कबुतरांना खाद्य घालणे सुरूच
कबुतरांना खाद्य घालणे सुरूच
सिव्हिक मार्शलमार्फत जनजागृती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : शहरातील कबुतरांच्या वाढत्या संख्येमुळे आजारांच्या फैलावाचा धोका लक्षात घेऊन मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरखाने, तसेच कबुतरांना खाद्य घालण्यावरील बंदी कायम ठेवली आहे. न्यायालयाचा आदेश स्पष्ट असूनही अनेक ठिकाणी कबुतरांना खाद्य घालण्याचे प्रकार सुरू आहेत. दरम्यान, पालिकेने सिव्हिक मार्शल नेमून जनजागृती सुरू केली.
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेने सीएसटी, जीपीओ, दादर आणि इतर ठिकाणचे कबुतरखाने झाकून बंद करण्याचा प्रयत्न केला. काही पशु-पक्षी संघटनांनी याला तीव्र विरोध करून रस्त्यावर उतरून हे कबुतरखाने पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला. दादर कबुतरखान्याजवळ परिस्थिती तणावपूर्ण बनली हाेती, तर पोलिस आणि पक्षिप्रेमींमध्ये झटापट झाल्याचीही नोंद आहे. वॉचडॉग फाउंडेशनचे प्रमुख गॉडफ्रे पिमेंटा आणि शिवसेना आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी नागरिकांना कबुतरांना खाऊ न घालण्याचे आवाहन केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कबुतरांना खाद्य घालण्यास न रोखण्याचे निर्देश दिल्यानंतर पक्षिप्रेमींनी पुन्हा खाणे देण्याची मोहीम हाती घेतली आहे. महापालिकेने आपल्या सिव्हिक मार्शलना कबुतरखान्यांच्या ठिकाणी तैनात करून लोकांना कबुतरांना खाऊ घालण्यास मज्जाव सुरू ठेवला आहे.
सिव्हिक मार्शलची तैनाती
माहीम (पश्चिम), लेडी जमशेदजी रोडवर सिव्हिक मार्शल तैनात आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कबुतरांना धान्य खाऊ घालण्यास ते थांबवत आहेत. नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कबुतरांना रस्त्यावर खाद्य घालू नये, कारण ती अनेकदा दुचाकी व मोटारींच्या चाकाखाली येऊन त्यांचा नाहक बळी जातो.
..........
कबुतरांना खाद्य टाकल्यामुळे बेकायदा कबुतरखान्यांचा फैलाव झाला आहे. त्यामुळे नागरिकांना आजारांचा धोका निर्माण झाला आहे. न्यायालयाने तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचे आदेश दिले असून, तिचा अहवाल सर्वांसाठी बंधनकारक असेल.
- डॉ. मनीषा कायंदे, आमदार, शिवसेना
.........
नागरिकांनी कबुतरांना रस्त्यावर खाद्य घालू नये. यामुळे ती अनेकदा दुचाकी किंवा गाड्यांच्या चाकाखाली येऊन जखमी होतात किंवा मरतात. त्यांच्या जीवावर बेतणारे असे कृत्य टाळणे ही सर्वांची जबाबदारी आहे. पक्षिप्रेमाच्या नावाखाली त्यांचा नाहक बळी जाऊ नये.
- गॉडफ्रे पिमेंटा, वॉचडॉग फाउंडेशन
..........
मुख्यमंत्र्यांनी स्वत: कबुतरांना खाद्य देण्यापासून रोखू नका, असे सांगितले आहे. कबुतरांना उपाशी मारणे अयाेग्य आहे. यामुळे लोक कबुतरांना खाणे देत असतील, तर त्यात वावगे काय? उगाच यावरून वातावरण तापवण्याचा कुणीही प्रयत्न करू नये.
- पुरण दोशी, पक्षिप्रेमी
.......
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.