चेंबूरमध्ये आठ तासांत १७७ मिमी पाऊस
चेंबूरमध्ये आठ तासांत १७७ मिमी पाऊस
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : मुंबईत सकाळपासून सुरू झालेल्या संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले. चेंबूरमध्ये आठ तासांत तब्बल १७७ मिमी पावसाची नोंद झाली. शहरातील अनेक भाग जलमय झाले. रस्त्यावर वाहनांची मोठी कोंडी झाली. अनेक वाहनचालकांना पाण्यातून मार्ग काढत पुढे सरकावे लागले. रुग्णालय परिसरात पाणी साचल्याने रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागला. मुसळधार पावसामुळे शहराची अक्षरशः दाणादाण उडाली. काही भागांत झाडे व फांद्या पडल्याच्या तक्रारी समोर आल्याने पथकांना तत्काळ कटर्ससह घटनास्थळी जाऊन वाहतूक सुरळीत करण्याचे आदेश दिले गेले. शिवाय विविध ठिकाणी तात्पुरती पंपिंग स्टेशन्स उभारून साचलेले पाणी समुद्राकडे वळविण्याचीही व्यवस्था करण्यात आली.
.....
कोठे किती पाऊस? (मिमी)
शहर -- १०७.९४
पूर्व उपनगरे -- १११.८६
उपनगरे -- १२१.९५
...
चेंबूर -- १७७.०२
दादर - १७३
वरळी -- १७०
वडाळा -- १६५
वर्सोवा -- १४९
वांद्रे -- १४५
खारदांडा -- १३१
बीकेसी -- १२७
विक्रोळी -- १४५
जुहू -- ९६
सांताक्रूझ -- ८६
सायन -- ८२
भायखळा -- ८०
महालक्ष्मी -- ४२
कुलाबा -- ४१
...
येथे पाणी साचले
चेंबूर पोस्टर कॉलनी, दादर टी टी, हिंदमाता, वडाळा, चुनाभट्टी, सायन किंग सर्कल, माटुंगा, गोवंडी, मानखुर्द, घाटकोपर, मुलुंड, पवई, वांद्रे, खार, गोरेगाव, अंधेरी डीएन नगर, अंधेरी सबवे, जेपी रोड, कुर्ला एलबीएस मार्ग, जोगेश्वरी वीरा देसाई रोड, गोरेगाव, मालाड, विद्याविहार, कांजूरमार्ग, भांडुप, भायखळा, फोर्ट, वर्सोवा, जुहू, लालबाग परळ, वरळी, विक्रोळी, सांताक्रूझ
...
वाहतूक वळवली
वाहतूक विभागाने शेल कॉलनी, किंग्ज सर्कल, हिंदमाता, नेहरूनगर कुर्ला, संगमनगर, अंधेरी सबवे, सीजीएस कॉलनी आदी ठिकाणी रस्ते वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली. त्यामुळे प्रवाशांना त्याचा फटका बसला.
...
पोलिसांनी मुलांना खांद्यावर घेतले!
माटुंगा पोलिस ठाण्यासमोर साचलेल्या पाण्यामुळे बंद पडलेल्या शाळेच्या बसमधील सहा विद्यार्थ्यांना पोलिसांनी खांद्यावर घेत बसमधून बाहेर काढले. त्यानंतर या मुलांना पोलिस ठाण्यात सुरक्षित बसवण्यात आले. डॉन बॉस्को शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन ही बस सायनच्या प्रतीक्षानगर इथे जात होती. शाळेची बस बंद पडली आहे आणि आत मुले आहेत, हे पाहताच पोलिसांनी हा निर्णय घेतला. पावसाचा जोर वाढतो आहे हे पाहताच संभाव्य धोका लक्षात घेत ड्युटीवर तैनात पोलिसांनी बसमधील मुलांना बाहेर काढत पोलीस ठाण्यात आणले. तिथे आणल्यानंतर या मुलांना खाऊ देत त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधण्यात आला. मुंबई पोलिसांच्या या कृतीचे वरिष्ठ पोलिसांसह तमाम नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.
...
बेस्ट मार्गांत बदल
संततधार पावसाने मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडाली. एकीकडे रेल्वे सेवा उशिराने धावत असताना, सखल भागांत जागोजागी तुंबलेल्या पाण्यामुळे बेस्ट उपक्रमाला बेस्ट बसच्या मार्गांत परिवर्तन करून ते दुसरीकडून वळवावे लागले. अचानक झालेल्या या बदलामुळे ही मुंबईकरांची चांगलीची धांदल उडाली. आठ आगाराचे तब्बल ४६हून अधिक बसमार्ग वळवण्यात आल्याची माहिती बेस्ट अधिकाऱ्यांनी दिली.
...
पालिकेची यंत्रणा तैनात
पालिकेची टीम रस्त्यावर उतरून परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होती. पाण्याचा निचरा वेगाने व्हावा यासाठी पुरेसा पंप लावण्यात आले होते. अनेक ठिकाणी मॅनहोल उघडून पाण्याचा निचरा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. पावसाची संततधार सुरू राहिल्याने पाण्याचा निचरा वेगाने होण्यात अडचणी निर्माण झाल्या. अंधेरी डीएननगर येथील सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याने रहिवाशांचे हाल झाले. दादरच्या हिंदमाता येथे पाणी साचल्याने येथील वाहतूक वळविण्यात आली. पालिकेने येथील सातही पंप सुरू ठेवले होते. पावसाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महापालिकेची संपूर्ण यंत्रणा प्रत्यक्ष क्षेत्रावर कार्यरत होती. अधिकारी व कर्मचारी वर्ग विविध ठिकाणी उपस्थित राहून सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून होते. अभियंते, पंप ऑपरेटर, आरोग्य कर्मचारी आणि आपत्कालीन पथके प्रत्यक्ष मैदानात तैनात होती. पर्जन्य जलवाहिनी यंत्रणा, सांडपाणी व्यवस्था, उदंचन केंद्र यांसारख्या महत्त्वाच्या सेवांवर विशेष लक्ष देण्यात आले होते. पावसाळी पाणी निचऱ्याच्या कामांमध्ये अडथळा येऊ नये म्हणून आवश्यक त्या उपाययोजना तातडीने केल्या गेल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.