देशी खेळाडूंच्या नाेकरीसाठी प्रयत्न
देशी खेळाडूंच्या नाेकरीसाठी प्रयत्न
पारंपरिक खेळाडूंबाबत क्रीडामंत्री कोकाटेंचे आश्वासन
मुंबई, ता. १३ : पारंपरिक देशी खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्कार, शासकीय लाभ आणि नाेकरीबाबत शासनस्तरावर प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन क्रीडा आणि युवक कल्याणमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज कुर्ला येथे ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव पारंपरिक देशी क्रीडा महाकुंभाच्या उद्घाटन कार्यक्रमात दिले.
कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत या क्रीडा महाकुंभाचे उद्घाटन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर देशी खेळांच्या मैदानाचे लोकार्पण करण्यात आले. २२ ऑगस्टपर्यंत क्रीडा महाकुंभ चालणार असून, २० हजार स्पर्धक १८ विविध देशी खेळांमध्ये सहभागी होणार आहेत. कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव पारंपरिक देशी क्रीडा महाकुंभाचे कुर्ला येथील जामसाहेब मुकादम व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण केंद्राच्या पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर देशी खेळांच्या मैदानावर आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्राचे सुपुत्र कुस्तीपटू ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांच्या नावाने दरवर्षी पारंपरिक खेळांच्या स्पर्धा शासकीय पातळीवर झाल्या पाहिजेत. खेळाडूंना शासकीय सवलती मिळाल्या पाहिजेत, असे लोढा आपल्या भाषणात म्हणाले. हाच धागा पकडून क्रीडा व युवक कल्याणमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दरवर्षी शासकीय स्तरावर पारंपरिक देशी खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्याचे आश्वासन दिले. देशातील पारंपरिक खेळांना प्रोत्साहन दिल्यास सध्याच्या आभासी आणि मोबाइलच्या वापराकडे वळलेल्या तरुणाईला वेळीच आवरता येईल. यासाठी देशी खेळ आणि खेळाडूंना शासकीय स्तरावर मान्यता देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
---
लंगडी, लगाेरी अनिवार्य करणार!
प्राथमिक शाळांत लंगडी, दोरी उड्या, लगोरी यांसारख्या खेळांना अनिवार्य करण्यासंदर्भात लवकरच बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, अशी घोषणाही कोकाटे यांनी या वेळी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.