रेल्वे स्थानकांची वाट बिकट!

रेल्वे स्थानकांची वाट बिकट!

Published on

रेल्वेस्थानकांची वाट बिकट!

फेरीवाल्यांचा अडथळा कायम; स्थानके केव्हा घेणार मोकळा श्वास?

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : मुंबईची जीवनवाहिनी म्हटले की लाेकल आणि गर्दीने गजबजलेली रेल्वे स्थानके डोळ्यासमोर येतात. मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील या स्थानकांतून दररोज ५० लाखांच्या आसपास प्रवासी येथून ये-जा करीत असतात. बहुतेक सर्व स्थानकांना बेकायदा फेरीवाल्यांचा गराडा पडला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, कुर्ला, घाटकोपर, वांद्रेसह सर्वच स्थानकांकडे जाणारे मार्ग फेरीवाल्यांनी गिळंकृत केल्यामुळे प्रवाशांना अडथळ्यांची शर्यत पार करीत लाेकल पकडावी लागत आहे. मध्यंतरी उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर पालिका आणि रेल्वे प्रशासनाने केलेल्या कारवाईचा अपवाद वगळता फेरीवाल्यांना काेणाचाच धाक नसल्याचे दिसते. ‘सकाळ’ने आढावा घेतल्यानंतर रेल्वेस्थानके मोकळा श्वास केव्हा घेणार, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
...
कुर्ला स्थानकात चालणे दुरपास्त
कुर्ल्यात मध्य आणि हार्बर रेल्वेमार्ग एकत्र येतात. तसेच वांद्रे-कुर्ला संकुलाकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही प्रचंड असते. त्यामुळे हे स्थानक कायम गर्दीने फुललेले असते. कुर्ला पश्चिमेकडील स्टेशन रोड, एस. जी. बर्वे रोडवर सकाळपासून रात्री उशिरापर्यंत फेरीवाल्यांचाच कब्जा असतो. रस्त्यावर पसरलेली पथारी, बाकडे आणि ढकल गाड्यांतून प्रवाशांना कसाबसा मार्ग काढत स्थानकात पोहोचावे लागते; मात्र त्याकडे ना रेल्वेचे, ना महापालिकेचे लक्ष अशी परिस्थिती आहे. त्यामुळे दिवसेंदिवस फेरीवाल्यांची मुजोरी वाढत आहे.

