मुंबई उच्च न्यायालयाच्या वास्तूची भूतदया
मुंबई उच्च न्यायालयाच्या वास्तूची भूतदया
कोरोनाकाळापासून ४० ते ५० मांजरींचे वास्तव्य; न्यायमूर्ती घेतात काळजी
मयूर फडके ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ ः सध्या हत्तीण आणि कबुतरांचा विषय चर्चेत आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये निर्णायक भूमिका घेणारे उच्च न्यायालय स्वतः प्राणिप्रेमी आहे. ‘भूतां परस्परे जडो मैत्र जीवांचे’ या ज्ञानोबा माउलींच्या ओळींप्रमाणेच कित्येक मांजरी मुंबई उच्च न्यायालयाच्या आवारात मनसोक्त हिंडत असतात. न्यायदान करणाऱ्या या वास्तूने या मांजरींना आपल्या इमारतीत आश्रय दिला आहे आणि न्यायमूर्तींसह तिथले मांजरप्रेमी त्यांची मनापासून काळजी घेतात. आज जागतिक मांजरदिनाच्या निमित्ताने न्यायालयाच्या वास्तूच्या या भूतदया अथवा मायाळू पैलूविषयी जाणून घेऊ.
या सगळ्याची सुरुवात झाली ती कोरोनाकाळापासून. कोरोनामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज ऑनलाइन सुरू होते. त्यामुळे या वास्तूमधल्या मोकळ्या जागांवर कबुतरांनी आश्रय घेतला. निसर्गाच्या अन्नसाखळीच्या नियमानुसार, कबुतरांच्या पाठोपाठ त्यांच्या शिकारीसाठी आसपासच्या परिसरातून मांजरीही येऊ लागल्या. न्यायालयाच्या भव्य वास्तूत आश्रयासाठी मिळालेल्या जागा पाहून अनेक मांजरींनी इथेच मुक्काम ठोकला. आता येथील मांजरींची संख्या ४० ते ५० इतकी आहे.
न्यायालयात काम करणारे सुकुमार भोसले हे त्यांची काळजी घेतात. त्यांना खाऊ घालणे, आरोग्याची काळजी घेणे, निर्बीजीकरण करणे ही सर्व जबाबदारी भोसले अगदी आनंदाने पार पाडतात. प्राणी, पक्ष्यांची शुश्रूषा करणे ही आपली आवड भोसले मागील अनेक वर्षांपासून जोपासत आले आहेत. त्यासाठी त्यांना वेळोवेळी न्यायमूर्ती, अधिकारी आणि कर्माचाऱ्यांनी सहकार्य केल्याचे ते सांगतात. इतक्या मांजरींना खाऊ घालणं हा एक मोठा प्रश्न असतो. सकाळच्या वेळी सुकुमार भोसले या मांजरींच्या खाण्याची जबाबदारी उचलतात. त्यासाठी एका स्वयंसेवी संस्था त्यांना खाणे पुरवते. तीच संस्था आसपासच्या परिसरातील अन्य मांजरींच्या खाऊची जबाबदारी उचलते आणि दररोज रात्री न्यायालयातील मांजरींनाही खाऊ घालते. त्यासोबतच मांजरींना लागल्यास, आजारी पडल्यास ही संस्था आपल्याला सर्वतोपरी सहकार्य करते, असेही भोसले यांनी सांगितले.
मांजरींच्या गमतीजमती
न्यायालयाच्या आवारात मुक्तपणे भटकणारी मांजरे न्यायमूर्तींच्या दालनातही जाऊन बसतात. वकिलांचे कोट खेचणे, पोलिसांच्या खुर्च्या नखांनी ओरबाडणे, पाण्याचा नळ सुरू करायला सांगून तिथेच पाणी पिणे, बसलेल्यांना त्रास देऊन उठवणे तिथे स्वतः पाय पसरून झोपणे, अशा अनेक खोड्या या मांजरी काढतात.
निवृत्तीनंतर मांजरांचे काय?
येत्या ३१ ऑगस्टला भोसले निवृत्त होणार आहेत. निवृत्तीनंतर मांजरांची जबाबदारी कोण उचलणार, हा प्रश्न त्यांना पडला आहे. मांजरांच्या खाण्याच्या वेळा पाळाव्या लागतात, निवृत्तीनंतर हे कोण करणार, ही चिंता त्यांना आतापासूनच सतावते आहे.
न्यायमूर्तींकडूनही शुश्रूषा
या मांजरांच्या देखभालीसाठी, त्यांची शुश्रूषा करण्यापासून ते त्यांच्यासाठी आर्थिक मदत करण्यापर्यंत शक्य ती सर्व मदत बहुतांश न्यायमूर्ती करत असल्याचे भोसले सांगतात. माजी मुख्य न्या. दीपांकर दत्ता, न्या. संभाजी शिंदे, न्या. पी.डी. नाईक, विद्यमान न्या. रेवती मोहिते-डेरे, न्या. सारंग कोतवाल, न्या. डॉ. नीला गोखले, न्या. मनीष पितळे, न्या. श्री चंद्रशेखर अशा अनेक न्यायमूर्तींचा उल्लेख ते करतात. न्यायालयाच्या आवारातल्या मांजरींना कुणीही त्रास देऊ नये, त्या झोपलेल्या असतील तर त्यांना उठवू नये किंवा गाडीखाली असतील तर गाडी जपून चालवावी, अशा सक्त सूचना न्यायमूर्तींनी दिल्याचे ते सांगतात.
न्यायमूर्तींचे किस्से
न्यायालयातील मांजरी अनेक न्यायमूर्तींच्या लाडक्या असल्याच्या कहाण्या आहेत. एखाद्या सुनावणीत त्यांच्यामुळे व्यत्ययही येतो; पण मांजरप्रेमी न्यायालयाने त्यांचे सहजीवन आपुलकीने स्वीकारले आहे. काही न्यायाधीशांनी या सहजीवनाचा उल्लेख आपल्या सुनावण्यांवेळीही केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.