‘महादेवी’साठी नांदणीत दूरस्थ उपचार केंद्र
‘महादेवी’साठी नांदणीत
दूरस्थ उपचार केंद्र
जैन संस्थान मठाला ‘वनतारा’चा प्रस्ताव
मुंबई, ता. ६ : महादेवी ऊर्फ माधुरी हत्तिणीच्या स्थलांतरामुळे जनक्षोभ उसळल्यानंतर तिला परत पाठवण्याची सशर्त तयारी ‘वनतारा’ने दाखवली आहे. नांदणी गावातील जैन संस्थान मठ आणि राज्य सरकारशी समन्वय साधून तसेच न्यायालयाच्या परवानगीने कोल्हापूरनजीकच्या नांदणी परिसरात महादेवीसाठी दूरस्थ पुनर्वसन केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव ‘वनतारा’ने ठेवला आहे.
यासंदर्भात ‘वनतारा’ने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. नांदणी गावातील जैन संस्थान मठ आणि कोल्हापूरच्या लोकांच्या मनात महादेवीचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व असून वनतारास त्याची जाणीव आहे. महादेवी कोल्हापुरातच राहावी, अशी इच्छा असणाऱ्या भक्त, मठाचे नेते आणि लोकांच्या भावनांविषयी आम्हाला आदर आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.
महादेवीच्या स्थलांतरात ‘वनतारा’चा सहभाग हा केवळ सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालय यांच्या निर्देशांचे काटेकोर पालन करण्यापुरताच मर्यादित आहे. वनतारा हे स्वतंत्र बचाव आणि पुनर्वसन केंद्र आहे. त्यानुसार महादेवीची देखभाल, पशुवैद्यकीय सहाय्य आणि तिच्या निवासाची व्यवस्था ही आमची जबाबदारी आहे. वनताराने कधीही या हत्तिणीच्या स्थलांतराची शिफारस केली नाही किंवा तिचे स्थलांतर स्वत:हून केले नाही. कोणाच्याही धार्मिक प्रथा किंवा भावनांत हस्तक्षेप करण्याचा आमचा हेतू नाही, असेही वनताराने स्पष्ट केले आहे.
महादेवीला कोल्हापूरला परत आणण्यासाठी मठ आणि महाराष्ट्र सरकार यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर केलेल्या कायदेशीर अर्जास वनतारा पूर्ण पाठिंबा देईल. न्यायालय आणि परमपूज्य स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांनी मान्य केल्यास मठ आणि राज्य सरकारशी समन्वय साधून कोल्हापूरनजीकच्या नांदणी परिसरात महादेवीसाठी पुनर्वसन केंद्र सुरू करण्यात येईल. यासाठी उच्चाधिकार समितीच्या तज्ज्ञांशी सल्लामसलत केली जाईल, असेही निवेदनात नमूद केले आहे.
........
केंद्रामध्ये या सोयी-सुविधा प्रस्तावित
- हायड्रोथेरपी तलाव
- नैसर्गिक हालचालींसाठी वेगळे तळे
- लेसर थेरपी आणि उपचार कक्ष
- रात्रनिवारा
- हिरवीगार मोकळी जागा
- नैसर्गिक विधींसाठी वाळूने भरलेला हौद
- सुसज्ज पशुवैद्यकीय दवाखाना
- रबरी फ्लोअरिंग प्लॅटफॉर्म
- मऊ वाळूचे ढिगारे
----
...तर आम्ही क्षमा मागतो!
न्यायालयीन निर्देशानुसार आमचा सहभाग असला तरी जैन समुदायाला किंवा कोल्हापूरच्या लोकांना काही त्रास होत असेल तर मनःपूर्वक खेद व्यक्त करतो. मिच्छामी दुक्कडम - जाणूनबुजून किंवा अजाणतेपणे आमचे विचार, शब्द किंवा कृतीने तुम्ही दुखावले गेला असाल, तर त्याबद्दल आम्ही तुमची क्षमा मागतो, असे ‘वनतारा’ने म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.