- पश्चिमेकडील मुख्य प्रवेशद्वारावरच रेल्वे पोलिसांची गाडी उभी राहत असल्यामुळे प्रवाशांची कोंडी
- रेल्वे तिकीटघराला लागूनच फेरीवाल्यांचे स्टॉल
- रस्त्यावर मांडलेल्या दुकानांमुळे चालणेही कठीण
- चुकून धक्का लागल्यास दादागिरीही केली जाते
---------
चेंबूर स्थानकावर कब्जा
चेंबूर स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या फुटपाथवर इलेक्ट्रॉनिक वस्तू, फळे आणि कपड्यांची दुकाने थाटलेली दिसतात. तसेच सध्या सुरू झालेल्या सण-समारंभांमुळे अनेक जण रस्त्यावरील खरेदीसाठी गर्दी करीत असल्याने चालायचे कुठून, स्थानकापर्यंत पोहोचायचे कसे, असे प्रश्न प्रवाशांना पडत आहेत.
- चेंबूर स्थानकाच्या दिशेने येणाऱ्या स्कायवॉकवरही फेरीवाल्यांचे अतिक्रमण
- स्थानकाबाहेरच मोठ्या प्रमाणात उभ्या केलेल्या ऑटोरिक्षांचा प्रवाशांना त्रास
----------
सीएसएमटी मोकळा श्वास केव्हा घेणार? (नितीन बिनेकर)
मुंबईतील सर्वाधिक वर्दळीच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकालाही फेरीवाल्यांचा विळखा कायम आहे. मुख्य प्रवेशद्वारासमोर फेरीवाल्यांचा ठिय्या कायम आहे. पालिकेचे अतिक्रमणविरोधी वाहन तैनात असतानाही फेरीवाले बिनधास्त व्यवसाय करतात. सकाळी सीएसएमटी स्थानकातून कार्यालयात जाण्यासाठी आणि सायंकाळी स्थानकात येणाऱ्या प्रवाशांना मोठी कसरत करावी लागत आहे. भुयारी मार्गाबाहेर पोलिसांची मोठ्या प्रमाणात गस्त आहे. गस्त असेपर्यंत फेरीवाले गायब असतात; मात्र पाठ वळताच परिस्थितीत पुन्हा ‘जैसे थे’ होते.
- भुयारी मार्गाच्या सुरुवातीला पायऱ्यांवर अनेक स्टाॅल
- हेरिटेज इमारतीला लागून असलेल्या रस्त्यावर सर्रास कापडे विक्री
- इलेक्ट्राॅनिक वस्तूंच्या विक्रीची बाजरपेठ भरते
- रेल्वे पोलिसांची नावापुरतीच कारवाई
----------
घाटकोपरला मांडला फेरीवाल्यांनी बाजार (विष्णू)
घाटकोपर रेल्वेस्थानक हे मेट्रो १ शी जोडलेले आहे. त्यामुळे अंधेरी, ‘सिप्झ’सह पश्चिम उपनगरांत जाण्यासाठी अनेक जण घाटकोपर स्थानकात येतात. घाटकोपर मेट्रो स्थानकाखाली रस्त्यावरच फेरीवाल्यांनी बाजार मांडलेला असतो. त्यातच रिक्षा आणि बेस्ट बसचीही रांग लागलेली असते. त्यामुळे स्थानकात पोहोचताना प्रवाशांची दमछाक होते. येथे अनेकदा प्रवाशांना फेरीवाल्यांकडून मारहाण करण्याच्या घटना घडलेल्या असतानाही त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नसल्याबाबत प्रवाशांकडून नाराजी व्यक्त हाेत आहे.
- रस्त्यावर फेरीवाल्यांनी थाटले फळ-फुलांचे स्टॉल
- रस्त्याच्या दोन्ही बाजूला, फुटपाथवर दुचाकी पार्किंग
- पूर्व भागात स्थानकालगत फेरीवाल्यांचे अतिक्रमण वाढले
- रस्त्यावर बसलेल्या फेरीवाल्यांचा सर्वांना फटका
---------
दादर स्थानकाबाहेरची न संपणारी जत्रा (जयेश)
दादर स्थानक परिसर म्हणजे फेरीवाल्यांचे नंदनवन आहे. सकाळपासून सायंकाळपर्यंत येथील रस्त्यांवर फेरीवाल्यांचे साम्राज्य असते. त्यामुळे स्थानकातून बाहेर पडणाऱ्या आणि स्थानकात येणाऱ्या प्रवाशांना सेनापती बापट मार्गावरील उड्डाणपुलाखालील धक्काबुक्कीचा अनुभव घेऊन मार्ग काढावा लागत आहे. पुलाला लागून आणि पुलाखाली अशी दोन्ही बाजूने भरणाऱ्या मंडई, फुलबाजार आणि खाद्यपदार्थांच्या स्टाॅलमुळे दादर स्थानकाबाहेर प्रवाशांना किचाटाचा सामना करावा लागत आहे. पालिकेची ‘गाडी’, पोलिस वाहने येथे हजेरी लावतात. तेवढ्यापुरता प्रवाशांना दादर स्थानकाकडे येणाऱ्या प्रत्येक रस्त्याची रुंदी किती आहे याची जाणीव होते. ही वाहने पुढे जाताच मोकळे पदपथ, रस्त्यांचा पुन्हा फेरीवाले ताबा घेतात.
- स्थानकाकडे येणाऱ्या प्रत्येक मार्गावर फेरीवाल्यांचे बस्तान
- बेस्ट बस, टॅक्सी आदी वाहने स्थानकाजवळ येत नाहीत
- घाईच्या वेळेत या गर्दीतून वाट काढणे कठीण
- दिवसभर फेरीवाल्यांचा गोंगाट
- अवैध बाजारपेठेमुळे सुरक्षा यंत्रणेवर ताण
-----------
गोवंडी स्थानकातच अधिकृत स्टॉल (संजीव)
अत्यंत दाटीवाटीच्या गोवंडी स्थानकाला बेकायदा दुकाने, पानटपऱ्यांचा विळखा पडलेला आहे. निमूळत्या रस्त्याला लागूनच दुकाने थाटली जात असल्याने प्रवाशांना स्थानकात ये-जा करण्यासाठी कवायत करावी लागते. स्टेशनच्या पश्चिमेला संपूर्ण फलाट आणि त्यावरील भिंतीपर्यंत येथील स्थानिकांनी झोपड्या बांधल्या असतानाच अनेक ठिकाणी लोक थेट घरातून फलटावर प्रवेश करीत असल्याचे चित्र आहे.
- खासगी व्यावसायिकांनी पत्रे लावून स्थानकाच्या भिंतीपर्यंत ताबा मिळवला आहे
- प्रवाशांना चालणे कठीण
- तिकीट खिडकीजवळ लागणाऱ्या स्टाॅलमुळे गैरसोय
- स्थानकाच्या प्रवेशद्वारवरच रिक्षांची रांग
-----------
सांताक्रूझ स्कायवाॅकवर फेरीवाल्यांचे अतिक्रमण (नितीन जगताप)
आतापर्यंत रस्त्याच्या कडेला, फुटपाथवर दिसणाऱ्या फेरीवाल्यांची आता सांताक्रूझ स्थानकात जाण्यासाठी असलेल्या स्कायवाॅकपर्यंत मजल गेली आहे. अनेक जण बिनदिक्कत स्कायवाॅकवर आपला व्यवसाय थाटत आहेत. प्रवाशांना त्यातूनच अंग चाेरून ये-जा करावी लागत आहे. तसेच स्थानकाच्या पश्चिमेला फुलविक्रेते, कपडे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रेते यांनी स्थानकाला लागून बेकायदा दुकाने थाटली आहेत. आता स्थानकाच्या पादचारी पुलापर्यंत त्यांचाच कब्जा आहे. त्यांना पालिका प्रशासनाच्या कारवाईचीही भीती नसल्याचा त्यांचा आविर्भाव असताे.
- विलेपार्ले रेल्वे स्थानकाच्या सर्वच पादचारी पुलांवर किंवा पायथ्याशी फेरीवाले
- पदपथावरून जाताना प्रवाशांचा धक्का लागल्यास दादागिरीचा सामना करावा लागतो
-----------
वांद्रे स्थानकात अरेरावी, मुजोरी
वांद्रे स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिमेला एका बाजूला बेकायदा फेरीवाले बसलेले असतात, तर दुसऱ्या बाजूला रिक्षावाल्यांची स्थानकापर्यंत होणाऱ्या घुसखोरीमुळे प्रवासी मोठ्या प्रमाणात त्रस्त होत आहेत. अनेकदा त्यांच्या अरेरावीचा आणि मुजोरीचा प्रवाशांना सामना करावा लागतो. तसेच प्रवाशांना पावसामुळे पूर्वेला चिखलातून स्टेशन गाठावे लागत आहे.
- स्थानक परिसरात पालिका दिवसा कारवाई
- सायंकाळनंतर रात्री उशिरापर्यंत फेरीवाल्यांचेच राज्य
- रेल्वे प्रशासनाच्या हद्दीत अनेक बेकायदा बांधकामे कायम
- बेकायदा बांधकामे आणि झोपड्यांतूनच प्रवाशांना गाठावे लागते स्थानक
------------
वडाळा स्थानकाच्या प्रवेशद्वारावरच फेरीवाल्यांचे ठाण
वडाळा हे हार्बर मार्गावरील सर्वात गर्दीचे आणि व्यस्त असणारे रेल्वे स्थानक मानले जाते. येथून केवळ हार्बर नाही तर मध्य आणि पश्चिम मार्गावरही प्रवास करता येतो. या स्थानकातून बाहेर येण्यासाठी असणाऱ्या निमुळत्या प्रवेशद्वारावर अवैध धंदे ठरल्याचे दिसते.
- भेळ, रस, फळे, खाद्यविक्रेत्यांनी बाकडे आणि टपऱ्या थाटल्या आहेत.
- स्थानकाच्या बाहेर रिंग रूटने चालणाऱ्या बेस्ट बसगाड्या पकडण्यासाठी प्रवाशांची गर्दी हाेत असल्याने धक्काबुक्की, चेंगराचेंगरीचा धोका आहे.

