वरळीत ‘परिवर्तन दहीहंडी उत्सव’

वरळीत ‘परिवर्तन दहीहंडी उत्सव’

Published on

वरळीत परिवर्तन दहीहंडी उत्सव
आदित्य ठाकरे यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचे शक्तिप्रदर्शन

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ ः दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने राजकीय पक्षांच्या एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी साधली. शिवसेना (उबाठा)चे नेते आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात भाजपने डझनभर हंड्यांच्या माध्यमातून आदित्य यांच्यासह महाविकास आघाडीला घेरण्याचा प्रयत्न केला. जांबोरी मैदानावर भाजपकडून परिवर्तन दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहीहंडी फोडून परिवर्तनाचा निर्धार केला.

भाजपचे पदाधिकारी संतोष पांडे यांनी या ‘परिवर्तन दहीहंडी महोत्सव २०२५’चे आयोजन केले होते. यामध्ये सकाळी ११ ते दुपारी दोन वाजेपर्यंतचा वेळ वरळीतील दहीहंडी पथकांसाठी राखून ठेवण्यात आलेला होता. यामुळे वरळीतील गोविंदा पथकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. जांबोरी मैदानावर गेल्या चार वर्षांपासून भाजपपुरस्कृत दहीहंडी उत्सव साजरा होत आहे. यंदादेखील मुंबईतील सर्वात मोठा दहीहंडी उत्सव याठिकाणी झाल्याचा दावा आयोजकांनी केला. याठिकाणी दिवसभर राजकीय नेत्यांनी मांदियाळी येथे दिसली. याठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री आशीष शेलार, मंगलप्रभात लोढा, संजय उपाध्याय उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी ‘परिवर्तन दहीहंडी’ फोडली. या वेळी ते म्हणाले, वरळीतील लोकांना चांगले दिवस आणायचे आहेत. त्यासाठी आपल्याला अधिक चांगले काम करायचे आहे. येथील लोकांना या विभागातदेखील परिवर्तन करायचे असून या वेळी नक्कीच परिवर्तन होईल, असा आशावाद व्यक्त करून त्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे निर्देशही दिले.

आयोजक संतोष पांडे यांनी सांगितले, की गेल्या चार वर्षांपासून आम्ही हा उत्सव साजरा करीत आहोत. कधी विकासाची, कधी भ्रष्टाचाराची हंडी फोडून हा उत्सव साजरा केला. यंदा परिवर्तनाची दहीहंडी आयोजित केली असून वरळीतील लोक या विभागात नक्कीच परिवर्तन करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


...
राजकीय पक्षांमध्ये जोरदार चुरस
भाजपकडून वरळी परिसरामध्ये विविध दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. उत्सवाच्या माध्यमातून भाजपने जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आपली राजकीय ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला. पूर्वी या मैदानावर माजी मंत्री सचिन अहिर यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उत्सव होत असे, त्यानंतर शिवसेना आमदार सुनील शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेनेने येथे आपला जम बसवत प्रस्थ वाढवले. याच मतदारसंघातून आदित्य ठाकरे हे आमदार झाल्याने येथील दहीहंडी उत्सवाची रंगत अधिक वाढली. उत्सवासाठी जांबोरी मैदान मिळवण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये जोरदार चुरसदेखील बघायला मिळू लागली; मात्र गेल्या चार वर्षांपासून भाजपने मैदान मिळवत आपली राजकीय स्थिती अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे.
........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com