरणाला जबाबदारी दिलेली असतानाच आता उर्वरित ३५० प्रकल्पांना हात घातला जाणार आहे. त्यांच्या झालेल्या कामाचा आणि आर्थिक बाबींचा अभ्यास कार्यकारी अभियंत्यांच्या माध्यमातून केला जाणार आहे. त्यानंतर पात्र विकसकाला सदर प्रकल्प पूर्ण करण्यासाठी देण्याचे एसआरएचे नियोजन आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात जवळपास ६०० हून अधिक झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प रखडले आहेत. त्यामुळे येथील लाखो कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. तसेच आर्थिक आणि कायदेशीर अडचणीमुळे मूळ विकासकही त्याकडे गांभीर्याने पाहात नाही. त्यामुळे एसआरए प्राधिकरणाने सदरचे प्रकल्प काढून घेऊन मार्गी लावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याचाच भाग म्हणून म्हाडा, एमएमआरडीए, महापालिका अशा सरकारच्या विविध प्राधिकरणाकडे त्यांच्या जागेवरील रखडलेले एसआरए प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी दिली आहे.
आता इतर अपूर्ण असलेल्या प्रकल्पांचे काम किती झाले आहे, त्यावर किती खर्च झाला आहे, आणखी किती खर्च करावा लागेल, कायदेशीर अडचणी काय आहेत याचा अभ्यास करण्यासाठी तांत्रिकबाबतीत तज्ज्ञ असलेल्या पाच कार्यकारी अभियंत्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यापैकी दोघांची नियुक्ती झाली आहे. त्यांना संबंधित प्रकल्पांचा अभ्यास करण्याची जबाबदारी दिली जाणार आहे. त्यानुसार त्यांचा अहवाल आल्यानंतर सध्याचा विकसक प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पुढे न आल्यास नवीन विकसकांच्या माध्यमातून पूर्ण केला जाणार असल्याचे एसआरएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

३० विकसकांचे पॅनेल
रखडलेले एसआरए प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विकसक असणे आवश्यक आहे. त्यामुळे अशाप्रकारचे रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एसआरए प्राधिकरणाने ३० विकसकांचे पॅनेल तयार केले आहे. त्यामुळे प्रकल्पाचा अभ्यास झाल्यानंतर ते सदर पॅनेलवरील विकसकांना पुढील कामासाठी दिले जाऊ शकतात.

- झोपडपट्टीधारकांना एसआरए योजनेत आतापर्यंत न मिळालेले घर वेळेत लवकर मिळावे, त्यासाठीचा रोडमॅप ठरवण्याचे एसआरएचे नियोजन आहे. त्यासाठीच विकसकांचे पॅनल, अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ लोकांची नियुक्ती केली जात आहे.

- रखडलेले एकूण प्रकल्प - ६०० हून अधिक
- विविध प्राधिकरणाला दिलेले प्रकल्प - २५०
- शिल्लक प्रकल्प - ३५०
- पॅनेलवरील विकसक - ३०
- अभ्यासासाठी पाच तज्ज्ञ नेमणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com