कबुतरांना उपासमारीने मारणे अमानुष!
कबुतरांना उपासमारीने मारणे अमानुष!
पक्षीप्रेमी नागरिकांची हळहळ; दादर येथे मृत कबुतरांचा खच
मुंबई, ता. ४ : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दादर येथील कबुतरखाना प्लॅस्टिकच्या कापडाने झाकून तेथे खाद्य टाकणे बंद करण्यात आले आहे. यामुळे कबुतरांना खाद्य न मिळाल्याने त्यांची उपासमार होत असून, या परिसरात मोठ्या संख्येने कबुतरांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे परिसरात मृत कबुतरांचा खच पडलेला दिसत आहे. कबुतरांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय असला तरी त्यांना उपासमारीने मारणे अमानुष असल्याची हळहळ स्थानिक नागरिक आणि पक्षीप्रेमी व्यक्त करीत आहेत.
कबुतरखान्याजवळ दररोज अनेक कबुतरे मृतावस्थेत आढळत आहेत. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरू लागली आहे. कबुतरखाना बंद झाल्याने ही कबुतरे अन्नाच्या शोधात रस्त्यांवर फिरत आहेत. यामुळे वाहनांखाली येऊन अपघातानेही कबुतरांचा मृत्यू होत असल्याचे वास्तव समोर येत आहे. वाहनांची वर्दळ असलेल्या ठिकाणी जमलेली कबुतरे अचानक उडाल्याने काही ठिकाणी लहान अपघात घडत आहेत.
न्यायालयाने आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छतेच्या दृष्टीने कबुतरांना अन्न टाकण्यावर बंदी घालण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर महापालिकेने कारवाई करून कबुतरखाना बंद केला. परिणामी कबुतरांचा जीव जात असल्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
........
कबुतरखाना अचानक बंद झाल्याने कबुतरांच्या जीवावर बेतले आहे. माणुसकी म्हणून सध्या कबुतरांसाठी तात्पुरत्या स्वरूपात नियंत्रित अन्नव्यवस्था करावी.
- उषा परमार, पक्षीप्रेमी
......
आरोग्याचा धोका लक्षात घेत निर्बंध ठेवावेत; पण त्याच वेळी प्राण्यांचे संरक्षण ही जबाबदारीही प्रशासनाने पार पाडावी.
- रेखाबेन, पक्षीप्रेमी
.......
कबुतरांची संख्या आटोक्यात ठेवणे आवश्यकच आहे, पण त्यासाठी त्यांना अशा तऱ्हेने उपाशी मारणे ही निर्दयता आहे.
- सुनीता सुराना, पक्षीप्रेमी
......