मराठी मातीमुळे, इथल्या संस्कारांमुळे आचार्य अत्रे जीवनगौरव पुरस्कार''

मराठी मातीमुळे, इथल्या संस्कारांमुळे आचार्य अत्रे जीवनगौरव पुरस्कार''

Published on

अमराठी लाेकांना मराठी
भाषक करावे लागेल!
ज्येष्‍ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांंचे मत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : महाराष्ट्रातील अमराठी लोकांना मराठी भाषक करावे लागेल, ही राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी राज्य सरकारला कर्तव्याची जाणीव करून दिली. हत्तीण आली पाहिजे, कबुतर गेले पाहिजे यांसारखी अतिमहत्त्वाची कामे सोडून लोक आले आहेत, अशी सद्यस्थितीवर मिश्कील टिप्पणीही त्यांनी केली.
गायक, दिग्दर्शक व नाटककार अशोक हांडे यांना रामदास फुटाणे यांच्या हस्ते आचार्य अत्रे जीवनगौरव पुरस्कार बुधवारी (ता. १३) प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर हर्षवर्धन देशपांडे, डिम्पल प्रकाशनचे प्रकाशक अशोक मुळे, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, साहित्यिक महेश केळुस्कर, ॲड. राजेंद्र पै आणि विक्रम पै उपस्थित होते. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या कन्या शिरीष पै आणि मीना देशपांडे यांनी स्थापन केलेल्या ‘आत्रेय’ या संस्थेतर्फे दरवर्षी १३ ऑगस्टला आचार्य अत्रे यांच्या जन्मदिनी हा पुरस्कार दिला जातो.
महाराष्ट्रात मराठीवरून सुरू असलेले राजकारण, मराठी संस्कृती जपण्यासाठीचे प्रयत्न, घराघरांतून कमी होणारा मराठीतील संवाद, कमी झालेले वाचन, मराठी-अमराठी वाद अशा पार्श्वभूमीवर मराठी टिकवण्याची जबाबदारी गांभीर्याने स्वीकारण्याची गरज आहे, अशी भावना फुटाणे यांनी व्यक्त केली.
‘महाराष्ट्र’ हे नाव अत्रेंमुळे मिळाले, याची आठवण करून देत आज अत्रे हवे होते, अशी भावना ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी व्‍यक्त केली. अत्रे यांचे साहित्य पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचावे, यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहनही त्यांनी केले.
या सोहळ्यात ‘झेंडूची फुले’वर आधारित काव्य आणि विडंबनात्मक काव्याचा सांगीतिक कार्यक्रम ॲड. राजेंद्र पै यांनी सादर केला. यामध्ये रामदास फुटाणे आणि डॉ. महेश केळुसकर यांच्यासोबत मैथिली पानसे जोशी, शिवानी गायतोंडे, निनाद आजगावकर आणि कौशल इनामदार आदी सहभागी झाले होते.
----
‘मराठी संस्कारांमुळे हा पुरस्कार’
मराठी संस्कृती, या राज्याचा इतिहास, भूगोल, मर्म आणि धर्म पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. आचार्य अत्रे यांच्या नावाचा हा पुरस्कार मराठी मातीमुळे, इथल्या संस्कारांमुळे मिळाला आहे. उंब्रज गावातील भजने, आईच्या ओव्या, हरिपाठ, रंगारी बदक चाळीतील संस्कारांना मिळालेला हा पुरस्कार आहे, अशी भावना गायक, दिग्दर्शक व नाटककार अशोक हांडे यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com