भरपावसात ‘थर’थराट
भरपावसात ‘थर’थराट!
महामुंबईला मुसळधारेने झोडपले
मुंबई, ता. १६ ः मुंबईसह परिसराला शुक्रवार (ता. १५) रात्रीपासून मुसळधार पावसाने झोडपले. मुंबई शहर व उपनगर, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर परिसरात रात्रीपासून शुक्रवारी दिवसभर संततधार सुरू होती. त्यामुळे अनेक भागात पाणी साचले. मागील २४ तासांत विक्रोळी २५७.५ मिमी, सांताक्रूझमध्ये २४४.७ मिमी पावसाची नोंद झाली. त्याचा फटका लोकल सेवेसह रस्ते वाहतुकीलाही बसला. विक्रोळी पार्कसाइट परिसरात एका घरावर दरड कोसळून बापलेकीचा मृत्यू झाला.
मागील काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला होता. त्यानुसार शुक्रवार सकाळपासून पावसाने हजेरी लावली. रात्री पावसाचा जोर अधिकच वाढला. शनिवारी (ता. १६) दिवसभर पावसाची संततधार कायम होती. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे दादर, शिवडी, कुर्ला, सायन ,चेंबूर, बोरिवली, अंधेरी, मरोळ आदी भागांत पाणी साचल्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. मुंबईत दिवसभरात सरासरी १२८.९९ मिमी पावसाची नोंद झाली. पश्चिम उपनगरात १४४.५७ मिमी, पूर्व उपनगरात १५२.८० मिमी, तर शहरात ९९.६१ मिमी पाऊस झाला. ठाणे शहरात पावसाच्या संततधारेमुळे नौपाड्यातील पंपिंग स्थानकाची सुरक्षा भिंत पडली. गेल्या २४ तासांत ठाणे शहरात ७०.८१ मिमी पावसाची नोंद झाली असून, बारवी धरण १०० टक्के भरल्याने ओसंडून वाहत होते. दरम्यान, मुसळधार पावसाचा फटका रस्ते आणि रेल्वे वाहतुकीलाही बसला. चुनाभट्टी, कुर्ला, चेंबूर, टिळकनगरसह मानखुर्द, गोवंडी या स्थानकांवर पाणी साचल्याने मध्य व हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळित झाली. सकाळच्या गर्दीच्या वेळीच मुख्य मार्गांवरील १३, तर हार्बर मार्गावरील १५ अशा एकूण २८ लोकल रद्द करण्यात आल्या. दिवसभरात हा आकडा ३५ वर गेला. त्याशिवाय १५० हून अधिक लोकल गाड्या विलंबाने धावत असल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले.
----
दरड-माती कोसळून दोघांचा मृत्यू
विक्रोळी (पश्चिम) येथील जनकल्याण सोसायटी परिसरात शनिवारी पहाटे डोंगरकड्यावरून माती-दगड घरावर कोसळल्याने बापलेकीचा मृत्यू झाला. शालू मिश्रा (वय १९) आणि सुरेश मिश्रा (५०) असे मृतांची नावे असून, आशा मिश्रा (४५) आणि ऋतुराज मिश्रा (२०) गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार आहे. पावसामुळे अडथळे येऊनही अग्निशमन दल व पालिका कर्मचाऱ्यांनी तत्काळ मदतकार्य केले.
---
आरे भुयारी मार्गात तीन फूट पाणी
जोरदार पावसामुळे मरोळ-मरोशी मार्गावरील आरे भुयारी मार्गात तीन ते चार फूट पाणी साचल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. पाणी उपसा यंत्रणा नसल्याने मार्ग अक्षरशः तळे बनला आहे. ही यंदाच्या पावसाळ्यातील दुसरी वेळ असून, नागरिकांनी पालिकेच्या नियोजनशून्यतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
----
आजही जोर कायम राहणार
मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस होण्याचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे.
......
२४ तासांतील सर्वाधिक पाऊस (मिमी)
विक्रोळी २५७.५
सांताक्रूझ २४४.७
सायन २२८.०
जुहू २१९.५
वांद्रे १८४.०
भायखळा १७२.०
चेंबूर १३१.५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.