मुसळधारेमुळे महामुंबई जलमय
मुसळधारेमुळे महामुंबई जलमय
रस्ते वाहतूक ठप्प, रेल्वेसेवेला फटका; जनजीवन विस्कळित
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ ः मुसळधार पावसाने आज सकाळपासून महामुंबईला अक्षरशः झोडपून काढले. त्यामुळे सखल भाग जलमय झाले. रेल्वे, रस्ते वाहतुकीचा अक्षरशः बोजवारा उडाला. विमानसेवेवरही परिणाम झाला. रेल्वेस्थानकांवर गर्दी उसळली. अनेक ठिकाणी झालेल्या वाहतूक कोंडीत हजारो नागरिक अडकून पडले. मुंबईतील शाळांना दुपारच्या सत्रात सुट्टी देण्यात आली. काही ठिकाणी उद्यासाठी सुट्टी जाहीर करण्यात आली. पाऊस असाच सुरू राहण्याचा अंदाज असल्याने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले.
सायन-पनवेल मार्गावर पावसामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. अंधेरीत घराचा स्लॅब कोसळून तिघे जखमी झाले. चेंबूरमध्ये संरक्षक भिंत कोसळून चार घरे जमीनदोस्त झाली. ठाण्यातील घोडबंदर मार्ग सहा तास पाण्याखाली होता. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली. कल्याणमध्ये दरड कोसळून दोन घरांचे नुकसान झाले. पालघरमध्ये काही ठिकाणी किरकोळ पडझड झाली. महाड शहरात पाणी भरायला सुरुवात झाली.
मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेलाही जोरदार पावसाचा फटका बसला. तिन्ही मार्गांवरील रेल्वे १० ते १५ मिनिटे उशिराने धावत होत्या. आठवड्याचा पहिला दिवस असल्याने नोकरी, व्यवसायानिमित्त घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांचे हाल झाले. अंधेरी सबवेमध्ये पाणी साचल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रूझ, वांद्रे तसेच पूर्व उपनगर भागात पावसाचा जोर वाढला. मुंबईत पावसामुळे भरलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी मुंबई महापालिकेने कर्मचारी तैनात केले आहेत तसेच सर्व पंपिंग स्टेशन कार्यरत असल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले. दादर, हिंदमाता, किंग सर्कल आंबेडकर रोड, लाल बहादूर शास्त्री मार्ग वीरा देसाई रोड तसेच शहर आणि उपनगरातील अंतर्गत रस्ते जलमय झाले होते. मुंबईतील अनेक गृहनिर्माण सोसायटी तसेच अनेक निवासी भागांमध्ये पावसाचे पाणी भरले होते. त्यामुळे स्थानिक रहिवाशांचे हाल झाले.
...
स्कूल बस पाण्यात अडकल्या
मुंबईतील रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. किंग्ज सर्कल भागात वाहने अडकून पडली होती. अडकून पडलेला गाड्यांमध्ये शाळांच्या बसही होत्या. त्यातील विद्यार्थ्यांना पालक आणि पोलिसांनी सुरक्षित बाहेर काढले.
...
सबवे तुडुंब
संतधर पावसाने मुंबई उपनगरातील सबवे पावसाच्या पाण्याने भरल्याने तेथील वाहतूक बंद करण्यात आली होती. मालाड सबवे, अंधेरी सबवे बंद केले होते.
...
द्रुतगतीवर कोंडी
पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. वाहने तासन्तास अडकून पडल्याचे दिसत होते.
...
शाळांना सुट्टी
मुंबईतील दुपारच्या सत्रातील शाळांना आणि महाविद्यालयांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार पावसामुळे सुट्टी जाहीर केली. संध्याकाळी पावसाचा अंदाज घेऊन उद्या सुट्टी जाहीर करणार असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. महामुंबईत उद्याही शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय काही ठिकाणच्या स्थानिक प्रशासनाने घेतला आहे.
...
लोकल खोळंबल्या
सायन रेल्वेस्थानकावर रुळांवर पाणी साचल्याने रेल्वेसेवा अनिश्चित काळासाठी बंद ठेवल्याने रेल्वे प्रवाशांची मोठी कुचंबणा झाली. कुर्ला स्थानकात रुळांवर पाणी साचले होते. लोकल ठिकठिकाणी खोळंबून राहिल्या होत्या.
...
वरळी कोळीवाड्यात पाणी
मुसळधार पावसाने वरळी कोळीवाडा भागात मोठ्या प्रमाणात पाणी भरले होते. या भागातील अंतर्गत रस्ते पाण्याखाली गेले होते. त्यामुळे वाहने पाण्यातून वाट काढत होती. स्थानिकांचेही हाल झाले.
...
व्यापाऱ्यांचे नुकसान
मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाने व्यापाऱ्यांचेही मोठे नुकसान झाले. सकल भागांत पाणी भरल्याने दुकानांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान झाले.
...
कोस्टल रोडची वाहतूक सुरळीत
कोस्टल रोडवरील वाहतूक सुरळीत होती. अर्थात आज या मार्गावर फारशी वाहनेही नव्हती. या रस्त्यावर कुठेही पाणी भरू नये तसेच वाहतूक कोंडी होऊ नये याची खबरदारी आज पालिकेने घेतली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.