
विकसकांच्या हातचलाखीने म्हाडाच्या पदरी अडगळीतील घरे!
राज्य सरकारच्या परिपत्रकाचा फटका; मास्टर लिस्टवरील अनेकांची सदनिका बदलून देण्याची मागणी
बापू सुळे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : मुंबई शहरातील उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास करताना संबंधित विकसकाने अतिरिक्त क्षेत्रफळापोटी म्हाडाला काही सदनिका देणे बंधनकारक आहे. त्यानुसार या सदनिका देताना विकसक हातचलाखी करीत असून, पुनर्रचित इमारतीत सदनिका न देता अँटॉप हिल, माहुल, मानखुर्द अशा अडगळीच्या ठिकाणी देत आहेत. त्या सदनिका म्हाडाकडून मास्टर लिस्टवरील विजेत्यांना दिल्या जात असल्या तरी अनेकांनी त्या बदलून मिळाव्यात, अशी म्हाडाकडे मागणी केल्याने विकसकांची हातचलाखी उघडकीस आली आहे.
मुंबई शहरात जवळपास १३ हजारांहून अधिक सेस इमारती असून, त्याचा पुनर्विकास खासगी विकसक म्हाडाची एनओसी घेऊन करतात. या इमारतीमधील रहिवाशांना देय असलेल्या घरांशिवाय अतिरिक्त क्षेत्रफळाच्या बदल्यात म्हाडाला काही सदनिका देणे बंधनकारक आहे. सेस इमारतीच्या जागेवर उभ्या राहिलेल्या पुनर्रचित इमारतीत सदनिका देणे अपेक्षित असते. मात्र या इमारतीत सदनिका उपलब्ध नसल्यास लगतच्या वॉर्डमध्ये सदनिका दिल्या जाव्यात, असे परिपत्रक राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने कोरोना काळात काढले आहे. त्यामुळे विकसक मोकाट सुटले असून, म्हाडाला देय असलेले क्षेत्रफळ ते मूळ जागेवर उभारलेल्या इमारतीत न देता सर्रासपणे इतरत्र देत असल्याचे म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
४० हून अधिक लोकांचा सदनिका बदलण्यासाठी अर्ज
म्हाडाने गेल्या दीड वर्षांत १५८ आणि १०५ अशा लोकांच्या दोन लॉटरी काढून त्यांना सदनिका दिल्या आहेत. मात्र बऱ्याच सदनिका अडगळीच्या ठिकाणी किंवा माहुल, अँटॉप हिल अशा ठिकाणी आहेत. त्यामुळे ४० हून अधिक विजेत्यांनी सदनिका बदलून मिळावी म्हणून अर्ज केले आहेत.
एसआरएच्या इमारतीत सदनिका देण्यापर्यंत विकसकांची मजल
मास्टर लिस्टमधील रहिवाशांच्या मूळ इमारती मलबार हिल, वळकेश्वर, नरीमन पॉइंट, काळबादेवी, महालक्ष्मी अशा उच्चभ्रू वस्तीत होत्या. तसेच विकसक पुनर्विकासांतर्गत अशाच चांगल्या परिसरात पुनर्रचित इमारती उभारत आहेत. पण त्या ठिकाणी म्हाडाला सदनिका न देता सरकारी परिपत्रकाचा आधार घेत इतरत्र देतात. अनेक विकसकांची त्यापुढे मजल गेली असून, एसआरए प्रकल्पात सदनिका विकत घेऊन म्हाडाला देतात. त्यामुळे ज्या व्यक्तीचे दक्षिण मुंबईत घर होते, त्या अँटॉप हिलसारख्या ठिकाणी कसे वास्तव्यास जातील हा प्रश्न आहे.
म्हाडाची समिती
याआधी विकसकांकडून म्हाडाला दिल्या जाणाऱ्या सदनिका अडगळीच्या ठिकाणी असत. त्यामध्ये व्हेंटिलेटशनचा अभाव, अंतर्गत रचना सुमार दर्जाची असे. अनेकदा त्या राहण्यायोग्य नसत. त्याची दखल घेत म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी विकसकाकडून मिळणारे घर राहण्यायोग्य आहे का याची तपासणी करण्यासाठी सह मुख्य अधिकारी, उपमुख्य अधिकारी, कार्यकरी अभियंता यांची समिती नेमली असून, ती घराची पाहणी करूनच ताबा घेत आहेत. त्यामुळे आता चांगल्या सदनिका म्हाडाला मिळू लागल्या आहेत. मात्र त्या इतरत्र कुठेही न देता पुनर्रचित इमारतीत द्याव्यात, याबाबत सरकारने धोरणात सुधारणा करणे आवश्यक आहे.
८२ वर्षांची आई अँटॉप हिलला एकटी कशी राहणार?
आमची सेस इमारत भायखळा येथे जे. जे. रुग्णालयाजवळ होती. मात्र ती अतिधोकादायक झाल्याने म्हाडाने रिकामी करीत आम्हाला कन्नमवारनगर येथे ट्रान्झिट कॅम्पमध्ये घर दिले. तिथे सध्या आमची ८२ वर्षांची आई राहते, असे सविता पाटकर यांनी सांगितले. पण आता मास्टर लिस्टच्या लॉटरील अँटॉप हिल येथे घर मिळाले आहे. त्यामुळे वृद्ध आई एकटी त्या ठिकाणी कशी राहू शकेल, असा सवाल सविता यांनी केला आहे. तसेच आमचे मूळ घर भायखळा येथे चांगल्या वस्तीत होते, मग आता अँटॉप हिलला घर का घ्यावे? म्हाडाने आम्हाला लालबाग, परळसारख्या भागांत घर द्यावे. त्यामुळे आई त्या ठिकाणी एकटी राहू शकेल आणि आम्हीही येऊन-जाऊन तिची काळजी घेऊ शकू. त्यासाठीच आम्ही सदनिका बदलून देण्याची मागणी केली आहे.
सेस इमारतीचा पुनर्विकास केल्यानंतर म्हाडाला देय असलेल्या सदनिका त्याच इमारतीत देणे अपेक्षित आहे, पण त्या ठिकाणी सदनिका उपलब्ध नसल्यास लगतच्या वॉर्डात दिल्या जाव्यात, असे परिपत्रक आहे. त्याचा आधार घेत अनेक विकसक इतर ठिकाणी सदनिका देतात. विकसकाने दिलेल्या सदनिका योग्य आहेत की नाही, याची तपासणी करूनच आम्ही ताबा घेतो, त्यासाठी समिती कार्यरत आहे.
- अनिल वानखडे,
उप मुख्य कार्यकरी अधिकारी, म्हाडा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.