गिरण्यांच्या भूखंड विकासात नियमभंग
गिरण्यांच्या भूखंड विकासात नियमभंग
विधानसभा समितीची पाहणी; महापालिकेला धरले धारेवर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : राजधानी मुंबईच्या मध्यवर्ती भागातील कमला, मफतलाल, पिरामल, गीता टॉकीज, श्रीनिवास, पिरामिड, भारत, डॉन, ज्युपिटर, अपोलो, एल्फिन्स्टन आणि सिनर्जी आयटी पार्क या ठिकाणी भूखंडांवर सुरू असलेल्या पुनर्विकास प्रकल्पांत गंभीर अनियमितता झाल्याचे उघडकीस आले आहे. विधानसभेच्या आश्वासन समितीने पाहणी दौरा करून याप्रकरणी पालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.
आमदार रवि राणा यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत सदस्य माजी मंत्री, आमदार संजय बनसोडे, पराग शहा, अमित झनक, विक्रम पाचपुते, अमोल पाटील आणि वरुण सरदेसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त बी. पी. शर्मा, अभिजित बांगर आणि अश्विनी जोशी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पुनर्विकास प्रकल्पांत पार्किंग झोन, बेकायदा बांधकाम, अग्निशमन दलाचे ना-हरकत, आयटी प्रणाली, अतिक्रमण स्थिती, चटई निर्देशांकातील वाढ या सर्व मुद्द्यांवर समितीने सखोल तपासणी केली. अनेक ठिकाणी नियम मोडल्याचे प्राथमिक तपासणीत स्पष्ट झाले आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून आवश्यक दस्तावेजांची माहिती तत्काळ देण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांना दिले.
आयटी प्रणालीशी जोडलेल्या समितीच्या निरीक्षणात असे आढळून आले, की या परिसरातील १८ इमारतींपैकी फक्त सात इमारतींतच काही प्रमाणात आयटी प्रणालीचा वापर होत आहे, तर उर्वरित इमारतींमध्ये अद्याप कोणतीही संगणकीकरण यंत्रणा लागू करण्यात आलेली नाही. पुनर्विकास प्रकल्पांत कामगारांसाठी घरे आणि मूलभूत सुविधांची तरतूद करण्याचे आश्वासन दिले गेले होते. आजतागायत त्याची अंमलबजावणी झाली नसल्याचे समितीने नमूद केले.
अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांच्या अहवालात संबंधित बांधकामांत नियमभंग झाल्याचे नमूद असूनही पालिकेने कोणतीही कारवाई का केली नाही, असा प्रश्न समितीने उपस्थित केला. यावर समिती अध्यक्ष रवि राणा यांनी अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांना तत्काळ कारवाईचे निर्देश दिले.
--
कागदपत्रांची चौकशी करणार!
आराखड्यांत पालिकेने ठेकेदारांच्या सोयीप्रमाणे बदल केल्याची नोंद समितीने घेतली आहे. यासंदर्भातील सर्व कागदपत्रांची चौकशी केली जाणार आहे. या समितीचा अहवाल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.