गणेशमूर्ती आगमनाचा इव्हेंट

गणेशमूर्ती आगमनाचा इव्हेंट

Published on

गणेशमूर्ती आगमनाचा इव्हेंट
मिरवणुकीसह विविध स्पर्धांचा पोलिसांवर ताण
मुंबई, ता. ५ : शहरातील बहुतांश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आगमन मिरवणुकांसह आयोजित केलेल्या विविध स्पर्धा पोलिसांच्या ताणात भर घालत आहेत. फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी आणि रील स्पर्धांमुळे आगमन मिरवणुकांमध्ये अनावश्यक गर्दी वाढतेच. तसेच नेमका क्षण टिपण्याच्या नादात अनेक स्पर्धक जीवघेणी स्टंट करतात, असे निरीक्षण पोलिसांनी नोंदवले.
काही वर्षांपूर्वी सार्वजनिक मंडळांनी उभारलेला देखावा, चलचित्र आणि विसर्जन मिरवणूक मुंबईकरांचे खास आकर्षण ठरे. सध्या मात्र चित्रशाळेत तयार झालेली मूर्ती मंडपापर्यंत आणणे हाही एक इव्हेंट म्हणून साजरा करण्याची चढाओढ शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये रुजते आहे. त्यातून आपले मंडळ इतरांपेक्षा कसे वरचढ आहे हे सिद्ध करण्यासाठीची खटपट सुरू झाली आहे.
जुलै महिन्यापासूनच प्रत्येक शनिवारी, रविवारी भारत माता, परळ येथील चित्रशाळेतून त्या त्या परिसरात गणेशमूर्तींची वाजतगाजत मिरवणूक काढली जात आहे. बहुतांश मिरवणुकांमध्ये आकर्षण ठरावे म्हणून पारंपरिक वाद्यवृंद, ढोल पथकांसोबत फटाक्यांच्या आतषबाजीचा समावेश होतो.
इतक्यावरच न थांबता शहरातील बहुतांश मंडळांनी आगमन सोहळ्याची उत्कृष्ट छायाचित्रे, व्हिडिओ आणि रील आदी स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धांची माहिती देणारे पोस्टर, बॅनर चित्रशाळेपासून संपूर्ण मुंबईत जागोजागी लावण्यात आले आहेत. विजेत्यांना आकर्षक बक्षिसाची हमी त्यावर आढळते. त्यामुळे त्या त्या परिसरासह संपूर्ण मुंबई आणि महानगर प्रदेशातून प्रशिक्षित, व्यावसायिक फोटोग्राफर, व्हिडिओग्राफरसोबत हाती कॅमेरे घेतलेल्या हौशी तरुणांची गर्दी या मिरवणुकांमध्ये होत आहे. त्यातच इन्स्टाग्रामवर रील तयार करणारे तरुणही मोठ्या संख्येने या आगमन मिरवणुकांमध्ये सहभागी होताना दिसत आहेत.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शहरात दीड हजारांहून अधिक सार्वजनिक मंडळे आहेत. प्रत्येक मंडळाच्या मिरवणुका सुरक्षितपणे संपन्न व्हाव्यात यासोबत वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून बंदोबस्त नेमावा लागतो. त्यात मंडळांनी आयोजित केलेल्या स्पर्धांमुळे मिरवणुकांना अनावश्यक गर्दी वाढते. स्पर्धक उंचावर चढण्याचा, रस्त्यावर मधोमध उभे राहून नेमका क्षण टिपण्याच्या नादात जीवाचा धोका पत्करत आहेत.

मिरवणुकीवर, वाहतूक नियमनावर लक्ष ठेवावे की स्पर्धकांवर?

पोलिस विचारतात, याला जबाबदार कोण?
- आगमन सोहळा किंवा मिरवणुकांना होणाऱ्या गर्दीमुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होते. त्यात तातडीने उपचारांची गरज असलेल्या रुग्णाला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिका अडकल्यास...
- आग लागल्याचा कॉल प्राप्त झाल्यावर अग्निशमन दलाचे बंब, अन्य वाहने खोळंबल्यास...
- नेमका क्षण टिपण्यासाठी उंचावर चढलेला स्पर्धक पडल्यास...
- गर्दीत रेटारेटीत एखाद्या अफवेने चेंगराचेंगरी झाल्यास...
- गर्दीचा फायदा घेत महिला किंवा बालकांविरोधी गुन्हे घडल्यास...
- या गर्दीत मोबाईल चोरी, पाकीटमारी झाल्यास...


पोलिसांकडून नोटीस
आगमन मिरवणुकांची, त्यात आयोजित स्पर्धांबाबत परवानगी किंवा आगाऊ माहिती न देणाऱ्या मंडळांना पोलिसांकडून नोटीस बजावली जाण्याची शक्यता आहे. त्याबाबत वरिष्ठ पोलिस पातळीवर बैठका सुरू असल्याचे समजते.

१० ऑगस्टला १०० मूर्तींचे आगमन
शहरातील शंभरहून अधिक सार्वजनिक गणेशमूर्ती मंडळे आपापल्या परिसरातील मंडपांमध्ये मूर्ती नेणार आहेत. त्यापुढील रविवारीही असेच चित्र असेल.

विसर्जनाप्रमाणे आगमन मिरवणुकांसाठीही वाहतुकीचे नियोजन करावे, अशी विनंती पोलिस आयुक्त देवेन भारती यांना करण्यात आली आहे. या मुद्द्यासह एकूण गणेशोत्सवाबाबत मंगळवारी बैठक होईल. त्यात या मुद्द्यांवर चर्चा होईल. मंडळांकडून आयोजित स्पर्धांबाबत नेमकी माहिती नसल्याने याबाबत आताच काही बोलणे उचित ठरणार नाही.
- ॲड. नरेश दहिबावकर
अध्यक्ष, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती

Marathi News Esakal
www.esakal.com