बेवारस वाहनांचे कारायचे काय?

बेवारस वाहनांचे कारायचे काय?

Published on

बेवारस वाहनांचे करायचे काय?
चार हजार गाड्यांची पोलिसांना चिंता

नितीन जगताप ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : मुंबईत अनेक महत्त्वाच्या रस्त्यांच्या कडेला बेवारस वाहनांविरोधात वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबविली. त्यातून चौक्यांमध्ये ३,९०१ बेवारस वाहने जमा करण्यात आली; मात्र आता गाड्यांच्या मालकांची प्रतीक्षा असून ही वाहने ठेवायची कुठे, याची पोलिसांना चिंता आहे.
शहरातील महत्त्वाचे रस्ते तसेच रहिवासी भागांमध्ये अनेक महिने तसेच वर्षांपासून धूळ खात पडलेल्या बेवारस अवस्थेतील दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही वाहने नेमकी कुणाची, या वाहनांचे मालक कोण, असा प्रश्न अनेक वेळा पडतो. यातील अनेक वाहने ही चोरीसारख्या घटनांसाठी वापरून रस्त्यांच्या कडेला सोडली जातात. दुचाकींचा वापर अनेकदा साखळीचोरी आणि अल्पवयीन मुलांकडून मौजमजेसाठी केल्याचे दुचाकीचोरीच्या घटनांमधून समोर आले होते.
एखादे वाहन अनेक वर्षांपासून एकाच जागेवर आढळल्यास अथवा त्याबाबत तक्रार आल्यास वाहतूक पोलिस किंवा पालिका त्या वाहनावर नोटीस लावते. १५ दिवसांत वाहन जागेवरून न हलविल्यास पालिका ते वाहन जप्त करते. जप्त केलेले वाहन सोडविण्यासाठी दंड भरावा लागतो. मुदतीत वाहन न सोडवल्यास वाहतूक पोलिस किंवा पालिका या वाहनाचा लिलाव करू शकते. ठरावीक कालावधीनंतर लिलावाची प्रक्रिया राबवली जाते. तत्पूर्वी महापालिका पुन्हा जाहिरातीद्वारे मालकांना वाहन सोडविण्याचे आवाहन करते. मुदत दिलेल्या दिवसांत वाहन न सोडवल्यास लिलाव केला जातो. वाहतूक पोलिसांच्या ताब्यात असलेल्या वाहनामध्ये सर्वाधिक दुचाकी गाड्या आहेत. रिक्षा बेवारस वाहनात दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यानंतर कार आणि टॅक्सीचा समावेश आहे.
...
भंगारात काढताना अडचणी
- बेवारस वाहनांवर पतसंस्था आणि वित्तसंस्थांचे कर्ज असू शकते.
- काही वाहने गुन्ह्यांसाठी वापरलेली असू शकतात.
- काही वाहने इतर शहरांतून चोरून मुंबईत आणलेली असू शकतात.
...
सर्वाधिक बेवारस वाहने
वाहतूक विभाग - संख्या
ओशिवरा - ४०५
सांताक्रूझ - ३००
मानखुर्द - २९३
गोरेगाव - २४८
पायधुनी - २६३
...
कमी बेवारस वाहने
वाहतूक विभाग - संख्या
कांदिवली - २
काळबादेवी - ८
विक्रोळी/वांद्रे - १०
कांजूरमार्ग - १४
दहिसर/दिंडोशी - १७
...
मंत्रालय परिसरात मर्सिडीज...
मंत्रालय, मंत्र्यांचे निवासस्थाने, पोलिस मुख्यालय आदी महत्त्वाची कार्यालय कुलाबा वाहतूक पोलिस विभागाच्या हद्दीत येतात. या विभागात १९४ बेवारस वाहने पडून आहेत. यामध्ये एका महागड्या मर्सिडीज गाडीचादेखील समावेश आहे.
...
प्रक्रियेला वेळ लागतो!
वेळावेळी बेवारस वाहनांचा आढावा घेतला जातो. बेवारस वाहनांचा लिलावही केला जातो; परंतु जागेची समस्या आहे. ठिकठिकाणी पालिकेकडून जागा उपलब्ध करून दिली जाते. आमची स्वतःची जागा नाही. त्यासाठी पत्रव्यवहार करावा लागतो. या प्रक्रियेला वेळ लागतो, असे एका वरिष्ठ वाहतूक पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
...
राज्य सरकारने बेवारस गाड्यांची कमी वेळात विल्हेवाट लावता येईल, यासाठी धोरण तयार करणे आवश्यक आहे.
- रणजित गाडगीळ, वाहतूकतज्ज्ञ
...
वापरात नसलेले वाहन भंगारात काढणे आवश्यक आहे. त्याबाबत आपल्याकडे धोरण नाही. मुंबईत अनेक जण वाहन भंगारात न जाऊ देता वाहने कुठेही उभी करतात आणि त्याबाबत विसरून जातात. याबाबत धोरण आणल्यास अशा प्रकरणांना आळा बसेल.
- ए. व्ही. शेनॉय, वाहतूक अभ्यासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com