तेव्हा संपूर्ण मुंबई रस्त्यावर उतरली होती

तेव्हा संपूर्ण मुंबई रस्त्यावर उतरली होती

Published on

तेव्हा संपूर्ण मुंबई रस्त्यावर उतरली होती
ज्‍येष्ठ स्वातंत्र्यसैनिक जी. जी. पारीख यांनी जागवल्या आठवणी
मयूर फडके ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ ः भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यदिनाच्या त्या रात्री विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठ ते गिरगाव चौपटी अशी यात्रा काढली होती. हजारो नागरिक रस्त्यावर उतरले होते. अनेकांच्या बलिदानामुळे स्वातंत्र्याचा दिवस पाहायला मिळाल्याचा आनंद साऱ्यांच्या चेहऱ्यावर होता. या सर्व क्षणाचे साक्षीदार असलेले ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक डॉ. जी. जी. पारीख यांनी आठवणींना उजाळा दिला.
डॉ. जी. जी. पारीख आता १०१ वर्षांचे आहेत. स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेणारे, देशासाठी सर्वस्व अर्पण करणारे आणि तिथपासून आतापर्यंतच्या स्थित्यंतरांचे साक्षीदार असलेल्यांपैकी ते आहेत. त्यांचा देशभक्तीचा जज्बा अजून कायम आहे.
गांधी भेट...
कुटुंबातील अनेक जण स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होते. घरच्यांसोबत एका कार्यक्रामाला गेलो असताना पहिल्यांदा महात्मा गांधींजींना पाहिले. कुटुंबीयांनी गांधीजींना माझी ओळख करून दिली. बापूंनी आपल्याला आशीर्वाद दिल्याची आठवण पारेख आजही त्याच उत्साहाने सांगतात.

स्वातंत्र्यलढ्यात सहभाग
९ ऑगस्ट १९४२च्या ‘चले जाव’ आंदोलनामध्ये राष्ट्रीय नेत्यांना अटक झाली, तेव्हा विद्यार्थी असलेले पारीख यांनीही या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. अवघ्या १८व्या वर्षाचे असताना १२ ऑगस्ट १९४२ रोजी रेल्वे अडवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांना चर्चगेट येथे अटक झाली होती आणि त्यांना १० महिन्यांचा तुरुंगवास झाला होता. तुरुंगातून बाहेर आल्यावर वैद्यकीय शिक्षण घेताना ते काँग्रेसअंतर्गत समाजवादी नेत्यांच्या संपर्कात आले आणि नंतर सक्रिय राजकारणात काम करू लागले. महात्मा गांधी, जयप्रकाश नारायण, युसुफ मेहेरअली अशा थोर नेत्यांचा सहवास त्यांना मिळाला. समाजवादी विचारांविषयी कुटनीतीचे राजकारण सुरू असताना पारीख अद्याप आपल्या मूल्यांसाठी ठाम उभे आहेत.

संस्थेची स्थापना
जी. जी पारीख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून १९६२ साली ‘यूसुफ मेहेरअली सेंटर’ची स्थापन केली. ग्रामीण भागात रोजगार संधी, तारा संस्थेमार्फत पनवेल तालुक्यात स्वयंरोजगार देण्यासाठी प्रशिक्षण केंद्र सुरू केले. जवळपास ५० वर्षांपूर्वी सुरू झालेल्या तारा संस्थेत अनेक डाॅक्टर्स रविवारी सेवा देण्यासाठी येतात. या केंद्रामध्ये मोतिबिंदू तसेच अन्य शस्त्रक्रिया अगदी माफक दरात होतात. तारा येथे साधारणतः १०० मुलींचे वसतिगृह आहे. ‘यूसुफ मेहेरअली युवा बिरादरीची’ निर्मिती करून जम्मू काश्मीर, मध्य व उत्तर प्रदेश, गुजरात, झारखंड व उत्तराखंड अशा राज्यांमध्ये कार्य अविरत सुरू आहे.

सद्य:स्थितीवर भाष्य
महाराष्ट्र नेहमीच प्रगतिपथावर राहिला आहे. एक समाजाभिमुख राज्य म्हणून त्याची ओळख कायम राहिली आहे. परंतु महाराष्ट्राची आताची स्थिती पाहता ते रसातळाला गेल्याचे परखड मत पारीख मांडतात. सत्ताधारी निवडून आल्यावर जनतेचे सेवक म्हणून काम करतील असे वाटले होते, परंतु त्यांच्याकडून एकप्रकारे भ्रमनिरास झाला असून, ते शासक म्हणून काम करीत आहेत. त्यामुळे आपण गांधींच्या विचारसरणीचा विश्वासघात केल्यासारखे वाटते, असेही पारीख सांगतात. आम्ही जे स्वतंत्र भारताचे स्वप्न पाहिले ते आजची राजकीय आणि सामाजिक स्थिती पाहता भंगल्यासारखे वाटते, असे दुःखही पारीख यांनी बोलून दाखवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com