भामट्यांचे फसवे सोने उत्खनन सुरू

भामट्यांचे फसवे सोने उत्खनन सुरू

Published on

भामट्यांचे फसवे सोने उत्खनन सुरू
निम्म्या किमतीत सोने विकण्याच्या निमित्ताने कोट्यवधींची फसवणूक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ ः सणासुदीचा हंगाम सुरू होत असतानाच अस्सल सोने स्वस्तात मिळवून देऊ, असे सांगत सर्वसामान्यांपासून सराफा व्यावसायिकांची कोट्यवधींना फसवणूक करणाऱ्या टोळ्या मुंबईसह महानगर प्रदेशात पुन्हा सक्रिय झाल्या आहेत. खोदकामात खजिना सापडला, तो स्वस्तात विकायचा आहे, हे या टोळीकडून दाखवले जाणारे प्रमुख प्रलोभन असून, त्यास बळी पडू नका, असे आवाहन पोलिस दलाकडून करण्यात आले आहे.

ताजी घटना
विविध प्रकारच्या धातूविक्रीचा व्यवसाय असलेल्या व्यापाऱ्याला रस्त्याने पायी जाताना उधाराम कुंभार, अशी ओळख सांगणारा तरुण अडवतो. खिशातून सोन्याची चेन, चांदीचे नाणे काढून व्यापाऱ्याच्या हाती ठेवतो. कल्याणच्या एका गावात खोदकामादरम्यान अशी दोनशे चांदीची नाणी आणि सोन्याचे दागिने आम्हाला सापडले आहेत. ते आम्ही निम्म्या किमतीत विकणार आहोत, असे सांगतो.
चोखंदळ व्यापारी तपासणी न करताच सौदा कसा करणार, ही शंका काढतो. त्यावर उधाराम लगोलग त्या चेनमध्ये गुंफलेले दोन मणी काढून व्यापाऱ्याच्या हाती खात्री करण्यासाठी देतो.
तपासणीत ते मणी सोन्याचे आहेत ही खात्री पटताच व्यापारी साधारण ३५ लाख रुपये मूल्य असलेली नाणी आणि दागिने १५ लाख रुपयांना विकत घेण्याची तयारी दर्शवतो. दुसऱ्या दिवशी उधाराम नाणी, दागिने व्यापाऱ्याच्या हवाली करून १५ लाख रुपये घेऊन निघून जातो. काही दिवसांनी व्यापारी हे दागिने घेऊन झवेरी बाजारात विक्रीसाठी नेतो. तेव्हा ते सर्व दागिने, नाणी नकली असल्याचे स्पष्ट होते. व्ही. पी. मार्ग पोलिस उधाराम असे नाव सांगणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.

गुन्ह्याची पद्धत
खोदकामात सोने सापडले, बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडवून आणले पण पुन्हा निकड भासल्याने विकायला काढले, कस्टम विभाग किंवा अन्य यंत्रणांनी कारवाईदरम्यान पकडलेले सोने स्वस्तात, निम्म्या किमतीत मिळवून देतो, असे प्रलोभन दाखवले जाते. खातरजमेसाठी अस्सल सोने हाती ठेवले जाते. त्यानंतर पैसे घेऊन सोन्याचा वर्ख चढवलेले खोटे दागिने देऊन भामटे पोबारा करतात.

आधीच्या घटना
२.५ कोटी
- आर्थिक चणचण भासल्याने वॅलकॅम्बी सुईस या सोने शुद्ध करणाऱ्या परदेशी, नामांकित कंपनीची अस्सल सोन्याची नाणी विकायला काढली आहेत, असे निमित्त करून दक्षिण मुंबईतील पिढीजात सराफाला तब्बल अडीच कोटींना फसवण्यात आले. भामट्यांनी सराफाला दिलेली नाणी प्रत्येकी १०० ग्रॅम वजनाची होती. त्यावर वॅलकॅम्बी सुईस या कंपनीचे नाव, बोधचिन्ह, सिरियल नंबर आदी तपशील कोरलेले होते. त्यामुळे ती अस्सल असावीत असा समज सराफाने करून घेतला आणि दोन टप्प्यांमध्ये ही रक्कम भामट्यांना दिली.

एक कोटी
कस्टम विभागाने विविध कारवायांमध्ये पकडलेले सोने निम्म्या दरात मिळवून देतो, असे सांगत कुर्ला येथील व्यापाऱ्याला एक कोटींची लुबाडणूक करण्यात आली. सुरुवातीच्या दोन खेपांमध्ये आरोपींनी व्यापाऱ्याला किरकोळ खरे सोने निम्म्या किमतीत विकले. त्यामुळे व्यापाऱ्याचा आरोपींवर विश्वास बसला. अधिकचा नफा कमावण्याच्या हव्यासापोटी व्यापाऱ्याने तिसऱ्या खेपेस आरोपींकडून एक कोटींचे सोने विकत घेतले. ते मात्र खोटे होते.


सोन्याचे आकर्षण अन्य देशांपेक्षा अधिक
आपल्या देशाची सोन्याची भूक, आकर्षण अन्य देशांच्या तुलनेत अधिक आहे. हौसेसोबत गुंतवणूक म्हणूनही सोन्याकडे पाहिले जाते. याच आकर्षणाचा फायदा घेत भामटे निम्म्या किमतीत किंवा बाजारभावापेक्षा कमी किमतीत सोन्याचे प्रलोभन दाखवतात. सोन्याचा भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने स्वस्तात सोने मिळते, हे ऐकून प्रत्येकाला हाव सुटू शकते किंवा भविष्यातील नफा दिसू शकतो, मात्र या प्रलोभनामागे दडलेले फसवणुकीचे षड्‌यंत्र दिसत नाही. ते फसवणूक झाल्यावर उमगते. शिवाय अशा टोळ्या सतत ग्राहकाच्या शोधात असतात. मासा लागत नाही तोवर ते गळ टाकणे थांबवत नाहीत, अशी प्रतिक्रिय मुंबई पोलिस दलातील एका वरिष्‍ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com