बीडीडीवासीयांना हवे वाढीव भाडे
बीडीडीवासीयांना हवे वाढीव भाडे
२५ हजारांत घर मिळेना; मासिक ३० हजार रुपये देण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : बीडीडी चाळ पुनर्विकासांतर्गत पहिल्या टप्प्यात वरळी येथील पाच हजार ५७६ रहिवाशांना लवकरच घराच्या चाव्या मिळणार आहेत, मात्र उर्वरित चाळींचा पुनर्विकास होण्यास वेळ लागणार आहे. तसेच सध्याची वाढती महागाई पाहता म्हाडा देत असलेल्या २५ हजार रुपयांत घरे भाड्याने मिळत नाहीत. त्यामुळे रहिवाशांना दिले जाणारे भाडे ३० हजार रुपये करावे, अशी मागणी अखिल बीडीडी चाळ भाडेकरू हक्क संरक्षण समितीने राज्य सरकारकडे केली आहे.
मुंबईत वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग येथे बीडीडी चाळी असून, त्यांचा पुनर्विकास म्हाडाच्या माध्यमातून केला जात आहे. सुमारे ९२ एकर जागेवर १९५ बीडीडी चाळी असून, त्यामध्ये १५ हजार ५९३ सदनिका आहेत. दरम्यान, नायगाव आणि ना. म. जोशी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प शासनामार्फत २०१७ रोजी बांधकामासाठी कंत्राटदाराकडे सुपूर्द केला, तर वरळी बीडीडी चाळ प्रकल्पाला जानेवारी २०१९ ला मंजुरी मिळाली, प्रत्यक्ष बांधकामाला २०२१ ला सुरुवात झाली. त्यामधील पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून ५५६ रहिवाशांना घरे दिली जाणार आहेत.
उर्वरित १५ हजार रहिवाशांना घराची प्रतीक्षा आहे. तसेच नवीन इमारतीचे काम हाती घेताना जुन्या चाळी तोडाव्या लागत आहेत. त्यामुळे संबंधितांना संक्रमण शिबिरात स्थलांतर केले जात असले तरी त्याची कमतरता आहे. त्यामुळे अनेकांना २५ हजार रुपये भाडे दिले जात असले तरी त्यामध्ये पर्यायी घरे मिळत नसल्याने सरकारने रहिवाशांना ३० हजार रुपये भाडे द्यावे, अशी मागणी अखिल बीडीडी चाळ भाडेकरू हक्क संरक्षण समितीचे सरचिटणीस किरण माने यांनी सरकारकडे केली आहे.
एकूण रहिवासी - १५,५९३
सध्या मिळणारे भाडे - २५,०००
वाढीव भाड्याची मागणी - ३०,०००
प्रकल्प कधी पूर्ण होणार - सुमारे ३-४ वर्षे