
एसटी आगारांत आता मिळणार पेट्रोल-डिझेल
लवकरच सुरू होणार किरकोळ विक्री
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळ लवकरच उत्पन्नाचा नवा मार्ग शोधण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ विक्रीमध्ये उतरणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त व्यावसायिक भागीदारीतून एसटी महामंडळ आपल्या जागांवर ‘पेट्रो-मोटेल हब’ उभारणार आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आता एसटी आगारांमध्येही इंधन खरेदी करता येणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून एसटीची आर्थिक स्थिती नाजूक आहे. केवळ प्रवासी तिकीटविक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून न राहता, उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करणे आवश्यक आहे. सध्या एसटी महामंडळ इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपन्यांकडून डिझेल खरेदी करते. राज्यात एसटीच्या स्वतःच्या २५१ जागांवर सध्या फक्त बससाठी इंधन भरले जाते. आता याच अनुभवाचा वापर करून एसटीने व्यावसायिक स्तरावर इंधनविक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.
कसा असेल हा ‘पेट्रो-मोटेल हब’?
एसटी महामंडळाच्या मालकीच्या ज्या जागा रस्त्यालगत आणि व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत, त्या ठिकाणी ‘पेट्रो-मोटेल हब’ उभारले जातील. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपन्यांच्या मदतीने या जागेचे सर्वेक्षण केले जात आहे. यासाठी २५ बाय ३० मीटर आकाराच्या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. या हबमध्ये केवळ पेट्रोल आणि डिझेलची विक्रीच नाही, तर इतर रिटेल दुकानेही असतील, ज्यामुळे व्यवसायाच्या संधी वाढतील आणि एसटी महामंडळाला अतिरिक्त महसूल मिळेल.
भविष्यात या व्यावसायिक इंधनविक्रीतून एसटी महामंडळ सर्वसामान्य ग्राहकांसाठी एक विश्वसनीय इंधन केंद्र उपलब्ध करून देईल आणि महामंडळाला उत्पन्नाचा नवा स्रोत मिळेल.
प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री