अंधेरी रेल्वेस्थानक फेरीवालामुक्त (नितीन)
रेल्वेस्थानकाचा पश्चिम परिसर कायम गजबजलेला असतो. या परिसरात रिक्षा, वाहने, पादचारी, बसगाड्या यांची वर्दळ असते. त्यातच फेरीवाल्यांच्या वाढत्या संख्येमुळे परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होत होती. या फेरीवाल्यावर पालिकेने कारवाई केल्यानंतर हा परिसर फेरीवालामुक्त झाला आहे. स्थानकाबाहेर पोलिसही तैनात असतात. फेरीवाल्यांवर झालेल्या कारवाईमुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
- रेल्वे स्थानकाबाहेर फेरीवाले गायब
- ऑटोरिक्षामुळे प्रवाशांच मार्ग अजून बिकट
........
गोरेगाव रेल्वेस्थानकाच्या बाहेर फेरीवाल्यांचे अतिक्रमण
गोरेगाव रेल्वेस्थानकाच्या बाहेरील रस्त्यांवर सकाळी-सायंकाळी  फेरीवाल्यांचे अतिक्रमण पाहायला मिळते. रेल्वेस्थानकात ये-जा करणारे प्रवासी तसेच या रस्त्यांवरून मार्गक्रमण करणारी वाहने, यामुळे या रस्त्यांवर पाय ठेवायलाही जागा नसते. रस्त्यावरून चालताना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागतो.
गोरेगाव रेल्वे स्थानक
- स्थानकाबाहेर फेरीवाल्यांचा विळखा कायम
- भाजीवाले, खाद्यपदार्थ स्टॉलमुळे प्रवाशांची गैरसोय
- स्थानबाहेर फेरीवाल्यांचा गोंगाट
-----
बोरिवली रेल्वेस्थानक
पश्चिम उपनगरातील सर्वाधिक गजबजलेले ठिकाण असलेल्या रेल्वेस्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्यांचाही थांबा आहे. स्थानक परिसरात ५० मीटर क्षेत्रापर्यंत नो फेरीवाला झोन आहे. सकाळी फेरीवाले माेजकेच असतात; पण संध्याकाळी फेरीवाल्यांची गर्दी वाढते. संध्याकाळी सेवा रस्त्यावरून चालणेही मुश्कील हाेते. स्टेशनबाहेर रिक्षांची प्रचंड गर्दी असते.

- स्टेशनबाहेर सर्वाधिक शेअर रिक्षांची गर्दी
- सकाळच्या वेळेस गर्दी आटोक्यात
- संध्याकाळी सेवा रस्त्यावरून चालणेही कठीण
- स्थानक परिसरातच डागडुगीचे काम सुरू असल्यानेही त्रास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com